आमिर खानचा सिनेमा गंडला म्हणून ट्विंकल खन्नाचं अक्षय कुमार बरोबर लग्न झालं…

बऱ्याच लोकांना बॉलिवूडमध्ये दोन हिरो किंवा हिरॉईनमध्ये कन्फ्युजण होतं. त्यात प्रामुख्याने येणारी जोडी म्हणजे रविना टंडन आणि ट्विंकल खन्ना. सिरियसली या दोन हिरोईन पाहिल्यावर दोन मिंटं आपणही गोंधळून जातो की भावा यातली रविना कोणती आणि ट्विंकल कोणती. तर असो आजचा किस्सा आहे ट्विंकल खन्नाचा. मेला सिनेमात जिने रूपाचा अजरामर रोल केला होता आणि या सिनेमाच्या हार जीतवर तिचं अक्षय कुमारशी लग्न होणार की नाही इथपर्यंत प्रकरण आलेलं. फिल्म हिट झाली तर मग लगीनघाई थांबवायची आणि फिल्म फ्लॉप झाली रे झाली की लगेचच लगीनगाठ बांधायची तर जाणून घेऊया किस्सा.

पण भया मेन विषयाला हात घालण्याआधी ट्विंकल खन्नाबद्दल जरा जाणून घेऊया. तर ट्विंकल खन्नाचं ओरीजनल नाव आहे टिना जतीन खन्ना. ट्विंकल खन्ना आणि तिच्या वडिलांचा अर्थात राजेश खन्ना यांचा बड्डे एकाच दिवशी येतो. न्यू एरा हायस्कूल मधून ट्विंकल खन्नाने आपलं शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण झाल्यावर सीए बनण्याची तिची इच्छा होती. ही प्रेरणा तिची स्वतःचीच होती, म्हणजे सीए आपल्याला बनायचंच आहे याचा तिने इतका प्रेशर घेतला की कोणालाही न सांगता तिने इन्ट्रान्स एक्झाम दिली होती. आता तिने परीक्षा दिली खरी पण तिच्या घरचे तिच्यापेक्षा डेंजर होते बोलले की हे अभ्यास वैगरे सोड आणि फिल्म इंडस्ट्रीत ये. ( यांच्या घरचे लोकं एका बाजूला आणि इंजिनिअर, डॉक्टर हो म्हणुन पोरांना दबावात आणणारे घरचे एका बाजूला, पण इलाज नाहीए, चालायचंच…)

तर मग ट्विंकल खन्ना बॉलिवूडमध्ये आली ते बरसात सिनेमाच्या निमित्ताने, बरसात हा तिचा बॉलिवूडचा डेब्यु सिनेमा होता. पण हा सिनेमा शूट झाला आणि रिलीज होण्याच्या अगोदरच ट्विंकल खन्नाने दोन सिनेमे साइन करून टाकले. सीए नको होऊ म्हणल्यावर घरच्यांच्या आग्रहास्तव तिनेही ठरवलं की ठिके आपण सिनेमा एके सिनेमा करूया. आता बॉलिवूडमध्ये आगमन झालं आणि अफेअरचे पेव फुटणे कंपल्सरी असतं म्हणून तेव्हा ट्विंकल खन्नाच्या लव स्टोरीज सुरू झाल्या यात पहिलं नाव येतं ते म्हणजे अक्षय कुमार.

एका फिल्म मॅगझीनचं शूट होतं आणि त्याच्या कव्हर पेजच्या शूटिंग वेळी अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना भेटले. याआधी एका सिरीयस रिलेशनशिप मधून ट्विंकल खन्ना बाहेर पडू पाहत होती आणि त्या वेळी तिला अक्षय कुमार भेटला आणि वयक्तिक आयुष्यात तोच तिला महत्वाचा वाटू लागला.

पण त्याच्यासोबत नॉन सिरीयस टाईप रिलेशन तिचं सुरू राहिलं. दोघांनाही वाटलेलं की 15 दिवसांपेक्षा जास्त काळ आपलं रिलेशन टिकणार नाही पण दोघेहि तितकेच सिरीयस झालेले होते.

दोघांनी लवकरच साखरपुडा केला पण दुसरीकडून ट्विंकलला कळलं की अक्षय कुमारचं शिल्पा शेट्टी सोबत अफेअर आहे तर तिने साखरपुडा तोडून टाकला. जेव्हा अक्षयने ट्विंकल खन्नाला प्रपोज केलं तेव्हा ती मेला या सिनेमाचं शूट करत होती. अक्षय कुमारच्या कौतुकाच्या गप्पा ऐकून तेव्हा अमीर खान वैतागला होता.

जेव्हा अक्षय कुमारने तिला परत एकदा लग्नाबद्दल विचारलं तेव्हा ती म्हणाली की जर मेला सिनेमा हिट झाला तर तू माझा विचार सोडायचा आणि जर मेला आपटला तर आपण लग्न करूयात.

नंतर डिंपल कपाडिया जी ट्विंकल खन्नाची आई होती ती म्हणाली की दोघांनी एक वर्ष लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहायचं जर दोघे कम्फर्ट असेल तरच लग्न होईल.

दोघांनी तस केलं. योगायोगाने आमिर खानने आपल्या भावाला लॉन्च करण्यासाठी बनवलेला महत्वाकांक्षी सिनेमा मेला मोठा सुपरफ्लॉप झाला. आमिर खान गंडला आणि इकडे वर्ष भरात ट्विंकल व अक्षयने लग्नाचा बार उडवून टाकला. 

लग्नानंतर मात्र ट्विंकल खन्नाने अभिनय करायचं बंद केलं आणि ती लेखिका झाली पण इकडं अक्षय कुमारचा दणका सुरूच आहे, वर्षाला चार पिच्चर आरामशीर. तर अशी ही लव स्टोरी होती जी सिनेमाच्या हिट फ्लॉप वर अवलंबून होती. पण आजही अक्षय कुमार आमिर खानला त्याच्या त्या फ्लॉप सिनेमाबद्दल धन्यवाद देतो.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.