महाविकास आघाडीच्या दोन वर्षांच्या कालावधीत काय घडलं? काय बिघडलं?

फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या राजकारणात सगळ्यांना धक्का देणारी गोष्ट राज्यात २०१९ मध्ये घडली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे पक्ष कधीच एकत्र येणार नाहीत, असा अंदाज अनेकांचा होता. मात्र हा अंदाज सपशेल चुकला आणि राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. या गोष्टीला आज दोन वर्ष पूर्ण झाली आहेत.

या दोन वर्षांत कोरोनाचं थैमान, लॉकडाऊन, निर्बंध, महापूर, अधिकाऱ्यांची अटक, आरोप-प्रत्यारोप अशी अनेक प्रकरणं झाली. सोबतच काही लोकोपयोगी निर्णयही घेण्यात आले.

सगळ्यात आधी बघुयात की महाविकास आघाडीच्या दोन वर्षांच्या कालावधीत काय घडलं-

कोविडच्या संसर्गाचा राज्याला सर्वाधिक फटका बसला. सरकारी रुग्णालयांमध्ये जागा अपुरी पडत होती, तर खासगी रुग्णालयांमधले दर सामान्यांच्या आवाक्या बाहेरचे होते. राज्य सरकारनं महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना सर्व नागरिकांसाठी खुली केली. सोबतच प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचं महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेशी संलग्नीकरण केलं, यात २८८ शासकीय आणि ७१२ खासगी रुग्णालयांचा समावेश झाला. याद्वारे रुग्णांना ३४ विशेष सेवांसाठी तब्बल १२०९ पॅकेजचा लाभ मिळाला. म्युकरोमायसिस सारख्या गंभीर आजाराचे उपचारही या योजनेच्या अंतर्गत करता येणं शक्य झालं.

कोविडच्या संसर्गाला आला घालण्यासाठी विशेष कृती दलाची स्थापना केली. मास्क आणि कोविड चाचण्यांचे दर निश्चित करण्यात आले. सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये रेमडीसिव्हीर मोफत उपलब्ध करून देण्यात आले. खासगी रुग्णालयं अव्वाच्या सव्वा बिलं घेत असल्याचं लक्षात आल्यावर, कोविड उपचारांसाठीचे कमाल दर ठरवण्यात आले. सोबतच स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना आणि स्व. गोपीनाथ मुंडे विमा योजना अंतर्गत गरजूंना लाभ मिळवून दिले.

आरे मेट्रो प्रकल्प रद्द करण्यात आला. महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत पात्र ठरणाऱ्या ३०.७७ लाख शेतकऱ्यांना एकूण १९ हजार ६४४ कोटी रुपये देण्यात आले. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतची कृषीकर्ज थकबाकीही माफ करण्यात आली. चक्रीवादळ आणि अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना ११ हजार ७५२ कोटींचं पॅकेज देण्यात आलं. राज्यात तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र कल्याण मंडळाची स्थापनाही करण्यात आली.

दहावी-बारावीच्या आणि शेवटच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णयही शासनानं घेतला, मात्र त्यावरून मोठा गदारोळ झाला.  टाटा कॅन्सर रुग्णालयात उपचार घेणारे रुग्ण आणि नातेवाईक यांच्यासाठी १०० सदनिकांचं बांधकाम, तर बीडीडी चाळ पुनर्विकासाचं भूमीपूजनही पार पडलं आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात काय बिघडलं?

कोविडच्या काळात राज्यात अनेकदा बेड आणि ऑक्सिजनचा तुटवडा जाणवला. अभिनेता सुशांत सिंग याच्या आत्त्महत्येनंतर राज्यात मोठा गोंधळ उडाला. आरोग्य विभागाच्या भरतीमध्येही गोंधळ झाल्यानं सरकारला टीका सहन करावी लागली. वनमंत्री संजय राठोड यांना एका वादग्रस्त प्रकरणात राजीनामा द्यावा लागला.

ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेलं आंदोलनावर, जवळपास महिना होत आला तरी तोडगा निघालेला नाही. निराश झालेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली. कामगारांनी मोठा संघर्ष केल्यानंतर पगारवाढीची घोषणा करण्यात आली. मात्र विलनीकरणाच्या मुख्य मागणीवर तोडगा न निघाल्यानं संप मिटवण्यात महाविकास आघाडीला अपयश आलं.

उद्योगपती अनिल अंबानी यांच्या बंगल्याबाहेर स्फोटकं सापडल्याचं प्रकरण चांगलंच गाजलं. त्यात आधी पोलिस अधिकारी सचिन वाझे अडकले. त्यानंतर, मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग आणि गृहमंत्री अनिल देशमुख हे वसुली करत असल्याचे आरोप झाले आणि सरकारची नाचक्की झाली. अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामाही द्यावा लागला. तर फरार झालेले परमबीर सिंग मोठ्या कालावधीनंतर मुंबईत परतले. अजूनही या प्रकरणावर पूर्णपणे पडदा पडलेला नाही.

चिपळूण आणि कोकणच्या इतर भागांमध्ये आलेल्या पुराचं नियोजन करण्यातही सरकारला अपयश आल्याची टीका करण्यात आली. मदतीचं पॅकेज जाहीर करण्यावरुनही विरोधकांनी सरकारला लक्ष्य केलं. वाढलेल्या पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये केंद्र सरकारनं सवलत दिल्यानंतरही, राज्यातले भाव कमी झाले नाहीत.

एमपीएससीच्या सदस्यांच्या नियुक्तीवरुनही चांगलीच राळ उठली. सोबतच परीक्षाही कोविडमुळं लांबवण्यात आल्या. परीक्षा तोंडावर आल्या होत्या, विद्यार्थी परीक्षा सेंटरवर जाण्याच्या मार्गावर होते आणि परीक्षा पुढं ढकलणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. त्यामुळं राज्यभरात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं.

तीन पक्षांच्या सरकारनं आतापर्यंत संमिश्र कामगिरी केली आहे. समर्थकांच्या मते हे आतापर्यंतचं सगळ्यात भारी सरकार आहे, तर विरोधकांच्या मते हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाही…  आणखी तीन वर्ष सरकार जोमात काम करणार की पडणार, हे पाहावं लागेल.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.