साखर कारखान्यात देखील होणार नाही असं राजकारण ट्वीटरच्या ऑफिस मध्ये झालं होतं..

देशभरातल्या घडामोडी फक्त एका क्लिकवर मिळणाऱ्या काळात आपण जगतोय. थोडक्यात बोलायचं झालं तर जीवनावश्यक वस्तूंमध्ये आता सोशल मीडियाचा ही समावेश करावा लागेल हे म्हणणं काही अतिशयोक्ती ठरणार नाही.

आणि त्यातल्या त्यात एक माध्यम ज्याने अख्खं जगच बदलून टाकलं. ते म्हणजे ट्विटर !

ट्विटर ला खऱ्या अर्थाने तरुण म्हणता येईल, कारण याचे संस्थापक म्हणजेच इव्हान विल्यम्स, नोआ ग्लास, जॅक डॉर्सी, ख्रिस्तोफर उर्फ बिझ स्टोन ही तरुण पोरं आहेत. वर तुम्ही त्या चौघांचा फोटो तर पाहिलाच असेल, दिसायला स्मार्ट आणि डोक्याने ही स्मार्ट!

ह्याच तरुण पोरांच्या सुपीक डोक्यातून ट्वीटर जन्माला आलं.  तर मग आज आपण जगाला वेड लावलेल्या ट्विटर या कंपनीचा इतिहास (इतिहास कसला काहीच वर्षांपूर्वी तर ट्विटर आलंय.) बघूया.

ट्विटरच्या जन्मकहाणीचा शोध घेता घेता काही अशा काही थ्रिलिंग गोष्टी समोर आल्यात कि, तुमचंही डोकं फिरेल. ऑफकोर्स इतक्या तरुण कंपनीच्या जन्मामागे काही भन्नाट घडामोडी तर घडल्याच असणार ना.. अगदी तसंच इथेही झालं.

आपल्याला याची आयडिया तर आहेच कि, कॉर्पोरेट लाईफ कसं असतं ते, ऑफिस मधली पॉलिटिक्स, स्पर्धा, चुरस, तुलना, प्रमोशन मिळवण्यासाठी चालू असलेली केविलवाणी धडपड अशा बऱ्याच गोष्टी बहुतेक कंपन्यांमध्ये चालू असतात. ट्विटर ऑफिसमध्येही हेच चाललं होतं. इतकच नाही तर कंपनीच्या सीईओच्या च बाबतीत झालेले राजकारण इतका टोकाला गेलं की मीटरचा मूळ जनक कोण आहे हे ठरवणे ही मुश्किल होऊन बसलं होतं.

ज्या दोन माणसांच्या डोक्यातून ट्विटर ची मूळ संकल्पना जन्मली त्याच दोघांची ट्विटर मधून हकालपट्टी करण्यात आली होती. शॉकिंग आहे ना?

आता तुम्ही म्हणाल ट्विटरचे तर टोटल चार संस्थापक आहेत. पण ज्यांची हकालपट्टी झाली तेही ट्विटर चे संस्थापक होते. थोडक्यात बोलायचं झालं तर, नोआ ग्लास आणि जॅक डॉर्सी या दोन तरुणांच्या डोक्यात  ट्विटरची मूळ संकल्पना होती. या दोघांना इव्हन विल्यम्स उर्फ इव्ह या यशस्वी तंत्रज्ञ गुंतवणूकदाराने कामावर घेतलं होतं. आता नोआ ची इच्छा होती कि, त्याने सुरू केलेल्या कंपनीमध्ये इव्हने गुंतवणूक करावी. सुरुवातीला इव्ह ला वाटत होतं की या व्यवहारामुळे त्यांच्या मैत्रीवर परिणाम होऊ नये, पण शेवटी त्याने गुंतवणूक केली.

नोआ आणि जॅक यांच्या मूळ संकल्पनेतून इव्हनं गुंतवणूक केलेल्या एका दुसर्‍या कंपनीतून ट्विटर चा जन्म झाला. त्यात त्यांनी चौथ्या संस्थापकाला बीज स्टोन यालाही सामील करून घेतलं.

काही काळातच नोआ ची ट्विटर मधून हकालपट्टी करण्यात आली. त्याचं झालं असं कि, ट्वीटर लॉन्च व्हायच्या आधीच ट्वीटरची घोषणा नोआ ने दारूच्या नशेत पबमधल्या सगळ्यांना सांगून टाकली होती. त्यामुळे त्याचे संबंध ऑफिस मधल्यांसोबत बिघडत चालले होते. नोआ आणि जॅक यांची मैत्री असूनही जॅककडे ट्विटरची सगळी सूत्र आली. 

