पाकिस्तानात सापडलाय गरीबांचा टिरीयन लॅनिस्टर.
भिडूनो तुम्हाला टिरीयन लॅनिस्टर तर माहितच असेल. गेम थ्रोन्सच्या इतिहासातलं सर्वात लाडक्या कॅरेक्टर पैकी एक. याची ओळखचं आहे लॉर्ड ऑफ टीट्स अँड वाईन.
गर्भश्रीमंत लॅनिस्टर घराण्यात जन्माला आला. पण जन्मतःचं कळाल हा मुलगा ठेंगू राहणार. तो जन्मल्या जन्मल्या त्याची आई मेली. त्याला कधी प्रेम मिळालं नाही. टिरीयनच्याच भाषेत सांगायचं झालं तर
“प्रत्येक ड्वार्फ हा आपल्या पित्याच्या नजरेत बास्टर्ड असतो.”
असा हा कायम बाई आणि बाटली मध्ये बुडालेला बुटका आश्चर्यकारकरीत्या गेम ऑफ थ्रोन्सच्या आठव्या सिझन पर्यंत जिवंत आहे. लेखक जॉर्ज आर आर मार्टिन आबा आपल्या सिरीयलमधल्या कॅरेक्टर्सनां मारण्यासाठी फेमस आहे. नेड स्टार्क सारखे भलेभले योद्धा सिरीयलचे हिरो त्याने एका खटक्यात उडवलेत. त्याच्यासमोर हा बारक्या टिरीयन लॅनिस्टर म्हणजे कीस झाड की पत्ती.
पण त्याच्या मरणावर टपून बसलेल्या अनेकांच्या नाकावर टिच्चून हे बुटकबैंगन आपल्या चाचा चौधरी से भी तेज दिमाग मुळे वाचलय आणि आता तर भावी राणीचा हँड म्हणजेच पंतप्रधान म्हणून त्याच्या नावाची घोषणा झालीय.
असा हा जगातला सर्वात श्रीमंत बुटका. पण काही दिवसापूर्वी बातमी आली
“गेम ऑफ थ्रोन्सचा टिरीयन लॅनिस्टर पाकिस्तानच्या एका हॉटेलमध्ये वेटरचं काम करतोय. “
पाकिस्तान सरकारच्या पुंगळ्या टाईट झाल्या. त्यांना ते गेम ऑफ थ्रोन्स कुठल माहित असायला. अमेरिकेचा कोण तर फेमस माणूस आपल्या देशात आहे एवढच त्यांना कळाल. इम्रान खान मनातल्या मनात म्हणाला
“ते लादेन पाकिस्तानात लपला होता इथपर्यंत ठीकाय आता आता हा कोण नवीन माणूस पाकिस्तानात लपलाय? च्यायला हे तर अवघडच झालं. तिथ मोदी ट्रम्प पाकिस्तानची मारायला कारणचं शोधतोय. कुछ तो करना मंगता हय “
इम्रान खान ने आयएसआय ला काश्मीरमधले किडे थांबवून थोडे दिवस टिरीयन लॅनिस्टर कोण आहे आणि तो पाकिस्तानात नेमक काय करतोय? या कामगिरीवर पाठवलं.
काही दिवसांनी आयएसआयचे गावठी जेम्स बॉंड माहिती घेऊन आले. गेम ऑफ थ्रोन्स नावाची एक इंग्लिश सिरीयल आहे, टिरीयन लॅनिस्टर त्यातलं करेक्टर आहे आणि पाकिस्तानात आढळलाय तो टिरीयन लॅनिस्टर नसून त्याचा ड्युप्लिकेट आहे . त्याच नाव रोझी खान.
रोझी खान रावळपिंडीच्या एका छोट्याशा गल्लीतल्या काश्मिरी हॉटेलमध्ये वेटरचं काम करतो. कधी तरी कोणीतरी त्याला बघितलं आणि त्याने शोध लावला की टिरीयन लॅनिस्टर पाकिस्तानात आलाय. त्याचे फोटो फेसबुकवर फेमस झाले. बिचाऱ्या रोझी खानला कळेना आपले फोटो सगळी कडे का एवढे हिट झालेत? कोणी तरी त्याला गेम ऑफ थ्रोंस वगैरे समजावून सांगितलं .
सिरीयल मध्ये टिरीयन लॅनिस्टरचा रोल केलाय पीटर डिंकलेज यानं. रोझी खान अगदी त्याच्यासारखा दिसतो. एवढेच नव्हे दोघांची उंची देखील सारखी आहे. पण फरक हा की रोझी वेटर आहे मात्र पीटर जगातला सर्वात जास्त मानधन घेणारा , गोल्डन ग्लोब एम्मीसारखे अवाॅर्ड जिंकलेला अभिनेता आहे.
जगभर रोझी खानच्या फोटोनी जगभर राडा केला. कोणी म्हणत होत कुंभ के मेले मे बिछडे हुये भाई है. कोणी म्हणत होत पीटर डिंकलेजने हा पब्लिसिटी स्टंट केलाय. पण मोठमोठ्या वृत्तसंस्थांचे जर्नालिस्ट रावलपिंडीच्या त्या छोट्या हॉटेलमध्ये येऊन थडकले. पंचवीस वर्षाच्या रोझी खानच्या मुलाखती घेतल्या गेल्या. त्याचे मालक अस्लम परवेझ अभिमानाने रोझीबद्दल माहिती देत होते.
रोझी चे फोटो पीटर डिंकलेजने पहिले आहेत की नाही माहित नाही. पण रोझीला त्याला आयुष्यात एकदा नक्की भेटायचं आहे.
त्याच्या आयुष्यात काही बदल झालेला नाही. आजही तो त्याच हॉटेलमध्ये उष्ट्या प्लेट उचलतो. पण तो त्याच्या मित्रांचा लाडका आहे. त्याचे मित्रसुद्धा त्याच्या सारखे भोळे आहेत, ते आजही रोझी खानलाच विचारतात,
“वो फेसबुक पर तेरे जैसा दिखता है वो कौन है?”
रोझी खान सुद्धा दाबात सांगतो,
“वो मेरा ड्युप्लिकेट है.”
हे ही वाच भिडू.
- गेम ऑफ थ्रोन्सच्या जगात राडा करणाऱ्या पाचजणी.
- चला गेम ऑफ थ्रोन्स समजून घ्या : स्टार्टर पॅक क्रमांक १
- चला गेम ऑफ थ्रोन्स समजून घ्या : स्टार्टर पॅक क्रमांक २