मुख्यमंत्री होण्याची फिल्डिंग उद्धव ठाकरेंनी १९९६ सालापासून लावली होती..!!!
मुख्यमंत्री बनणं हे माझं कधीच स्वप्न नव्हतं. मी मुख्यमंत्री होईन अस कधी वाटलही नव्हतं. पण महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि मी मुख्यमंत्री झालो..
एकनाथ शिंदेंच्या बंडापुर्वी एक महिना अगोदर उद्धव ठाकरेंनी हे स्टेटमेंट दिलं होतं. मात्र पुढच्याच महिन्यात सेनेत अभूतपुर्व बंडखोरी झाली आणि उद्धव ठाकरेंच मुख्यमंत्रीपद गेलं. मात्र तेव्हा चर्चा झाली होती ती खरच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं का? कारण जेव्हा राजीनामा देण्याची वेळ आली तेव्हा देखील उद्धव ठाकरेंनी या गोष्टीचा पुर्नउच्चार केला. तेव्हा ते म्हणालेले की मला कधीच मुख्यमंत्री होण्यात इंटरेस्ट नव्हता..
मात्र आज शिवसेनेचे माजी मंत्री सुरेश नवलेंनी आरोप केला की,
उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री होण्याची इच्छा १९९६ पासूनच होती. जेव्हा मनोहर जोशी राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या जागेवर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करावं या मागणीसाठी आम्ही म्हणजेच शिवसेनेच्या आमदारांनी बाळासाहेब ठाकरेंची भेट घेतली होती.
पण नवले सांगतात तसे दावे यापुर्वी देखील झाले आहेत. १९९५ साली राज्यात भाजप सेनेची युतीची सत्ता आली होती. या युतीत शिवसेना मोठ्ठा भाऊ असल्याने शिवसेना मुख्यमंत्री झाला होता. मनोहर जोशींकडे सत्तेचा कारभार सोपवल्यानंतर तसं सर्व चांगल चाललं होतं पण पक्षातील कुरबूरी वाढल्यानंतर मुख्यमंत्री बदलाची हवा जोर धरू लागली होती.
त्याच दरम्यानचा हा किस्सा..
१९९७ च्या मुंबई महानगरपालिकांच्या निवडणूकांपासून उद्धव ठाकरेंनी सक्रियपणे राजकारणात सहभागी होण्यास सुरवात केली. त्याच काळात सेनेत राणेंच वर्चस्व वाढत होतं. शिवसेनेत तेव्हा राज ठाकरे, राणे आणि स्मिता ठाकरे यांचा एक गट तर दूसरीकडे उद्धव ठाकरे, मनोहर जोशी, सुभाष देसाई यांचा दूसरा गट असल्याच्या चर्चा होत्या.
या गटबाजीतून मनोहर जोशींची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची गेली आणि नारायण राणे मुख्यमंत्री झाल्याचं सांगितलं जातं.
मनोहर जोशींना मुख्यमंत्रीपदावर खाली खेचून स्वत: मुख्यमंत्री होण्याची फिल्डिंग नारायण राणे लावत होते. या दरम्यान नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का यासाठी चाचपणी सुरू केली होती. पुढे नारायण राणे मुख्यमंत्री झाले.
त्याच वर्षी रामभाऊ म्हाळगी प्रबोधनीत शिवसेनेचं शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबीरासाठी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. या शिबीरामध्येच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का असा प्रश्न विचारण्यात आला होता तेव्हा त्यांनी जाहीरपणे
मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल असे उत्तर दिल्याचं सांगण्यात येतं.
या संबधितचा घटनाक्रम ठाकरे विरुद्ध ठाकरे या धवल कुलकर्णी यांच्या पुस्तकात देण्यात आलेला आहे.
उद्धव ठाकरेंनी बोलून पहिल्यांदा मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवलेली ती घटना १९९९ ची.
गटातटाच्या राजकारणात राणेंच्या ऐवजी आपण मुख्यमंत्री व्हावं अशी फिल्डिंग उद्धव ठाकरेंनी लावली होती अस सांगितलं जातं. पण यात अधिकाशं दावेप्रतिदावेच येतात.
