ट्वीन टॉवर पाडला… पण नक्की का पाडला, ते माहित आहे का?

गेल्या आठवड्याभरापासून एक बातमी नुसती ट्रेंडवर दिसत होती- ‘२८ ऑगस्टला नोएडातील सुपरटेक ट्वीन टॉवर पाडले जाणार’

हे टॉवर पार देशाच्या वरच्या टोकाला उत्तरप्रदेशमध्ये आहे आणि त्यांना पाडण्याचा निर्णय कोर्टाद्वारे देण्यात आला आहे. याचा महाराष्ट्राशी काय संबंध असणार नाही, म्हणून गेले कित्येक दिवस या विषयाकडे जरा दुर्लक्षच केलं. पण जसं जसं ही इमारत पडण्याचा दिवस जवळ येऊ लागला तसा हा विषय अजूनच वाजवला जाऊ लागला. आज तर राष्ट्रीयच नाही तर राज्यातील मीडियाने पण हा मुद्दा उचलून धरला.

दुपारी २:३० ला हे टॉवर पाडले गेले आहेत आणि त्याचं प्रक्षेपण जवळपास सगळ्याच मीडियांनी कव्हर केलं.

मग प्रश्न पडला…नक्की हे प्रकरण काय?

हे समजून घ्यायचं असेल तर हे टॉवर काय आहे? का पाडले गेले? आणि असं काय खास आहे की यांचं पडणं इतकं मॅटर करतंय? बघायला हवं…

नोएडामधील सुपरटेक ट्विन टॉवर्सला भारतातील सर्वात उंच इमारत म्हणून ओळखलं जायचं. कुतुबमिनार पेक्षाही हे टॉवर्स मोठे होते. २००४ मध्ये, सुपरटेक लिमिटेडला न्यू ओखला औद्योगिक विकास प्राधिकरणाकडून सेक्टर ९३ ए मध्ये जमीन मिळाली होती. गृहनिर्माण संस्थेच्या विकासासाठी ही जमीन देण्यात आली होती जिला नंतर एमराल्ड कोर्ट म्हणून ओळख मिळणार होती.

जून २००५ मध्ये न्यू ओखला औद्योगिक विकास क्षेत्र इमारत नियम व निर्देश १९८६ नुसार प्राधिकरणाने १४ मजल्यांच्या इमारतीच्या बांधकामाच्या आराखड्याला मंजुरी दिली होती. पण प्रत्यक्षात कंपनीला असे एकूण १४ टॉवर उभारण्याची मंजुरी देण्यात आली होती आणि प्रत्येकी १० मजले आणि जास्तीत जास्त ३७ मीटर उंची अशी बंधन घालण्यात आली होती.

जून २००६ मध्ये याच अटींनुसार सुपरटेकला इमारतीसाठी सर्वाधिक जमीन देण्यात आली. मात्र २००९ मध्ये या मूळ प्रस्तावात बिल्डर्सनी बदल केला. दोन अतिरिक्त इमारती (ॲपेक्स आणि सीयान) आणि ११ मजल्यांचा समावेश त्यात केला शिवाय गृहविकासाच्या सोबत यात शॉपिंग सेंटरचा देखील समावेश करण्यात आला.

२०१२ मध्ये, ॲपेक्स आणि सीयानच्या मजल्यांची एकूण संख्या प्रत्येकी ४० पर्यंत वाढवण्याची योजना आखली गेली. मात्र रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशनने (आरडब्ल्यूए) २०१२ च्या अखेरीस अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली. यूपी अपार्टमेंट ओनर्स ॲक्ट, २०१० चा ट्विन टॉवर्सने भंग केल्याचा आरोप करण्यात आला. तर सुपरटेकच्या म्हणण्यानुसार, हे २०१० च्या नोएडा बांधकाम रिक्वायरमेंट्सच्या अंतर्गत येतं. 

भरीस भर म्हणजे मूळ माहितीपत्रकातील एका बागेच्या जागेवर ट्विन टॉवर्सने अतिक्रमण केल्याचा आरोप असून कायद्याचं उल्लंघन करून या इमारतींमध्ये १६ मीटरपेक्षा कमी क्षेत्रफळाच्या इमारती बांधण्यात आल्याचा दावा घरमालकांनी केला आहे.

