युएईसारख्या मुस्लिम देशानं सेन्सॉर बोर्ड काढून टाकण्याची डेरिंग दाखवलीये

आपल्या भारतात सेन्सॉर बोर्ड म्हणजे लय हार्ड विषय. अगदी जेम्स बॉंडच्या हातातली दारू कुणी ब्लर करु शकत असेल, तर तो म्हणजे आपला सेन्सॉर बोर्ड. शिव्या आणि ॲडल्ट सीन्स तर लय लांबची गोष्ट, गाण्यातल्या शब्दांचा बाजार उठवायला ही सेन्सॉर बोर्ड पुढं मागं बघत नाही. बरं बीप केलं, तरी लीप मोमेंट बघून समोरच्यानं कुठली शिवी घातली हे किरकोळीत ओळखता येत असतंय. पण तरी सेन्सॉर बोर्ड आपलं काम करणार आणि पिक्चरला कात्र्या चालवणार.

हे काय आत्ता आत्ता घडलंय, असं अजिबात नाय. पार आधीपासून सेन्सॉर बोर्ड पिक्चरवाल्यांना छडी दाखवतंय. पण बऱ्याचदा होतं असं, की जे आक्षेपार्ह असतं, ते निवांतमध्ये दिसतं… आणि ज्याच्यात खरा झोल असतोय त्याला अजिबात कट बसत नाही.

म्हणजे बघा आपल्या दादा कोंडकेंना सेन्सॉर बोर्डनं लय कट सुचवले, पण दादा प्रत्येक वेळी त्यांना शब्दात पकडायचे. ढगाला लागली कळ या गाण्यातल्या, ‘वर ढगाला लागली कळ’ या शब्दांवर आक्षेप घेतला गेला होता. तेव्हा दादांनी सांगितलं, ”अहो त्या ओळी डबल मिनिंग नाही, ‘पाणी थेंब थेंब गळं’ या ओळी डबल मिनिंग आहेत.”       

आता तुम्ही म्हणाल हे सेन्सॉर बोर्डची कशी काय आठवण झाली?

आपल्याकडे कसं आधी हिरो-हिरॉईन जवळ आली, की दूध उतू जायचं, दोन गुलाब भिडायचे. आता डायरेक्ट सिन दाखवतात. काही लोकं डोळे फाडून बघतात, काही लोकं ढुंकून बघत नाहीत. इथं मोबाईलमध्ये सगळी दुनिया बघता येते, तरी सेन्सॉर बोर्ड कट मारायचं आणि ब्लर करायचं काम प्रामाणिकपणे करतं. पण आत्ता सेन्सॉर बोर्डची आठवण आलीये, संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या विषयामुळं.

अमिरातीमधली लोकं तशी कडक नियम बनवण्यात लई वांड. हे करायचं नाही, ते करायचं नाही अशी एक लिस्टच त्यांच्याकडं असल्याचं म्हणतात. पण आपण सोशल मीडियावर पाहिलं, तर तिथलं वातावरण एकदम चिल असतं. या चिल वातावरणात आता आणखी एका गोष्टीची भर पडणार आहे, ती म्हणजे संयुक्त अरब अमिरातीनं आता थेटरात दाखवले जाणारे पिक्चर सेन्सॉर केले जाणार नाहीत असं सांगितलंय.

थोडक्यात काय, तर कुठल्याही पिक्चरचं इंटरनॅशनल व्हर्जन इथं निवांतपणे दिसू शकतंय. आधी नग्नता, प्रणय प्रसंग आणि इतर आक्षेपार्ह दृश्य काढून टाकणाऱ्या यूएईमध्ये आता सगळं काही दिसण्याची परमिशन मिळालीये. पण याला सुद्धा एक अट आहे.

असणारच म्हणा, गोष्टी काय एवढ्या सोप्या नसतात. हे सिनेमे पाहायला युएईमध्ये फक्त २१ वर्षांहून अधिक वय असणाऱ्या कार्यकर्त्यांनाच प्रवेश मिळणार आहे.

या सगळ्यामागचं कारण काय?

तर आपण मुस्लिम देश असलो, तरी एकदम लिबरल आहोत हे युएई गेल्या अनेक दिवसांपासून लोकांच्या मनावर ठसवतंय. पर्यटकांना आणि विशेषत: परदेशी नागरिकांना आकर्षित करण्यासाठी युएईनं हा निर्णय घेतल्याचं म्हणलं जातंय. सोबतच जगभरातल्या कंपन्यांना आणि कामगारांना आकर्षित करण्यासाठी युएईमधला विकेंड शनिवार-रविवार करण्यात येणार अशीही चर्चा आहे.

याआधी मात्र युएईमधले नियम फार डेंजर होते…

युएईतल्या सेन्सॉरशिप कायद्यात, ॲडल्ट वेबसाईट्स ब्लॉक करणं, किसिंग सिन कट करणं, नॉन-हलाल डिशेसची नावं ब्लर करणं अशा नियमांचा समावेश होता. आता पिक्चरमधल्या दृष्यांवरची बंदी हटवण्यात आली असल्यानं आणखी कुठले नियम बदलतात, याची चर्चा युएईत सुरू असणार हे नक्की.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.