भावा कोल्हापूरच्या ‘या’ दोघींचा विषयच हार्ड हाय..!

उद्योजक होण्याचं स्वप्न उराशी बाळगून अनेक तरुण वाटचाल करतात. पण, येणारे अनेक वाईट प्रसंग पाहून अनेकजण  उद्योजक होण्याच सोडून देतात. कारण त्यासाठी लागणारी प्रबळ इच्छाशक्ती त्यांच्यात नसते.

पण, कोल्हापुरातल्या २ तरुणी यांची स्टोरी ऐकली तर तुम्हीही म्हणालं की भावा ‘या’ दोघींचा विषयच हार्ड हाय..!

कारण कोल्हापूरच्या ऐश्वर्या आणि शर्वरी या दोघींनी आयटी आणि मॅनेजमेंट क्षेत्रातील चांगल्या नोकऱ्या सोडून ‘Stemine Mugs’ नावाचा कॅफे सुरु केलाय. आणि तो त्या यशस्वीरित्या सांभाळत आहेत.

त्याचं झालं असं की, इंजिनिअर आणि मॅनेजमेंट क्षेत्रात सेटल व्हायचं म्हणून कोल्हापुरातल्या जरगनगर आणि साने गुरुजी वसाहतीत राहणाऱ्या ऐश्वर्या डाळे आणि शर्वरी सूर्यवंशी या दोघींनी स्वप्न पाहिलं. ऐश्वर्याने MBA तर शर्वरीने  आयटी क्षेत्रातील शिक्षण पूर्ण केलं.

पुण्यात या दोघींनी चांगली नोकरीही मिळवली. पण, स्वत:चं काहीतरी सुरु करावं ही खंत या दोघींनाही स्वस्थ बसू देत नव्हती.

रात्रभराच टाईट शेड्युल करून जेव्हा या निवांत व्हायच्या तेव्हा सतत हे आपण का करतोय?, आपण स्वत:चं काहीतरी सुरु करू शकतो, या विचाराने त्या अस्वस्थ व्हायच्या. जेव्हा या दोघी कुठे नाश्ता करायला थांबायच्या त्यावेळी एखादा पदार्थ खाऊन त्यांना वाटायचं की, यापेक्षा चांगलं तर आपण करू शकतो, आणि हाच मुद्दा त्यांनी सत्यात उतरवला.

पुण्यातल्या वेल सेट नोकऱ्या सोडून त्या कोल्हापुरात आल्या आणि कॅफे सुरु करण्याची प्रोसेस सुरु केली.

यासाठी त्यांना सगळ्यात मोठा पाठींबा मिळाला तो त्यांच्या कुटुंबियांचा. शर्वरीचे लग्न झाले असल्याने तिच्यावर कौटुंबिक जबाबदारी अधिक आहे. पण, घरची आणि कॅफेची जबाबदारी ती अगदी लीलया पेलत आहे.

या दोन्ही मुली एकमेकींच्या जिवलग मैत्रिणी आहेत. त्यामुळे या दोघींची गट्टी कॉलेजपासून अगदी चांगलीच जमली आहे. तीच त्यांनी हा कॅफे सुरु करतानाही कायम ठेवली आहे. शर्वरी म्हणते,

“उद्योग सांभाळायचा तर त्यात समजूतदार असणं जास्त महत्त्वाचं असतं, आणि तेच आमच्या दोघींमध्ये  आहे.”

या दोघींचा कॅफे सुरु होऊन ४ महिने झालेत.पण, अगदी कमी वेळेत त्या इथल्या फेवरेट झाल्या आहेत.

कॉलेज ग्रुप तर इथं हक्कानं येतात. अगदी ‘ताई, मित्राचा वाढदिवस आहे, आणि आम्ही येतोय, कॅफे सुरु आहे ना?, अशी विचारणाही हक्कानं होते.

ना या क्षेत्रातील अनुभव त्यांना होता ना त्या कुकिंगमध्ये एक्सपर्ट आहेत.पण जस देवाचं नाव घेऊन काम सुरु करतात तसच देवासोबत या दोघींनी ‘गुगलबाबा की जय’ म्हणत कॅफे सुरु केला. आजही एखादा पदार्थ बनवताना अडचण आली तर त्या युट्युबवर बघून शिकतात

आजही अनेक छोट्या शहरात हॉटेल, रेस्टॉरंट, कॅफेसारखा बिझनेस फक्त पुरुषांची मक्तेदारी आहे. पण ऐश्वर्या आणि शर्वरीसारख्या उच्चशिक्षित मुलीनी कोल्हापुरात तरी बदलास सुरवात केलीय. 

शिवाय उद्योजक व्हायचं तर तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी तर त्या क्षेत्रातली लागते. पूर्वीपासून म्हणतात की, डॉक्टरच्या मुलानं डॉक्टरच व्हायचं, तर इंजिनिअरीग शिकलेल्यानं त्याच क्षेत्रात काम करावं अशी काही जबरदस्ती नाहीच. हीच उक्ती या दोघींनी मोडून काढली आणि इंजिनिअर डिग्रीने झालो तरी जिथ आवड आहे तिथच काम करायचं,तरच आपण यशस्वी होऊ शकतो, हे खरं ठरवलं ते या दोघींनी.

  • पूजा कदम

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.