ट्वीटरचं काम जोरात सुरु झालं, त्याबरोबरच नोआ च्या कुरापात्याही. जॅक ऑफिसमधल्या आणि जॅक च्या कामात अडथळे आणायचा, इतरांना दिलेली काम नोआ काढून घेई आणि स्वतः वेगळीच कामं त्यांना द्यायचा त्यामुळे ट्विटरचं काम ज्या वेगाने पुढे सरकणे अपेक्षित होतं त्याहून खूप मंदगतीने कामाचा प्रवास सुरू होता. या सगळ्या प्रकारामुळे जॅक पुरता वैतागून गेला.

जर या कंपनीत नोआ कायम राहिला तर मी राजीनामा देईल अशीच अट त्याने समोर ठेवली. नोआ मुळे ओडिओ आणी ट्विटर या दोन्ही कंपन्या अडचणीत येण्याची शक्यता होती त्यामुळे इव्ह ने कंपनीच्या संचालकांशी चर्चा केली आणि 26 जुलै 2006 ला नोआ ला बाजूला काढलं.

हे सगळं जरा विचित्र होतं, पॉडकास्टिंगची मूळ संकल्पना नोआ ची होती. त्यानेच एक ओडिओ ही कंपनी काढायचा निर्णय घेतला होता, त्याच्या भांडवलासाठी त्याने इव्हकडे मदत मागितली होती परंतु त्या बदल्यात इव्ह ला कंपनीचा सीईओ पद आणि सगळे अधिकार हवे होते आणि ते त्याला देऊ हि केले होते. त्यानंतर जॅक आणि नोआ या दोघांमुळे ट्विटर साकारले गेले. परंतु नंतर नोआ विषयी तक्रारी वाढू लागल्या आणि तो कंपनीत प्रत्येकाना नकोसा वाटू लागला. 

नोआला घालवल्या नंतरही ट्वीटर फारशी प्रगती करत नव्हता.  ट्वीटर कशाप्रकारे लोकांपर्यंत पोहचवावे याच विचारात सगळे बुडून गेलेले असायचे.

यादरम्यान दोन हजार सहा मधल्या ऑगस्ट महिन्यात जॅकचा मोबाईल व्हायब्रेट झाला. इव्ह चा msg त्याने अर्धवटच वाचला तेवढ्यात त्याला कळलं की तिथे भूकंपाचे धक्के बसत आहेत. इव्ह चा msg भूकंपाविषयीच होता. तेवढ्यात ट्विटरवरून आणखी एका व्यक्तीने भूकंपाविषयी चा मेसेज पाठवला. जॅक एकदम खुष झाला त्या नाही आपल्याला भूकंप झाल्याचं जाणवलं असं ट्वीट पाठवलं. मेसेज वाढतच गेले.

प्रत्यक्षात या भूकंपामुळे फारसं नुकसान झालेलं नसलं तरी त्या भूकंपाने ट्विटरच्या विश्वास मात्र चांगलीच खळबळ माजवली.

 2007 मध्ये ट्विटरची घोडदौड खूप पुढे गेली. काही कंपन्यांनी ट्विटर विकत घेण्यात आपल्याला इंटरेस्ट असल्याचे ट्विटरच्या व्यवस्थापनाला बोलून दाखवलं, अर्थातच ट्विटर विकण्याची जॅक, इव्ह आणि बीझ इच्छा नव्हती परंतु शेअर बाजारात आपला भाव काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता त्यांच्यात होती. यासाठी याहू ने विकत घेण्याची इच्छा दाखवली परंतू खूप कमी किंमतीत त्यामुळे या तिघांनी हा विचार सोडला आणि ट्वीटर च्या प्रगती वर लक्ष केंद्रित केलं.

ट्विटरचा व्याप यानंतर वाढतच राहिला. दर महिन्याला लाखोंच्या संख्येने नवे युजर ट्विटर वापरायला लागले. याच काळात ट्विटरवर अगदी सहजपणे वापरले जाणारे #, @ हि चिन्हे ही सुरु केली.

एकीकडे ट्विटरची प्रगती सुरू असताना दुसरीकडे जॅक ला सीईओ पदाची जबाबदारी अजिबात पार पाडता येत नसल्याचे चित्र दिसत होतं. ट्विटर ची वेबसाईट वारंवार बंद पडत असायची त्याबाबतही जॅकने फारसे प्रयत्न केले नव्हते. यूजर्स सातत्याने तक्रार करत असताना देखील जॅक ने ते गांभीर्याने घेतले नव्हते. प्रकरण वाढत गेलं ट्विटर मध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी ही शेवटी हात टेकले.