मात्र त्यानंतरचा प्रसंग मात्र पुरेसं चित्र स्पष्ट करणारा आहे..
झालेलं अस की सामना हिंदीचे संपादक प्रेम शुक्ला हे रंगशारदामध्ये प्रमोद महाजन यांची मुलाखत घेण्यासाठी गेले होते. प्रेम शुक्ला आणि प्रमोद महाजन यांची भेट झाली, चर्चा झाली. मात्र मुलाखत घेण्याची वेळ आली तेव्हा प्रमोद महाजनांनी प्रेम शुक्लांना विचारलं की, ही मुलाखत कोणत्या पेपरमध्ये छापून आणणार आहात..
सामनामध्ये अस प्रेम शुक्ला सांगताच प्रमोद महाजन म्हणाले. सामना मध्ये माझी मुलाखत छापली जाणार नाही कारण २००४ पासूनच उद्धव ठाकरेंनी माझ्यासोबत अबोल धरलेला आहे.
याचं कारण १९९९ व २००४ च्या निवडणूकांमध्ये असल्याचं सांगितलं जातं.
१९९९ साली भाजपच्या हट्टामुळे सहा महिने अगोदर विधानसभेच्या निवडणूका घेण्यात आल्या. निकालांनंतर भाजप सेनेच्या युतीप्रमाणे सत्तास्थापनेचा दावा केला जाण्याची चिन्हे होती. मात्र भाजपकडून मुख्यमंत्रीपदावर गोपीनाथ मुंडेच्या अपेक्षा वाढल्या होत्या तर इकडे नारायण राणेंच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी देखील आपल्या अपेक्षा ठेवल्या होत्या. त्यातूनच बोलणी लांबली व तोपर्यन्त नव्याने निर्माण झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने कॉंग्रेस सोबत आघाडी करत सत्तास्थापनेचा दावा केला.
२००४ च्या विधानसभा निवडणूका येईपर्यन्त उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष झाले होते. त्यामुळे पक्षाला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली तर कार्याध्यक्ष म्हणून त्यांनाच पहिली पसंती असणार होती. मात्र प्रचारादरम्यान व जागावाटपादरम्यान गोष्टी बिघडत गेल्या व भाजप सेनेची युती या संधीपासून पुन्हा दूर झाली.
यातूनच प्रमोद महाजन आणि उद्धव ठाकरेंमध्ये दुरावा निर्माण झाला होता. प्रेम शुक्ला यांच्या भेटीत महाजन म्हणाले होते की, तुमचे उद्धव माझा फोन देखील घेत नाहीत…
पुढे महाजन यांना बाळासाहेबांना भेटू न देणं किंवा महाजन यांनी जाणिवपुर्वक शिवसेनेला महाराष्ट्राबाहेर हिंदुत्व घेवून जावू न देणं अशा चढाओढीच्या राजकारणाच्या गोष्टी सांगितल्या जातात.
मात्र या दोन्ही गोष्टींवरून एक स्पष्ट होतं की उद्धव ठाकरेंनी कधीच मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पाहिलं नव्हतं हे म्हणणं तितकं योग्य नाही, वास्तविक उद्धव ठाकरेंनी तसं स्वप्न पाहणं त्यादिशेने राजकारण घेवून जाणं आणि बाळासाहेबांच्या पश्चात शिवसेना संपली अस म्हणणाऱ्यांना चोख उत्तर देवून मुख्यमंत्रीपदावर बसणं ही तशी चांगली गोष्ट आहे आणि स्वप्नांचा पाठपुरावा कसा करावा ही शिकवणारी देखील गोष्ट आहे.
हे हि वाच भिडू
- एअरवेजच्या मालकाचा पराभव झाला अन् राज आणि उद्धव ठाकरे यांच्या संघर्षाला सुरुवात झाली
- तेव्हासुद्धा सत्ता स्थापन करू म्हणत शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना गंडवल होतं
- ठाकरे घराण्याचा वक्तृत्वाचा वारसा चालवणारे उद्धव ठाकरे आपलं पहिलं भाषण विसरलेले