ठाकरे गटाचे नेते आता फक्त iPhone वापरणार आहेत, कारण…

सध्या टेक्नोलॉजी प्रचंड डेव्हलप झालीये हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. त्यात विषय असा आहे की, या टेक्नोलॉजीमुळे कामं जितकी हलकी होतात तितकंच नुकसानही होतं. याचं अगदी साधं सरळ उदाहरण द्यायचं झालं तर, मोबाईलमुळे कम्युनिकेशन सोपं झालंय खरं, पण त्यापुढे जाऊन विचार करायचा झाला तर, मोबाईल हॅक होण्याचंही प्रमाण वाढलंय. त्यामुळे, तुमचा डेटा हा पब्लिक डोमेनमध्ये लीक होऊ शकतो.

सध्या राजकीय क्षेत्रात सुद्धा या डेटा लीक होण्याबद्दल चर्चा आणि विधानं सुरूच असतात. रश्मी शुक्ला यांचं नाव आलेलं फोन टॅपिंग प्रकरण राज्यभरात गाजलं होतं आणि आजही कुठे ना कुठे या प्रकरणाचा उल्लेख केला जातोय.

आता हे फोन टॅपिंग आणि डेटा प्रायव्हसी जपण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून नवी उपाययोजना केली जात असल्याच्या चर्चा आहेत. त्यासाठी ठाकरे गटाने आपल्या नेत्यांपासून ते पदाधिकारी अगदी शिवसैनिकांनाही आयफोन वापरण्याच्या सुचना दिल्याचं बोललं जातंय. आता या संदर्भात ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंंबादास दानवे यांनी एका माध्यमाशी बोलताना अशा सुचना देण्यात आल्या नसल्याचं म्हटलंय. ते म्हणाले,

“अशा कोणत्याही प्रकारच्या सुचना कार्यकर्ते किंवा नेत्यांना देण्यात आलेल्या नाहीत. आताच्या घडीला ज्या पद्धतीचं राजकारण सुरू असतं जसं की ऑडियो क्लिप व्हायरल होणं वगैरे, मागच्या काळात रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरण झालं होतं. त्यामुळे प्रत्येकाने आपला डेटा जपण्यासाठी मी तरी आय फोन वापरण्याचा सल्ला देतो. पक्षाकडून अशी सुचना आलेली नाही.”

आता, त्यांनी स्पष्टपणे कुठेच अशा सुचना देण्यात आल्या आहेत असं म्हटलं नसलं तरी आयफोन वापरल्यास डेटा सिक्युर्ड राहू शकतो असंही म्हटलंय.

त्यामुळं मग आयफोन खरंच सिक्युर्ड असतो का असा प्रश्न मनात येणं सहाजिक होतं. याच प्रश्नाचं उत्तर आम्ही शोधलंय. आता आयफोन हे महागडे आणि भारी असतात हे खरंच आहे. आयफोनच्या सिक्युरिटीचा विचार केला तर, आयफोनची सिक्युरिटी ही इतर फोन्सपेक्षा चांगली असल्याचं अनेक टेक्निकल एक्स्पर्ट्स सांगतात.

आयफोनमध्ये फेस लॉक, टच लॉक असे  फोन अनलॉकिंगचे फीचर्स आहेत. आता हे फीचर्स तर, आता जगातल्या जवळपास सगळ्याच फोन्समध्ये असतात. मग, या आयफोनमध्ये असं विशेष काय असतं?

तर, लेटस्ट आयफोनमध्ये फेस स्कॅनिंगसाठी फ्लड इल्युमिनेटर, इंफ्रारेड कॅमेरा, फ्रंट कॅमेरा, डॉट प्रोजेक्टर या सगळ्या डिव्हाइसेसचा वापर केला गेलाय. असं आम्ही नाही तर, २ कोटी २८ लाख सब्स्क्राईबर्स असलेला टेक्निकल गुरूजी असं म्हणतोय.

हा झाला फोनच्या सिक्युरिटीचा भाग, पण डेटा प्रायव्हसीचं काय?

या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी मग आम्ही खुद्द अ‍ॅप्पलसाठी काम करणाऱ्या एका व्यक्तीशी चर्चा केली. ही व्यक्ती आयओएस डेव्हलपर म्हणून काम करते. या व्यक्तीने नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर ही माहिती बोल भिडूला दिलीये. ते म्हणाले,

“एखाद्या डिव्हाईसमधला डेटा हा सिक्युर्ड आहे किंवा नाही हे आपल्या वापरावर अवलंबून असतं. एखादं अ‍ॅप्लिकेशन फोनमध्ये घेताना काही अ‍ॅप्लिकेशन्स आपल्याकडे ऑथोरिटी मागते. आता त्यासंदर्भातल्या टर्म्स आणि कंडीशन्स न वाचता तुम्ही सगळ्या पर्मिशन्स देऊन टाकल्या तर, तुमचा डेटा हा लीक होणारच आहे. आयफोन असो किंवा अँड्रॉईड एखादी लिंक तुम्ही ओपन करताय तर, त्या लिंकच्या अगेन्स्ट आयपी अ‍ॅड्रेस शेअर होऊ शकतो.”

फोन टॅपिंग संदर्भात बोलताना आयओएस डेव्हलपर म्हणाले,

“फोन टॅप होणं किंवा न होणं याचा तो फोन कोणत्या ब्रँडचा आहे याच्याशी संबंध नसतो. आयफोनवरून केले जाणारे किंवा येणारे कॉल्ससुद्धा टॅप होऊ शकतात.”

त्यामुळे, फोनच्या सिक्युरिटी बाबतीत आयफोन हा इतर मोबाईल्सपेक्षा उत्तम असल्याचं अनेकांचं मत असलं तरी, आयफोन खरंच आपला डेटा पुर्णपणे सिक्युर्ड ठेवू शकत नाही असं या आयओएस डेव्हलपर असलेल्या व्यक्तीचं मत आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.