ट्विटर चा प्रवास इथून पुढे चांगला व्हायचं असेल तर जॅकला पदमुक्त करणे गरजेचं आहे असं त्यांचं मत होतं.  त्यानंतर इव्ह आणि बीज एकत्र झाले आणि इव्हने जॅकला पण हाकलून दिले आणि कंपनीचं नियंत्रण स्वतःकडे घेतलं. आणि जॅकला नावापुरतं 2 वर्षे ट्वीटरमध्ये ठेवलं गेलं.

अशा रीतीने नोआ आणि जॅक यांच्या डोक्यातून ट्विटर ची मूळ संकल्पना जन्मली त्याच दोघांची आता त्याच ट्विटर मधून हकालपट्टी झाल्याची विचित्र परिस्थिती निर्माण झाली. एवढं होऊन हे नाटक इथेच संपलं नव्हतं.

दरम्यानच्या काळात नोआ आणि जॅक यांची भेट झाली दोघेही एक प्रकारे समदु:खी होते दोघांनाही ट्विटर मधून बाहेर काढण्यात आलं होतं.

ट्विटरच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे अनेक मोठमोठ्या लोकांचं लक्ष ट्विटर कडे वळलं होतं यात ममाजी अमेरिकी उपराष्ट्रपती अल गोर यांचाही समावेश होता.  ट्विटरला मिळत असलेल्या यशामुळे आणि प्रसिद्धीमुळे दोघेही एक प्रकारे सुखावत असले तरी दुसरीकडे आपण या यशाचे वाटेकरी बनू शकत नाही याचं दुःख दोघांनाही व्हायचं.

जॅकने त्यानंतर ट्विटर विषयी मुलाखती देण्याचा आणि वेगवेगळे दावे करण्याचा सपाटाच लावला.

सगळीकडेच आपल्या डोक्यातून पीटर कशी जन्मली याचं गुणगान जॅक करत राहायचा. सगळीकडेच त्याचं ट्विटरचा फाउंडर म्हणून मुलाखती छापून यायच्या.

जॅक च्या या विचित्र खेळीमुळे इव्ह आणि बिझ वैतागून गेले होते. त्यानंतर 2007 ते 2008 मधे ट्विटरच्या वाढीचा वेग थांबतच नव्हता, त्यात संचालक मंडळाला इव्ह च्या कामावरून असा संशय निर्माण होत होता की, इव्ह सीईओ म्हणून कमी पडतो आहे. याबद्दल काही उपाय योजना म्हणून त्यांनी मार्गदर्शक म्हणून c.e.o. कोच पाहिला, बील कॅम्पबेल. जनी याअगोदर ॲपलचा स्टीव्ह जॉब्ज, गुगलचे एरिक, सर्गी बिन, लॅरी पेज अशाच जगप्रसिद्ध लोकांना मार्गदर्शन केले होते.

कुणीतरी आपला मार्गदर्शक म्हणून काम करणं इव्हला अजिबात पसंत नव्हतं, कहर म्हणजे यानंतर दुसरीकडे इव्हच्या विरोधात संचालक मंडळाच्या तक्रारी वाढत गेल्या आणि यात जॅक चा मोठा हात होता. मात्र इव्ह ला ट्विटर मधून बाहेर काढली जाण्याची बातमी सांगणं हेच एक मोठं आव्हान होतं आणि ते आव्हान पूर्ण केलं त्याच्या सी ई ओ ने. आणि यानंतर पुन्हा जॅकने ट्वीटर मध्ये पुनरागमन झालं.

अशाप्रकारे ट्विटरच्या या 4 फाउंडर्सची स्टोरी वाचत असताना तुम्हाला एखादा मूवी किंवा सिरीज ची स्टोरी वाटली असावी.

माणसाने माणसाशी कसे वागावे आणि कसं वागू नये याचा उत्तम नमुना ट्विटर मध्ये बघायला मिळतो. तसेच एखाद्या गोष्टीच्या यशामध्ये आपला खरा वाटा किती आहे याची जाणीव न ठेवता सगळं श्रेय लाटण्यासाठी माणसं कशी धडपड करतात हेही यात दिसेल.

तुम्ही इथून पुढे कुठल्याही कंपनीमध्ये काम करण्यासाठी जॉईन होताय तर त्यापूर्वी ट्विटरची स्टोरी नक्कीच वाचा, जेणेकरून तुम्हाला कॉर्पेरेट क्षेत्रामधील राजकारणाची कल्पना येईल. एव्हाना तुम्ही समजून गेला असणारे कि, आपल्याकडचे अट्टल राजकारणी देखील करू शकत नाहीत असं राजकारण ट्वीटर च्या ऑफिस मध्ये झालं.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.