ठाकरे घराण्याचा वक्तृत्वाचा वारसा चालवणारे उद्धव ठाकरे आपलं पहिलं भाषण विसरलेले

राज्याचे लाडके मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने आज शिवतीर्थ गाजतं. समोरचे शिवसैनिक त्यांच्या भाषणाने मंत्रमुग्ध होतात. आज जरी असं असलं तरी एक वेळ अशी होती की उद्धव ठाकरेंनी आपलं पहिलं भाषण पाठांतर केलं होतं.

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत सक्रिय झाल्यानंतर केलेल्या पहिल्या भाषणाचा किस्सा स्वतः सांगितला होता.

उद्धव ठाकरे हे पहिल्या पासूनच शांत अशा स्वभावाचे होते. राज आणि उद्धव या दोघांनीही जवळपास एकाचवेळी राजकारणात पदार्पण केलं होतं. परंतु उद्धव ठाकरे हे पडद्यामागे अधिक प्रमाणात सक्रिय राहिले. त्या मानाने राज ठाकरे हे सुरुवातीपासूनच आघाडीवर लक्षवेधी कामगिरी करत राहिले.

उद्धव ठाकरेंनी राजकारणात उघडपणे सक्रिय होण्याचं ठरवलं ते १९९० नंतर.

त्यांचा पहिला सार्वजनिक कार्यक्रम होता मुंबईच्या पूर्वेकडील उपनगर मुलुंड येथील झोपडपट्टी मधील नळ कोंडाळयाचं उदघाटन. १९९० च्या सुरुवातीला उद्धव यांची प्रतिमा खालमानेने वावरणारे आणि राजकीय डावपेचांची आवड नसलेले व्यक्तिमत्त्व अशी होती. ते शांत स्वभावाचे आणि अत्यंत मृदूभाषी होते.

अशातच त्यांना ९१ साली एक भाषणाची आयती संधी चालून आली होती. 

डिसेंबर १९९१ मध्ये राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या इमारतीवर बेरोजगार तरुणांचा एक मोर्चा आयोजित केला होता. त्यावेळी महाराष्ट्राची दुसरी राजधानी नागपूर इथं प्रथेनुसार हिवाळी अधिवेशन सुरू होतं. त्यावेळी सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री होते. या मोर्चाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

मोर्चाला पुरेसा प्रतिसाद आणि पाठिंबा मिळवण्यासाठी राज ठाकरे महाराष्ट्रभर फिरले. ज्येष्ठ पत्रकार नारायण आठवले यांनी मोर्चाचे निवेदन लिहून काढले. नागपूर मोर्चा विराट होईल हे स्पष्ट दिसू लागलं होतं. मोर्चाचा आदल्याच दिवशी राज हे नागपूर मध्ये हॉटेल सेंटर पॉईंट मध्ये मुक्कामाला होते. रात्री त्यांना मातोश्रीवरून फोन आला आणि मोर्चानंतरच्या सार्वजनिक सभेत उद्धवला बोलू द्यावं असं सांगितलं गेलं.

दुसऱ्या दिवशी मोर्चा निघाला तेव्हा एका ट्रकवर बनविलेल्या लाकडी फळ्यांच्या तात्पुरत्या व्यासपीठावर उद्धव ठाकरे बसले होते. सभेला सुरुवात झाली. सर्वांची भाषण झाली. त्यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते असलेल्या मनोहर जोशी यांनी घोषणा केली की आता उद्धव हे भाषण करतील. मोर्चामध्ये अंदाजे ५० हजाराचा जमाव होता.

या सभेला जाण्याआधी उद्धव ठाकरे यांनी भाषण लिहून ते पाठांतर केलं होतं. जेणेकरून लोकांना कळू नये की, उद्धव ठाकरेंना काही येत नाही. पण जेव्हा ५० हजारांचा तो जमाव बघितला आणि माईकसमोर उभं राहिल्यावर उद्धव यांना भाषणच आठवेना. तेव्हा त्यांना जे सुचलं ते बोलले आणि त्याही भाषणाला त्यांना टाळ्या मिळाल्या.

अशाप्रकारे जर एखादा मोठा नेता भाषण करताना पाठांतर केलेलं सुद्धा विसरत असेल तर आपण काय ओ भोळी भाबडी जनता…चुकणारच की 

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.