२०१४ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने नोएडा ट्विन टॉवर्स पाडण्याचे आदेश दिले होते. सोबतच सुपरटेक कंपनीला असे आदेशही देण्यात आले होते की त्यांनी घर खरेदीदारांना पैसे परत करताना १४ टक्के व्याज देखील द्यावं. कोर्टाने ट्विन टॉवर्स सील करण्यास देखील सांगितलं होतं.

ऑगस्ट २०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला दुजोरा दिला होता. नियमांचं उल्लंघन करून बांधकामं केलं गेल्याचं नमूद करण्यात आलं होतं आणि टॉवर्स पाडण्याचे आदेश दिले होते.

नोएडाच्या अधिकाऱ्यांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाला माहिती दिली होती की टॉवर पाडण्याचं काम सुरू झालं असून २२ मे पर्यंत पूर्ण होण्याचं अपेक्षित आहे. सर्वोच्च न्यायालयाने तेव्हा हे टॉवर पाडण्याची अंतिम मुदत २८ ऑगस्टपर्यंत वाढवली होती. 

शिवाय असं सांगितलं गेलं होतं की हवामानामुळे किंवा काही तांत्रिक अडचणी आल्या तर २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान हे कार्य पूर्ण करण्यात यायलाच हवं. 

४० मजले बांधण्याची योजना असली तरी काही मजले कोर्टाच्या आदेशांमुळे बांधता आले नाही आणि काही मजले स्फोटापूर्वी मॅन्युअली तोडण्यात आले होते. म्हणून अखेर आज ३२ मजली एपेक्स टॉवर आणि २९ मजली सायन टॉवर पाडण्याचं ठरलं. 

याचा गवगवा का होतोय? हे बघूया.. 

पहिला मुद्दा म्हणजे इतक्या मोठया इमारतीचं पाडलं जाणं ही भारतात पहिलीच घटना होती. त्यासाठी विशेष कंट्रोल रूम आणि खास मशिनरी देखील सज्ज करण्यात आल्या होत्या. जवळपास ५०० पोलिसांचा मोठा बंदोबस्त त्यासाठी करण्यात आला होता.

आणि दुसरा मुद्दा म्हणजे हे टॉवर्स पाडण्यासाठी वापरण्यात आलेली टेक्निक. जी टेक्निक टॉवर्स पाडण्यासाठी वापरण्याचं ठरलं तिच्याने हे इतके मोठे टॉवर अगदी काही सेकंदात पत्त्यांसारखे खाली पडणार होते. आजूबाजूच्या इमारतींना त्यामुळे काहीच धोका होणार नाही असं सांगण्यात आलेलं.

सुपरटेक टॉवर्स ‘कंट्रोल्ड इम्प्लोजन’ असं या टेक्निकचं नाव.

कंट्रोल्ड इम्प्लोजनचा अर्थ म्हणजे सभोवतालचं कमीतकमी नुकसान होईल याची दक्षता घेऊन त्यानुसार प्लॅन तयार करून स्फोट करणं. या टेक्निकने इमारत एकसाथ धाडकन पडणार नाही तर हळूहळू स्टेप बाय स्टेप पडेल. आणि स्फोटानंतर इमारत बाहेरच्या नाही तर आतल्या बाजूला कोसळेल. 

या टेक्निकचा वापर जास्तकरून अशा ठिकाणी केला जातो जिथे सगळ्या बाजूंनी मोठमोठ्या सुपरटेक इमारती असतात आणि लोकंही तिथे राहत असतात. 

या टेक्निकचा वापर करण्यासाठी जवळपास १८१ दिवस तयारी करण्यात आली आणि टॉवर पडण्याचा गेम फक्त १२ सेकंदांचा होता. मुंबईच्या एडिफाइस इंजिनिअरिंग आणि आफ्रिकेच्या जेट डिमॉलीशन्स या दोन कंपन्यांना या कामाची जबाबदारी देण्यात आली होती. २१ फेब्रुवारी २०२२ पासून ३५० वर्कर आणि १० इंजिनियर हे टॉवर पाडण्याचं स्टेज तयार करण्याच्या कामात जुंपले गेले होते. 

