कानपूरच्या दोघा भावांनी निरमाला फाईट देईल असा ब्रँड बाजारात आणला होता.

पहले इस्तेमाल करे फिर विश्वास करे….

हि जिंगल सगळ्यांची एकदम चालीत पाठ आहे. म्हणजे हि लाईन जरी ऐकली तरी कळतं की घडी साबणाची जाहिरात आहे म्हणून. हि टॅगलाईन घेऊन घडी हा ब्रँड बरीच वर्ष आधी मार्केटमध्ये उतरला आणि आजही तेजीत हा ब्रँड खपला जातो. जितकी हवा आणि लोकप्रियता घडी ब्रँडची आहे तितकीच अप्रतिम गोष्ट आहे घडी ब्रॅण्ड कसा बनला त्याची.

घडी डिटर्जेन्टची सुरवात केली ती कानपूरच्या मुरली बाबू आणि बिमल ज्ञानचंदानी या दोन भावांनी. कानपूरमध्ये दोघेही वाढले आणि व्यवसायात हात आजमावू लागले. दोघा भावांनी मिळून कानपूरच्या फजलगंज फायर स्टेशनजवळ एक डिटर्जेंटची फॅक्ट्री सुरु केली.

फजलगंज मधील ही फॅक्टरी भलेही छोटी होती मात्र दोघं भावांनी स्वप्न खूप मोठी पाहिली होती.

मेहनत आणि कामाला प्रामाणिकपणे पुढे न्यायचं या वृत्तीच्या जोरावर दोघे भाऊ झटत होते. दोघांनी मिळून शहरात श्री महादेव सोप इंडस्ट्री या नावाने फॅक्ट्री सुरु केली. पण बरीच वर्ष ते काम रेंगाळत राहिलं आणि काही नफा सुद्धा त्यातून मिळाला नाही. मध्ये इतका काळ वाया गेला होता कि जर कोणी दुसरा असता तर हे सोडून नवीन काहीतरी धंदा टाकून चार पैसे मिळवू म्हणला असता. पण या दोघं भावांनी जिद्द सोडली नाही आणि आपल्या निर्णयावर ते ठाम राहिले. 

मुरली बाबू आणि बिमल ज्ञानचंदानी दोघांनी मिळून उत्तर प्रदेशात आपल्या ब्रॅण्डची जाहिरात करायला सुरवात केली. जास्तीत जास्त वेगाने त्यांनी आपला ब्रँड लोकांमध्ये पोहचेल अशा युक्त्या केल्या.

त्याकाळी घडीला प्रतिस्पर्धी म्हणून निरमा आणि व्हील हे तगडे ब्रँड बाजारात आले होते. आता यांना मागे टाकून पुढे कसं जायचं हा मोठा प्रश्न  होता पण दोघा भावांनी घडीचं स्वरूप बदललं आणि वेगळ्या प्रकारे घडीला बाजारात उतरवलं.

जास्तीत जास्त डिटर्जेंट हे पिवळ्या आणि निळ्या रंगातले होते पण दोघं भावांनी पांढऱ्या रंगात डिटर्जेंट बाजारात उतरवलं. 

पण घडीच सगळ्यात आकर्षक वैशिष्ट्य होतं ते म्हणजे टॅगलाईन. पहले इस्तेमाल करे फिर विश्वास करे या टॅगलाईनने मार्केटमध्ये आगमन केलं आणि घडी सुपरहिट ठरली. उत्तर प्रदेशात व्यवस्थित बस्तान बसवल्यानंतर घडीने इतर राज्यांमध्ये मार्केटिंग सुरु केली.

घडीची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना कमिशन देऊ केलं जेणेकरून लोकांमध्ये घडी अधिकच वेगाने पोहचू लागली. मध्यमवर्गीय लोकांमध्ये हा ब्रँड विशेष लोकप्रिय ठरला. देशातील असं एकही घर नसेल जिथं घडी डिटर्जेंट वापरली गेली नसेल. २००५ साली कंपनीचं नाव बदलून RSPL केलं. आज घडी हा ग्रुप देशातल्या नामांकित कंपन्यांपैकी एक आहे.

ग्रामीण भागात जास्तीत जास्त पोहचून घडी ब्रँडने आपला प्रचार आणि प्रसार वाढवला. कमी किंमत ठेवून घडी डिटर्जेंट सामान्य लोकांना परवडू लागली त्यामुळे साहजिकच खप वाढून अधिक मागणी होऊ लागली. इतर डिटर्जेंटचे भाव ज्यावेळी जास्त होते तेव्हा खासकरून मध्यमवर्गीय लोकांच्या सोयीचा आणि परवडणारा ब्रँन्ड म्हणूनज घडीने ओळख मिळवली.

एके काळी एका छोट्याश्या फॅक्ट्रीपासून सुरवात केलेला घडी ब्रँड तयार केलेल्या दोन भावांनी आज घडीला मार्केटमध्ये १२ हजार करोडची उलाढाल करत आहे. बऱ्याच काळापासून घडी अगदी कमी दारात विक्री करत असल्याने सामान्य लोकांच्या आवडीचा हा ब्रँड आहे.

कानपूरच्या या दोन भावांनी जिद्द न सोडता केवळ मेहनत आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर आपला ब्रँड जागतिक पातळीवर पोहचवला. घडीची टॅगलाईन मात्र आजही लोकांचं लक्ष वेधून ब्रॅण्डची जाहिरात करत असते की,

आधी वापरून पहा मग विश्वास ठेवा……

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.