काँग्रेसच्या काळात सुद्धा दोन राज्याचे पोलीस लढले होते अन् १०० जण मेले होते.
अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या आसाम-मिझोराम सीमासंघर्ष कालपासून पुन्हा एकदा उफाळून आलाय. दोन्ही राज्याच्या वादग्रस्त सीमा ओलांडून आसाम पोलिसांनी मिझोराममधील कोलासिब येथील एका पोलीस चौकीचा ताबा घेतला, आणि मग तिथं हिंसाचाराला सुरुवात झाली.
आसामचे बऱ्याच राज्यांसोबत सीमावाद आहेत. यात सातत्यानं रक्तरंजित संघर्ष उसळतो. पण सोमवारच्या उसळलेल्या रक्तरंजित संघर्षात ६ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर ५० पेक्षा जास्त पोलिस जखमी झाले आहेत. त्यामुळेचं या प्रकरणाचं गांभीर्य जास्त आहे. सध्या दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून याबाबत आरोप – प्रत्यारोप सुरु आहे.
विरोधी पक्षांनी यासाठी थेट पंतप्रधान मोदींना धारेवर धरलं आहे. विशेषतः काँग्रेस नेत्यांनी दोन राज्यांची पोलीस एकमेकांशी लढत आहे यावरून केंद्र सरकारची पकड कमी झाल्याचा आरोप केला आहे.
पण ही काही पहिली घटना नव्हती. याच्या पूर्वी देखील अशाच प्रकारे दोन राज्यांची पोलीस एकमेकांच्या विरोधात उभा राहण्याची घटना घडून गेली आहे. तेही काँग्रेसच्या काळात.
तस म्हणायला गेलं तर हे प्रकरण १९८५ सालातलं आहे पण त्यांची पार्श्वभूमी त्याही अगोदरची आहे. आसाम आणि नागालॅड या दोन राज्यातील पोलीस एकमेकांच्या समोर कशाप्रकारे उभा राहिली होती हे सांगणारा हा किस्सा.
तर मुद्दा आहे आसामचा. आसाम हे एकमेव अस राज्य आहे ज्याच्या प्रत्येक सिमेवर शेजारच्या राज्यांसोबत वाद चालू आहेत. आत्ता हे वाद का आहेत तर आसामच्या शेजारी असणारे बऱ्यापैकी सर्व राज्य हे आसाम फोडून तयार करण्यात आलेले आहेत.
१९७२ सालात आसाम मधून मिझोराम आणि अरुणाचल प्रदेशला बाहेर काढण्यात आलं आणि त्यांना केंद्रशासित राज्यांचा दर्जा देण्यात आला. त्याच वर्षी मेघालय हे राज्य देखील तयार करण्यात आलं. त्यानंतरच्या काळात आसाम मधून नागालॅंडचा बाहेर काढण्यात आलं.
आत्ता आपण ज्या दोन राज्यांबद्दल बोलत आहोत ते हेच दोन राज्य एक आसाम आणि दूसरं नागालॅंड
१९६३ सालात नागालॅंडची स्थापना करण्यात आली. नागालॅंड स्थापन होताच तिथे सत्तेत आलेल्या सरकारने सांगितलं की,
ब्रिटीशांनी जो आसाम प्रांत नागा पर्वतांना एकत्र करुन तयार केलेला त्यातील बहुतांश हिस्सा नागालॅंडला मिळाला नाही.
थोडक्यात काय तर आसाम मध्ये असणाऱ्या बहुतांश नागा पर्वताटेकड्यांमधील लोक आसामच्या ऐवजी नागालॅंडमध्ये सहभागी होण्याची इच्छा बोलून दाखवत होते. आपल्या बेळगाव-कारवार-धारवाड सारखच हे प्रकरण.
यासाठी नागालॅंडची ब्रिटीश काळापासूनचा संदर्भ देऊ लागली.
पण प्रत्युत्तर म्हणून आसाम सरकार म्हणालं की, केंद्र सरकारने संविधानिकरित्या जी सिमारेषा निश्चित केली आहे त्याचा मान नागालॅंडने ठेवला पाहीजे.
