ट्विन टॉवरचा एपिसोड तर संपलाय पण आता दिल्लीकरांच्या समोर असलेल्या ‘या’ अडचणींचं काय ?

नॅशनल कॅपिटल रिजनच्या नोएडामध्ये बेकायदेशीररित्या बांधलेले ट्विन टॉवर अगदी ९ सेकंदामध्ये जमीनदोस्त झाले. ४ जेष्ठ नागरिकांनी या ट्विन टॉवरच्या बेकायदेशीर बांधकामाच्या विरोधात दीर्घ लढाई लढली. या लढ्याची दखल घेऊन अखेर सर्वोच्च न्यायालयाने नोएडामधील टॉवर पाडण्याचे आदेश दिले.

काल २८ ऑगस्टला हे दोन्ही टॉवर बघता बघता जमीनदोस्त झाले. परंतु हे दोन्ही टॉवर जमिनीवर कोसळताना धुळीचं एक मोठं ढग तयार झालं होतं. त्याचा धुळीच्या ढगांमुळे आता नोएडामधील नागरिकांच्या समोर प्रदूषणाची समस्या निर्माण झाली आहे.

कारण ट्विन टॉवर कोसळल्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर सिमेंट, चुना आणि विटांचा मलबा तयार झालाय.

विस्फोटकांच्या साहाय्याने ट्विन टॉवर कोसळल्यानंतर तब्बल ८० हजार टन मलबा आजूबाजूच्या परिसरात पसरला. त्या मलब्यात एकूण ४ हजार टन लोखंड व स्टील, सिमेंटच्या बांधकामाचे तुकडे, मातीच्या व सिमेंट विटांचा भुगा, टाइल्सचे तुकडे, चुना व प्लास्टर ऑफ पॅरिस यांचा समावेश आहे.

या समस्येमुळेच टॉवरच्या आजूबाजुच्या तब्बल ०.५ किमीच्या परिसरातील नागरिक आणि प्राण्यांना दुसरीकडे स्थलांतरित करण्याचे आदेश प्रशासनाने दिलेले होते. परंतु २४ तासांनंतर नागरिक आपल्या घरी परातल्यानंतर सुद्धा समस्या संपणाऱ्या नाहीत.

टॉवरच्या या मलब्यामुळे अनेक समस्या निर्माण होणार आहेत ज्यामुळे स्थानिक नागरिकांना दीर्घकाळ याचा त्रास होईल. 

१. शॉक व्हेव्स

विस्फोटामुळे जेव्हा ट्विन टॉवर जमिनीवर खाली कोसळलं, तेव्हा टॉवरच्या ८० हजार टन मलब्याच्या दाबामुळे जमिनीला मोठा हादरा बसला. त्या हादऱ्यामुळे जवळपास आलेल्या इमारतींना धक्का बसलाय. या धक्क्यामुळे शेजारील इमारतींच्या बांधकामांना तडे गेलेत. तसेच या धक्क्यामुळे इमारतींच्या बांधकामावर परिणाम होऊन या इमारतींचे वयोमान घटणार आहेत.

ट्विन टॉवरच्या सगळ्यात जवळची इमारत केवळ ९ मीटर अंतरावर होती. त्यामुळे त्या इमारतीसह आसपासच्या सगळ्या इमारतींचे आयुष्यमान घटणार आहेत.

त्या इमारती लवकरच जीर्ण होऊन कोसळण्याची सुद्धा समस्या उद्भवू शकते. त्यामुळे कोणताही दोष नसताना त्या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या निवासाचा प्रश्न आणखी बिकट होऊ शकतो.  

२. वायू प्रदूषण

या ट्विन टॉवरमुळे मोठ्या प्रमाणावर सिमेंट, विटा आणि चुन्याची धूळ निर्माण झालीय. हे टॉवर पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विस्फोटकांचा वापर करण्यात आल्याने या धुळीमुळे आसपासच्या परिसरातील हवेच्या गुणवत्तेवर मोठा परिणाम होईल.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या सर्वेनुसार २६ ऑगस्टला नोएडातील हवेची गुणवत्ता १११ आणि ११३ पॉइंट होती. मुळातच प्रदूषित असलेल्या नोएडा शहरात या टॉवरच्या धुळीमुळे आणखी मोठे वायू प्रदूषण झाले आहे. या मलब्याची विल्हेवाट लावताना जितका जास्त उशीर होईल तितकंच जास्त प्रदूषण होईल. तसेच विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेत मलबा वाहून नेतांना सुद्धा वायू प्रदूषणात वाढ होईल. 

