आर्यन खान आणि सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ट्विटर कनेक्शन समोर आलंय

क्रूझ पार्टी प्रकरणात बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक झाली आणि सगळ्या देशात कल्ला झाला. आर्यनला जामीन मिळाल्यावर विषय जरासा थंडावला असला, तरी सोशल मीडियावर मात्र अधूनमधूनही राडा सुरू असतोच.

सोशल मीडियावर आणखी एक विषय अधूनमधून राडा करत असतो, तो म्हणजे सुशांत सिंग राजपूत. आता सुशांत सिंगचं निधन होऊन वर्ष होऊन गेलं. तरी ट्विटरवर सुशांतला न्याय द्या म्हणणारे, सीबीआय चौकशी बसवा म्हणणारे ट्रेंड्स फॉर्ममध्ये येतातच. बरं हे ट्रेंड किरकोळीत चालत नाय, तर डायरेक्ट टॉपला जातात. आर्यन खान प्रकरणात पण हे ट्विटर ट्रेंड्स सुरू होतात आणि टॉपला जातात.

तुम्हाला प्रश्न पडला असेल की यात कनेक्शन कुठंय भिडू? सांगतो.

अमेरिकेतल्या मिशिगन युनिव्हर्सिटीतले जोयोजित पाल आणि आयआयटी हैदराबादच्या ललिता कमेश्वरी यांनी ट्विटर ट्रेंड्सबद्दल केलेल्या अभ्यासातून हे कनेक्शन समोर आलं आहे.

सुशांत सिंग प्रकरणातले ट्विटर ट्रेंड्स-

सुशांतला न्याय द्या, त्याचा खून झालाय हे सिद्ध करा, आरोपींना अटक करा, चौकशी बसवा या विषयांशी संबंधित हॅशटॅग सुशांत सिंगच्या आत्महत्येनंतर अजूनही ट्रेंडिंगमध्ये येतात. हे हॅशटॅग ट्रेंड करणारे अकाऊंट्स मुख्यत्वे बॉलिवूडच्या विरोधात ट्विट करतात.

आर्यन खान प्रकरणातले ट्विटर ट्रेंड्स-

आर्यन खानला अटक झाल्यानंतर त्याच्या विरोधातले आणि त्याला पाठिंबा देणारे हॅशटॅग्स ट्रेंड झाले. पाल यांच्या निष्कर्षांनुसार आर्यनला अटक झाल्यावर त्याच्याविषयी एका तासाला साधारण ५०० ट्विट्स पडत होते. त्यानंतर, पुढच्या काही दिवसात ट्रेंड्स सुरू असले, तरी त्यांचा वेग काहीसा मंदावला होता. जेव्हा शाहरुख खान आर्यनला भेटायला आर्थर जेलमध्ये गेला, तेव्हा आर्यन खानबद्दलच्या ट्विट्सची सरासरी तासाला ४०० ट्विट्स अशी होती. जेव्हा आर्यनला जामीन मिळाला तेव्हा ट्विट्सची संख्या तासाला १४०० ट्विट्स पर्यंत गेली. यात आर्यनला पाठिंबा देणारे आणि विरोध करणारे असे दोन्ही ट्रेंड्स होते.

सोबतच आर्यन खान प्रकरणात महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना लक्ष्य केलं. तेव्हा #NCBExtortionExposed हा हॅशटॅग वानखेडे यांच्या विरोधात ट्रेंड होऊ लागला. लागलीच #ISupportSameerWankhede, #NationWithSameerWankhede हे हॅशटॅग देत बरेच ट्विट झाले. या प्रकरणाशी संबंधित जवळपास प्रत्येक हॅशटॅगच्या विरोधातला हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये येत होता.

आर्यनच्या विरोधात ट्विट करणाऱ्या अकाऊंट्सनं शाहरुख खान ज्या ब्रॅण्ड्सची जाहिरात करतो त्यांनाही लक्ष्य केलं. #BoycottByjus हा हॅशटॅग ट्रेंड झाल्यानंतर, बायजुस कंपनीनं शाहरुखची भूमिका असलेल्या जाहिराती प्रकाशित करणं थांबवलं.

आर्यनला पाठींबा कुणी दिला-

शाहरुख खानच्या चाहत्यांनी आर्यनला पाठिंबा देणारे हॅशटॅग्स चालवले. सोबतच, काँग्रेस खासदार शशी थरूर, उर्मिला मातोंडकर, ऋतिक रोशन, पूजा भट्ट, हंसल मेहता अशा सेलिब्रेटींनी आर्यनला ट्विटरवरुन पाठिंबा दिला. ट्विटरवर ४ लाखांहून अधिक फॉलोवर्स असलेल्या ‘Shah Rukh Khan Universe Fan Club’ या अकाऊंटनं मात्र आर्यन खान प्रकरणात ट्विट करणं टाळलं.

सुशांत आणि आर्यन प्रकरणातलं कनेक्शन नेमकं काय?

पाल यांच्या निष्कर्षांनुसार जे अकाऊंट्सवरून सुशांत सिंगला न्याय द्या किंवा चौकशी करा अशा आशयाचे ट्विट्स झाले, त्याच अकाऊंट्सवरून आर्यन खानच्या विरोधातले ट्रेंड्सही चालवले गेले.

सुरुवातीला आर्यन खान प्रकरणातले ट्विट्स अशा अकाऊंट्स वरून झाले, जे फारसे प्रसिद्ध नाहीत आणि त्यांना कमी फॉलोवर्स आहेत. त्यांनतर, जास्त फॉलोवर्स असलेल्या अकाऊंट्सनं या कमी फॉलोवर्सवाल्या अकाऊंट्सनं टाकलेले ट्विट आणि हॅशटॅग्स चालवले. पर्यायानं रिट्वीट्सचा आणि हॅशटॅगमध्ये एंगेज होणाऱ्यांचा आकडा वाढला. साहजिकच हे हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये वरच्या क्रमांकावर गेले.

सुशांतच्या मृत्यूनंतर ज्या पॅटर्नमध्ये ट्विटर हॅशटॅग्स ट्रेंड झाले, त्याच पॅटर्नमध्ये आर्यनच्या अटक आणि सुटकेनंतर हॅशटॅग्स ट्रेंड झाले. विशेष म्हणजे, सुशांतच्या मृत्यूनंतर, बॉलिवूड अभिनेत्यांना विरोध करण्यात आला. त्यांचं आर्थिक प्रभुत्व कमी करण्यासाठी ते काम करत असलेल्या ब्रॅण्ड्सना लक्ष्य करण्यात आलं. आर्यनच्या अटकेनंतरही हाच प्रकार घडल्याचं, पाल यांच्या अभ्यासातून पुढं आलं आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.