त्यानंतर प्रकरण शांत न होता नागा विद्रोही यांच्या हातात हे प्रकरण जाऊ लागलं. नागा विद्रोहींनी आसामच्या सिमारेषेवर कारवाया सुरु केल्या. त्यामुळे दोन देशांत ज्याप्रमाणे सैन्य असते त्याचप्रमाणे दोन राज्यांच्या सिमेवर पोलीस सतर्क राहू लागले.
नागा बंडखोर आसाम राज्यातील नागा पर्वतांचा भाग आपल्या राज्यात यावा म्हणून प्रयत्न करु लागले.
कारवाया वाढल्यानंतर आसामने केंद्राकडे तक्रार केली. याला उत्तर म्हणून केंद्र शासनाने दोन्ही राज्यांनी एकत्रित चर्चा करुन मार्ग काढण्याची विनंती केली. पण याचा काहीच फायदा होत नसल्याचं पाहून त्यांनी तत्कालीन विधी आयोगाचे अध्यक्ष सुंदरम यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली.
या समितीमार्फत दोन्ही राज्यांमध्ये एकूण चार करार करण्यात आले. या करारांमुळे काही काळ कारवाया थंड झाल्या. पण हे फक्त १९७१ ते १९७९ या आठ वर्षांपूरतच राहिलं.
झालं अस की, नागा बंडखोरांनी आसामच्या गोलाघाट जिल्ह्यातल्या काही गावांवर हल्ला केला.
त्यामध्ये ६० लोकांची हत्या करण्यात आली. त्यानंतर संबंध बिघडले आणि या भागातील सुमारे २५ हजार लोकांना आसामच्या अंतर्गत भागास जावं लागलं. त्यानंतर केंद्राने पुन्हा हस्तक्षेप केला आणि शांती प्रस्थापित करण्यात आली.
पुन्हा पाच वर्ष गेली आणि गोलाघाट परिसरातील मेरापानी येथील आसाम पोलीसांच्या चौकीवर हल्ला करण्यात आला. मात्र हा हल्ला आत्तापर्यन्तच्या इतर हल्ल्याहून वेगळा होता. कारण हा हल्ला खुद्द नागा पोलीसांकडून करण्यात आला होता.
हीच भारतीय इतिहासातील पहिली घटना होती.
एकाच देशाच्या दोन राज्यातील पोलीसांनी एकमेकांवर हल्ला केला होता. नागा पोलीसांचं म्हणणं होतं की आसाम पोलीसांनी त्यांच्यावर फायरिंग केलं आणि आसाम पोलीसांच म्हणणं होतं की नागा पोलीसांनी त्यांच्यावर फायरिंग केलं. या संपुर्ण घटनेत १०० निरपराक्ष लोक मारले गेले तर २८ आसामी पोलीस कर्मचारी शहिद झाले.
त्यानंतर १९८८ सालात आसाम सरकारने सर्वौच्च न्यायालयात याचिका दाखल केली. १८ वर्षानंतर २००६ मध्ये सर्वोच्च न्यायलयाने दोन्ही राज्यातील सिमा निर्धारित करण्यासाठी तीन सदस्यीय आयोगाची स्थापना केली. या आयोगाने आपला अहवाल सुप्रीम कोर्टाला सादर केला, त्यानंतर आजही सर्वौच्च न्यायालयाने निर्णय दिलेला नाही. थोडक्यात जे बेळगाव-कारवार-धारवाड-बिदर-भालकीचं झालं तेच इथं झालं, भिजत घोंगड पडलं…
हे ही वाच भिडू.
- सुरेश कलमाडी यांनी दहशतवाद्यांवर विमानातून बॉम्बहल्ला केला होता.
- काश्मीरबद्दलचे कलम ३७० गेले. नागालँडच्या कलम ३७१चं काय?
- फक्त पेटलेला पंजाबच नाही तर आसाम, मिझोराम शांत करण्याचं श्रेय राम प्रधान यांनां जातं.