५ स्टेप्समध्ये या इम्प्लोजन ब्लास्टचं काम ठरवण्यात आलेलं. 

पहिल्या स्टेपमध्ये इंजिनिअर्सने इमारतीची ब्ल्यूप्रिंट तयार केली आणि त्यानंतर ब्लास्टची प्लॅनिंग आणि त्यांच्या इम्पॅक्टबद्दल अभ्यास केला. दुसऱ्या स्टेपमध्ये बिल्डिंगच्या भिंती आणि खांबांवर ३५ मिलीमीटरचे ९,६४२ खड्डे पाडण्यात आले. तिसऱ्या स्टेपमध्ये इमारतीच्या भिंती आणि फरशांना जिओटेक्सटाईल कपड्याने झाकण्यात आलं. याचं कारण असं की याने धूळ जास्त उडणार नाही. 

चौथा मुद्दा – गॅसच्या पाईपलाईन फुटू नये म्हणून त्यांच्या संरक्षणार्थ स्टील प्लेट्स लावण्यात आल्या आणि ज्या साईडला लोक राहतात अशा साईडला कंटेनर वॉल बनवली गेली. पाचवी स्टेप म्हणजे भिंती आणि खांबांच्या करण्यात आलेल्या खाद्यांत ३ हजार ७०० किलो विस्फोटक लावण्यात आले. 

आज सकाळी ७ च्या आधी आजूबाजूच्या ५०० मीटरच्या अंतरातील सगळ्या १३९६ फ्लॅट्समधील नागरिकांना तिथून हलवण्यात आलं. टॉवरच्या वरील १० किलोमीटर अंतरावर नो-फ्लाय झोन म्हणून घोषित करण्यात आलं. आजूबाजूच्या परिसरात कुणाचा फिरकण्याची परवानगी नव्हती तर यमुना एक्सप्रेस-वे देखील काही काळासाठी बंद करण्यात आला.  

१२ सेकंदांच्या या कामासाठी  २ वाजून २९ मिनिट ते २ वाजून ३० मिनिट असे ६० सेकंद अत्यंत महत्वाचे होते. 

या ६० सेकंदांचा प्लॅन असा होता… 

ही प्रक्रिया ब्लॅक बॉक्स म्हणजेच डायनॅमोला सक्रिय करण्यासाठी होती. ब्लॅक बॉक्स इमारत पाडण्याचे भारतीय तज्ज्ञ चेतन दत्त यांच्या हातात असेल. ते ब्लॅक बॉक्सचे हँडल ६० सेकंदात सुमारे १० वेळा फिरवतील. हे हँडल फिरवत असताना लाल बल्ब लुकलुकायला लागेल. ज्याचा असत असा की चार्जर सक्रिय होण्यासाठी तयार आहे.

नंतर चेतन दत्ता हिरवं बटण दाबतील. यामुळे चारही डिटोनेटरवर विद्युत लहरी जातील. आणि पुढच्या ९ ते १२ सेकंदात इमारतीत एकामागून एक स्फोट सुरू होतील. स्फोट होताच पुढच्या काही ही इमारत कोसळेल. 

प्लॅनिंगनुसार हे कार्य पार पडलं आहे. इमारत पडल्याची धूळ जवळपास ४ किलोमीटर बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. ६० हजार टन काँक्रीट आणि लोखंडाचा ढिगारा यामुळे तयार होईल, असाही अंदाज देण्यात आला होता. 

ट्वीन टॉवर बांधण्यासाठी सुमारे ७०० कोटी खर्च आला होता आणि त्याला पाडण्यासाठी सुमारे २० कोटी रुपयांचा खर्च आल्याचं सांगितलं जातंय. तर त्यातून तयार होणारा ढिगारा हटवण्यासाठी ३ महिने लागतील, असा अंदाज आहे. 

३ वर्षात तयार झालेलं टॉवर अवघ्या ९ सेकंदात होत्याचं नव्हतं झालं. हे दाखवून देतं की कायद्याच्या पुढे कुणाचीच चालत नाही. चुकीचं काम करून एकदा कात्रीत आलात तर विनाश झाल्या शिवाय सुटका नाही.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.