दोन इंजिनियर पोरांनी रिझर्व बॅंक लुटली होती…

फुल्ल कॅम्पस म्हणून आपल्या पोरांनी इंजिनिअरींग केलं. ज्वारी, बाजरी उगवायची तिथ इंजिनिरींग, BCA, BBA कॉलेज उगवली. आमच्या गावातल्या इंजिनिअरींग कॉलेजला तर पोरं जोंधळ्याचं कॉलेज म्हणायचे. आजू बाजूला मोक्कार जोंधळा आणि मध्येच हे कॉलेज. पण मोठ्ठ व्हायचं असल तर शिकलं पाहीजे त्यात फुल्ल कॅम्पस म्हणल्यानंतर देणगी द्यायला पण आपले लोक तयार. 

त्यात कॉलेज आम्ही किती भारी ते सांगायचं. माजी विद्यार्थी थ्री पीस घालून कुठल्यातरी मोठ्या कंपनीत किती छान पगार घेतात वगैरे सांगायचे. काळ गेला आणि VFX कळालं. गड्या थ्री पीस घालून बसलेला माजी विद्यार्थी २०० रुपये हजरीने इंग्लीश बोलून दाखवतो हे कळलं आणि या संबध इंजिनीरींग विश्वावरचा विश्वास उडला. आत्ता इंजिनिरींग गेल तर हातात फक्त असल्याच दूसऱ्या कॉलेजवर पोरांना येड्यात काढायला जायला लागतं हे लक्षात आलं. 

वेगळं करायचं म्हणून काही इंजिनिरींग लोकांनी कोर्सेस केले. लागणारे लागले, राहिलेले MPSC करायला आले. त्यातही उच्चवर्गीय मानसिकता असणारे UPSC कराय लागले. ज्यांच चाललय ते नांदेड सिटीत फ्लॅट घ्यायलेत बाकीचे इकडं पेठेतल्या खॉट बेसिसवर MPSC करायला लागलेत. 

असो, पण याहून वेगळं जग आहे याची जाणिव दोन इंजिनियर झालेल्या पोरांना झालेली त्यांनी टकाटक प्लॅन करुन थेट रिझर्व बॅंक लुटली होती. आणि ती पण फुल्ल सक्सेसफुल्ल. पण एक मॅटर झाला आणि या दोघांच कांड सबंध भारताच्या समोर आलं. 

तर आत्ता मुळ कथेला सुरवात करु. 

गुडगाव अर्थात आत्ताच गुरूग्राम इथे एक कंपनी होती. RBI न एक डेंटर काढलेलं आणि त्या कामासाठी या कंपनीवर जबाबदारी टाकण्यात आली होती. कंपनीच काम होतं मॅकेनिकल सपोर्ट. म्हणजे मशीनमध्ये काय प्रोब्लेम वगैरे आला तर हि कंपनी बघायची. 

RBI कडे एक मशीन होती. CVPS. म्हणजेच करंसी व्हेरिफिकेशन मशीन. हि मशीन काय करायची तर ताशी पन्नास ते साठ हजार नोटा मोजून त्या व्हेरीफाय करुन त्याचा डेटा सेव्ह करुन, त्याचे गड्डे बांधून ठेवायची. म्हणजे सिनियर कॅशियर. त्या मशीनचा मेन्टेनन्स पहायसाठी कंपनीने या दोघांना RBI साठी म्हणून नियुक्त केलेलं. म्हणजे काहीही फॉल्ट असेल तर तो काढायला इंजिनियर उपलब्ध होते. 

या दोन पठ्यांच नाव सियाशरण त्रिपाठी आणि अमित शर्मा. आत्ता झालं अस की मशीनमध्ये फॉल्ट आला. फॉल्ट असा होता की नोटा रिड करायच्या बंद झालेलं. म्हणजे डेटा कार्डचा प्रोब्लेम आलेला. किती नोटा मोजल्या गेल्यात तेच समजू शकत नव्हतं. फॉल्ट आला आणि या दोघांना बोलवण्यात आलं. 

आत्ता दोघांचा प्लॅन आज रिझर्व बॅंक लुटायची असा ठरलेला. एक छोटा राडा केला तरी RBI काय FBI वाले आली तरी पकडले जाणार नाही असा प्लॅन होता. 

ते दोघे आले आणि त्यांनी थेट कार्ड बदललं. आत्ता नविन कार्ड नवीन डेटा. जुन्या नोटांचा टेडा नव्हता. स्टोर नव्हत्या की मोजल्या गेल्या नव्हत्या. पठ्यांनी अंगाखांद्याखाली 23 लाख 90 हजार कोंबले. झटक्यात सर्व सोपस्कार पुर्ण झाले. आत्ता ते त्याच कॉन्फिडन्समध्ये रिझर्व बॅंकेच्या बाहेर पडू लागले. 

पण सुरक्षारक्षकांना त्यांच्यावर संशय आला. आत्ता काम करतोय का ? अशा फिलमध्ये त्या दोघांची झडती घेतली तर थेट 23 लाख 90 हजार रुपये हाताला लागले. मग काय घेतलं राऊंडात. ते दोघं सध्या काय करतायत तर आतच आहेत त्याच कारण म्हणजे ती काय सदानंद पतसंस्था नव्हती. RBI होती RBI होती. २०१६ ला ते त्यांना अटक केलेलं. 

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.