३. जमिनीचे प्रदूषण

या टॉवरला पाडल्यामुळे तयार झालेल्या मलब्यातील टाइल्सचे तुकडे, लोखंड आणि काचा यांचा पुनर्वापर करण्यात येईल मात्र बाकीचा मलबा कचऱ्यात टाकावा लागेल. यातील काही मलबा ट्विन टॉवरच्या तळघरात पुरला जाणार आहे. तर उर्वरित मलबा शहरातील एका भूखंडावर टाकला जाणार आहे. त्यामुळे ट्विन टॉवर आणि मलबा टाकण्याच्या जागा पूर्णपणे प्रदूषित होणार आहेत.

४. जल प्रदूषण 

ट्विन टॉवर कोसळल्यामुळे भूगर्भातील पाण्याच्या गुणवत्तेवर याचा परिणाम होतोय. यात भूगर्भाला बसलेल्या धक्क्यामुळे तिथल्या पाण्याच्या स्रोतांचं नुकसान होईल. तसेच बिल्डिंगच्या मलब्याचे विषारी तत्व जमिनीत गेल्यामुळे पाण्याच्या प्रदूषणात वाढ होणार आहे. 

५. आरोग्याच्या समस्या 

टॉवर कोसळल्यामुळे सगळीकडे धुळीचा ढग तयार झाला होता. काही काळानंतर ही धूळ संपली असं दिसेल. परंतु धुळीचे अतिशय सूक्ष्म कण अदृश्य स्वरूपात हवेत दीर्घकाळ राहील. ही धूळ घरातील वस्तू, आसपासचा परिसर आणि श्वसनामागे लोकांच्या शरिरात जाईल.

शिवाय ही सामान्य धूळ नसल्यामुळे या धुळीचे दुष्परिणाम जास्त घातक आहेत. सिमेंट आणि चुन्याचे कण शरीरात गेल्यामुळे फुफ्फुसं आणि श्वसन संस्थेचे आजार होण्याची शक्यता आहे. तसेच कॅन्सरसारखे गंभीर आजार होण्याची सुद्धा शक्यता आहे.

या धूलिकणांचा सगळ्यात जास्त धोका नवजात बालकांना आणि लहान मुलांना आहे. 

या धुळीच्या कणांमुळे लहान मुलांना अस्थमा आणि कॅन्सरसारखे आजार होऊ शकतात. त्यामुळे अतिशय संवेदनशील असलेल्या लहान मुलांना आयुष्यभराचे त्रास होऊ शकतात. 

६. धुळीमुळे परिसरातील झाडांचं नुकसान 

ट्विन टॉवर पडल्यामुळे जी धूळ पसरली ती आजूबाजूच्या परिसरातील झाडांवर आणि वनस्पतींवर पसरलेली आहे. या धुळीमुळे झाडांचे प्रकाश संस्लेशन म्हणजेच फोटोसिंथेसिस बिघडेल आणि त्या झाडांवर याचा प्रतिकूल परिणाम होईल.

तसेच हे टॉवर दिल्ली-लखनऊ महामार्गावर असल्यामुळे य मार्गावरून वाहतूक करणाऱ्या लोकांना याचा त्रास होण्याची दाट शक्यता आहे.

ट्विन टॉवर पाडल्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या टाळण्यासाठी मास्कचा वापर करणे घराची वारंवार स्वच्छता करणे, जेष्ठ नागरिक आणि बालकांच्या आरोग्याची काळजी घेणे हे उपाय स्थानिक नागरिकांना करावे लागणार आहेत. सोबतच याकरिता प्रशासन आणि नागरिकांना परस्पर सहकार्याने उपाय करावे लागणार आहेत. 

हे ही वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.