सव्वा लाखाचा मासा मेल्याच्या दु:खामुळं उद्धव ठाकरेंनी आमदाराला भेटायचं टाळलं होतं…
एकनाथ शिंदे डझनभर आमदारांना घेऊन नॉट रिचेबल झाले. भुजबळ, राणे, राज ठाकरे यांच्यानंतर शिंदेंचं हे बंड शिवसेनेसाठी सर्वात मोठ्ठ बंड ठरणार आहे. खुद्द उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद अडचणीत येणार आहे. त्यामुळे त्यांचा रोख राणे आणि राज ठाकरे यांच्याप्रमाणे थेट उद्धव ठाकरेंवर असलेला दिसून येतोय.
एकनाथ शिंदेच्या नाराजीबाबत माध्यमांमधून वेगवेगळी कारणं सांगितली जात आहेत. त्यातलंच एक प्रमुख कारण सांगितलं जात आहे, ते म्हणजे उद्धव ठाकरेंचं वेळ न देणं. उद्धव ठाकरे फोन उचलत नाहीत, वेळ देवून भेटत नाहीत अशा तक्रारी राज्यसभेच्या निवडणूकीदरम्यानही अनेक अपक्ष आमदार आणि सेनेच्या आमदारांनी केलेल्या होत्या.
पण खरंच असं आहे का? तर याबद्दल इतिहासात एक प्रसिद्ध किस्सा आहे, तो किस्सा आहे माशाचा.
अस सांगण्यात येतं की परदेशातून आणलेला सव्वा लाखाचा मासा दगावल्यानं उद्धव ठाकरे नाराज झालेले. त्यामुळे त्यांनी एका आमदाराची भेट नाकारली. हेच निमित्त झालं आणि नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडले.
तारीख होती १४ एप्रिल २००५. या दिवशी राणेंचा असंतोष पहिल्यांदा उफाळून बाहेर आला होता. शिवसेनेच्या काही प्रमुख नेत्यांसोबत राणेंची बैठक सुरू होती.
बंद दाराआड झालेल्या या बैठकीत राणेंनी उद्धव ठाकरेंवर तोफ डागली. पैसे देऊन शिवसेनेत पदं दिली जात आहेत, पदांचा बाजार भरला आहे अस राणेंचं मत होतं. राणेंच्या या आरोपानंतर मात्र बाळासाहेब स्वत: बैठकीत उपस्थित झाले आणि, “तुमच्याकडे कोणी पैसे मागितले का? उद्धव आणि राजने पैसे मागितले असतील आणि ते सिद्ध झालं तर मी त्यांना सेनेत ठेवणार नाही, मी पैसे घेतले अस सिद्ध झालं तर मी स्वत: राजीनामा देईल,” असं बाळासाहेब म्हणाले…
या घडामोडीनंतर दोन महिनेच उलटले आणि माशाचं निमित्त झालं..
झालं असं की शेषराव गिऱ्हेपुंजे हे भंडारा जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते. २००५ साली पोलिसांनी त्यांना पुरतं अडकवलं आहे, असा त्यांचा आरोप होता. ठिकठिकाणच्या आंदोलनासाठी त्यांच्यावर खटले भरून त्यांना भंडारा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलं होतं.
शेषराव गिऱ्हेपुंजे हे कट्टर शिवसैनिक होते. १९८७ पासून ते शिवसैनिक म्हणून सक्रिय राजकारणात होते. शिवसेनेचा कट्टर कार्यकर्ता म्हणून आपल्या पक्षानं आपल्या मागं रहावं अशी त्यांची साहजिक अपेक्षा होती.
त्यासाठी त्यांनी सर्वात पहिल्यांदा संपर्क साधला तो नारायण राणेंना. मात्र नारायण राणेंचा तेव्हा परदेश दौरा ठरलेला होता. त्यामुळेच शेषराव यांनी गिऱ्हेपुंजेंनी उद्धव ठाकरेंची भेट घ्यावी अस सुचवलं. ठरल्याप्रमाणे शेषराव गिऱ्हेपुंजे मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी गेले.
तेव्हा उद्धव ठाकरे मिटींगमध्ये आहेत दोन दिवसांनंतर येण्यासाठी त्यांना सांगण्यात आलं. शेषराव दोन दिवसांनंतर पुन्हा मातोश्रीवर गेले. तेव्हा मात्र तिथे सुरक्षेसाठी असणाऱ्या पोलीसांनी त्यांना सांगितलं की, ‘परदेशावरून आणलेला सव्वा लाख रुपयांचा मासा दगावल्याने उद्धवसाहेब नाराज आहेत. आज ते कुणालाही भेटणार नाहीत.’
नारायण राणे जेव्हा परदेशातून आले तेव्हा शेषराव गिऱ्हेपुंजेंनी ही हकीकत नारायण राणेंना सांगितली. राणेंनी पत्रकार परिषदेत घेत उद्धव ठाकरेंवर टिका केली आणि पुढचं राजकारण घडलं.
आता या गोष्टीत किती तथ्य आहे तर, आजही आपल्याला माशाचा किस्सा शेषराव गिऱ्हेपुंजेनी सांगितला असं अनेक जण सांगतात, तर शेषराव आपल्याला ही गोष्ट तिथल्या सुरक्षेसाठी असणाऱ्या पोलीसांनी सांगितलं असं सांगतात.
ते म्हणतात, ‘याचा खरेपणा सिद्ध करायला माझ्याकडे काहीच पुरावा नाही.’ तर उद्धव ठाकरे म्हणतात, ‘हा प्रकार आपली प्रतिमा डागाळण्यासाठी करण्यात आला होता.’
हे ही वाच भिडू:
- त्या रात्री संपूर्ण ठाण्यात पोस्टर लावण्यात आले “गद्दारांना माफी नाही” : किस्सा 1989 चा
- अविश्वास ठराव न आणता देखील सरकार पाडता येतं, पवारांनी तसच केलं होतं…
- गुजरातमधून महाराष्ट्राचे सुत्र हलवणारे “चंद्रकांत पाटील” कोण आहेत..?