महाजनांशी उद्धव ठाकरेंनी बोलणं बंद केलं होतं, वाद मुख्यमंत्रीपदाचाच होता..

२०१९ सालच्या विधानसभा निवडणुका महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अतिशय महत्वाच्या ठरल्या. गेली पंचवीस वर्षे कुरबुर करत का असेना चालत आलेला शिवसेना भाजप युतीचा संसार अखेर मोडला. शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत महाविकास आघाडी केली. उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले.

भाजपने आपला दिलेला शब्द पाळला नाही असं शिवसेनेचं म्हणणं होतं तर भाजपचे नेते म्हणत होते की सेना खोटं बोलत आहे. आम्ही मुख्यमंत्रीपदाचा शब्द कधी दिलाच नव्हता. हिंदुत्वाच्या विचारसरणीवर वाटचाल करत असलेल्या या पक्षांच्या दुफळीनंतर अनेक कार्यकर्ते समर्थकांना वाईट वाटणे साहजिकच होते.

या प्रसंगी आठवण काढण्यात आली शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे आणि भाजप नेते स्व.प्रमोद महाजन यांची. हे दोन नेते असते तर युती तुटायची वेळच आली नसती असं म्हटलं जातं. प्रमोद महाजन यांनी काही प्रसंगी पडती बाजू घेऊन शिवसेनेशी युती टिकवली होती. 

युतीची स्थापना झाली तेव्हापासून बाळासाहेबांना जेष्ठत्वाचा मान होता. त्यांनी एका साध्या कागदावर जागा वाटप केलं आणि त्यावर कोणताही आक्षेप न घेता भाजपने हि युती स्वीकारली होती. वेळोवेळी वादाचे प्रसंग आले तर प्रमोद महाजन मातोश्रीवर जायचे आणि बाळासाहेबांची समजूत काढून युती टिकवायचे.

पण एक प्रसंग असा आला होता जेव्हा प्रमोद महाजन आणि उद्धव ठाकरे यांच्यातील अबोला युती तुटण्यापर्यंत जाऊन पोहचला होता.

तत्कालीन सामनाच्या हिंदी आवृत्तीचे कार्यकारी संपादक प्रेम शुक्ला यांनी एक आठवण एके ठिकाणी सांगितली आहे.

ठाण्याच्या रंगशारदा येथे भाजपचा एक कार्यक्रम होता. कार्यक्रम पार पडल्यानंतर प्रेम शुक्ला प्रमोद महाजन यांच्या मुलाखतीसाठी गेले. त्यावेळी महाजन यांनी त्यांना मुलाखत कुठे प्रकाशित होणार आहे हे विचारलं. प्रेम शुक्ला यांनी सामना म्हणून सांगितलं. 

प्रमोद महाजन म्हणाले,

“तुमचे उद्धव तुम्हाला माझी मुलखात सामना मध्ये छापू देणार नाहीत.”

याच कारण काय विचारल्यावर महाजनांनी सांगितलं की २००४ सालापासूनच त्यांच्यात आणि उद्धव ठाकरे यांच्यात अबोला आहे. इतकंच काय तर उद्धव ठाकरे यांनी महाजनांचे फोन कॉल्स उचलायचं देखील बंद केलं होतं.  

असं म्हणतात की १९९९ सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर देखील शिवसेना भाजपला सत्ता स्थापनेची संधी होती. पण नारायण राणे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद जाणार यावरून शिवसेनेतील इतर नेते नाराज होते तर इकडे भाजपमधल्या गोपीनाथ मुंडे यांची महत्वाकांक्षा मोठी होती. या घोळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले आणि त्यांची सत्ता स्थापन झाली.

२००४ सालच्या निवडणुकांच्या आधी या दोन्ही पक्षांमध्ये कुरबुर वाढली. तो पर्यंत उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष बनले होते. सत्ता आली तर मुख्यमंत्री तेच होणार याची चर्चा होती. पण प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडेंच्या मुख्यमंत्रीपदासाठी प्रयत्नशील होते. अशातच लोकसभा निवडणुका आल्या. प्रचारावेळी काही तरी वादाचे प्रसंग निर्माण झाले. यातूनच महाजन आणि उद्धव ठाकरे यांच्यातील अबोला सुरु झाला.

प्रमोद महाजन यांनी प्रयत्नपूर्वक शिवसेनेला महाराष्ट्राच्या बाहेर वाढू दिलं नव्हतं. त्यांना ठाऊक होतं कि हिंदुत्ववादी विचासरणी असलेल्या सेनेला वाढू देणे म्हणजे भाजपचे पंख कापल्याप्रमाणे आहे. इकडे उद्धव ठाकरे जेव्हा कार्याध्यक्ष बनले तेव्हा त्यांनी प्रमोद महाजन यांना बालसाहेबांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सुरु केला.

महाजन हे बाळासाहेबांचे लाडके होते. मुंडे यांना मुख्यमंत्री करण्याच्या त्यांच्या प्रयत्नावरून बाळासाहेब नाराज झाले होते पण प्रमोद महाजन यांनी त्यातूनही त्यांची समजूत काढली होती. पण उद्धव ठाकरे अखेरपर्यंत नाराजच राहिले. पण बाळासाहेब ठाकरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवला त्यामुळे दोन्ही पक्षांची युती टिकली.

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.