ठाकरे सरकारमधले हे ‘८’ नेते आणि त्यांचे नातेवाईक चौकशी-आरोपांच्या फेऱ्यात अडकले आहेत.

ठाकरे सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचं प्रकरण शांत होत नाही तोवर वनमंत्री संजय राठोड यांच्यामागे आरोपांचं शुक्लकाष्ठ चालू झालं आहे. पण मागच्या १ वर्षात या दोन्ही मंत्र्यांसोबत सरकारमधील एकूण ८ नेते, मंत्री किंवा त्यांचे नातेवाईक यांच्यामागे आरोप किंवा चौकशीच्या फेऱ्या चालू आहेत.

आरोप असलेले नेते किंवा मंत्री हे आहेत

१. अजित पवार : 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर मागील अनेक दिवसांपासून सिंचन घोटाळ्याचे आरोप होतं आहेत. याच आरोपांवरून त्यांनी २०१२ मध्ये उपमुख्यमंत्री असताना राजीनामा देखील दिला होता.

सध्या सत्तेत आल्यानंतर मे २०२० मध्ये ईडीने याच सिंचन घोटाळ्यातील मनी लाँडरिंग (आर्थिक गैरव्यवहार) प्रकरणी चौकशी सुरू केली आहे.

मात्र २०१८ मध्ये राज्याच्या एँटी करप्शन ब्यूरोने मात्र अजित पवारांना सिंचन घोटाळ्याप्रकरणी क्लिनचीट दिली होती.

काही दिवसांपूर्वी राज्य सहकारी बँकेमधील २५ हजार कोटींच्या कथित आर्थिक घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टलाही ईडीने विरोध दर्शवला आहे.

२. आदित्य ठाकरे :

बॉलिवुड अभिनेता सुशांत सिंह राजूपत याने जून २०२० मध्ये आत्महत्या केली, यानंतर त्याच्या मृत्यूप्रकरणी भाजप नेत्यांनी थेट नाव न घेता पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले होते. मात्र त्यांनी आरोप फेटाळून लावले होते.

पुढील काही दिवसात माध्यमांमधून या प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्या नावाची चर्चा थांबली. मात्र त्यानंतर देखील भाजप खासदार नारायण राणे यांनी या प्रकरणी आदित्य ठाकरे यांची चौकशी झाली तर ते कोठडीत जातील, असं म्हंटल होतं.

३. धनंजय मुंडे 

मागील महिन्यात राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेने बलात्काराचा आरोप केला होता. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती.

त्यावर मुंडे यांनी हे आरोप फेटाळून लावत एक फेसबुक पोस्ट देखील लिहिली होती. यात तक्रारदार महिलेची बहिण करुणा शर्मा हिच्याशी सहमतीने माझे संबंध असल्याचं मुंडे यांनी मान्य केलं. पण, बलात्काराचा आरोप पूर्णपणे नाकारला होता. पुढे ४ दिवसांमध्येच संबंधित महिलेने ही तक्रार मागे घेतली होती.

त्यानंतर या महिन्यात करुणा शर्मा यांनी ३ महिन्यांपासून माझ्या मुलांना त्यांच्या चित्रकूट बंगल्यात डांबून ठेवलं असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांच्यावर केला होता.

४. संजय राठोड

पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने काही दिवसांपूर्वी पुण्यातील महंमदवाडी येथील हेवन पार्क या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणात विदर्भातील एका मंत्र्यांसोबत किंवा महाविकास आघाडीतील एका मंत्र्यांसोबत परिचय असल्याची माहिती देण्यात आली.

मात्र भाजपकडून थेट वनमंत्री संजय राठोड यांच्यावर हे आरोप केले. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणाशी संजय राठोड यांचा संबंध असल्याचा आरोप केला आहे.

५. प्रताप सरनाईक

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने काही दिवसांपूर्वी धाड टाकली होती. कथित टॉप सिक्युरीटी घोटाळ्याप्रकरणी सरनाईक आणि त्यांच्या मुलाची ईडीने चौकशी देखील केली आहे.

६. एकनाथ खडसे. 

भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत आलेल्या एकनाथ खडसे यांची याआधी पासूनच चौकशी सुरु होती. त्यानंतर डिसेंबर महिन्यात एकनाथ खडसेंना ईडीने चौकशीसाठी नोटीस बजावली. पुण्यातील भोसरी जमीन व्यवहारप्रकरणी चौकसीसाठी ईडीने त्यांना नोटीस बजावली होती.

या नेत्यांच्या नातेवाईकांवर आहेत आरोप

७. संजय राऊत

शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची काही दिवसांपूर्वी ईडीने चौकशी केली. पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी प्रवीण राऊत यांची चौकशी चालू आहे. याच प्रवीण यांच्या पत्नी माधुरी राऊत यांच्याकडून वर्षा राऊत यांनी ५५ लाख रुपये घेतले होते. त्यामुळेच त्या ईडीच्या रडारवर आल्या होत्या.

मात्र हे ५५ लाख रुपये वर्षा राऊत यांनी आता परत केले असल्याच्या बातम्या आल्या होत्या.

८. नवाब मलिक

राज्याचे अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांचा जावई समीर खान यांना नार्कोटीक कंट्रोल ब्यूरोने मागील महिन्यात अटक केली होती. ड्रग्ज ट्रफिकिंग प्रकरणी ही अटक करण्यात आल्याची माहिती नार्कोटीक कंट्रोल ब्यूरोने दिली होती.

यावेळी ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आलेल्या एका आरोपीसोबत समीर खान यांनी आर्थिक व्यवहार केले आहेत असा त्यांच्यावर आरोप होता.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.