३ वर्ष जुन्या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर कारवाई होऊ शकते का?

राज्याच राजकारण सध्या गाजत आहे ते कानाखाली मारण्याच्या भाषेने. आधी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना थोबाडीत मारण्याबाबत वक्तव्य केले. त्यामुळे शिवसैनिक चिडून रस्त्यावर उतरले. राणेंवर चार शहरांत गुन्हे दाखल झाला. अटक झाली आणि जामीन देखील मिळाला.

मात्र त्यानंतर भाजपने आणि विशेषतः राणेंनी या सगळ्याचा हिशोब चुकता करण्याचा चंगच बांधला. याच निश्चयातून भाजपने उद्धव ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ समोर आणला आहे, ज्यात ते योगी आदित्यनाथ यांना कानाखाली मारण्याची भाषा करताना दिसत आहेत. आता भाजप याच व्हिडीओतील वक्तव्यातून हिशोब चुकता करण्याचा विचार करत आहे. त्यासाठी आता त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला आहे.

मात्र आता प्रश्न असा आहे कि ३ वर्ष जुन्या वक्तव्यामुळे उद्धव ठाकरेंवर आता कारवाई होणार का?

२०१८ मध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चप्पल घालून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर जोरदार टिका केली होती.

ते म्हणाले होते, आमचे दैवत शिवाजी महाराजांना हार घालायला हा योगी चप्पल घालून जातो. वाटते तर असे की, तीच चप्पल घ्यावी आणि त्याच्या थोबाडात हाणावी.

यानंतर उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावरून बराच गदारोळ झाला.

त्यावेळी उत्तर प्रदेशच्या हिंदू युवा वाहिनी नावाच्या संघटनेने उद्धव ठाकरे यांच्या या विधानाचा निषेध केला होता. सोबतच उद्धव ठाकरेंना जोडे मारणाऱ्याला ५१ हजार रुपयांचे बक्षीस या संघटनेने जाहीर केले होते.

इतकच नाही तर योगी आदित्यनाथ यांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. ते म्हटले होते, ‘माझ्याकडे त्यांच्यापेक्षा जास्त शिष्टाचार आहेत आणि  कशी द्यावी हे मला माहित आहे. मला त्यांच्याकडून काही शिकण्याची गरज नाही.

आता याच वक्तव्याप्रकरणी उद्धव ठाकरेंवर देखील गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मात्र गुन्हा दाखल झाला तरी त्यांच्यावर कारवाई होऊ शकते का?

तर याबाबत बोल भिडूशी बोलताना ऍड. असीम सरोदे म्हणाले, 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रार होऊ शकत नाही. तक्रार दाखल करुन घेताना कायदेशीर अडचणी येऊ शकतात. कायद्यानुसार एखादी घटना घडली तर लगेच तक्रार दाखल करणं गरजेचं आहे. कारण crpc मधील कलम ४६८ मध्ये स्पष्ट म्हंटले आहे कि गुन्हा घडल्याच्या काही कालमर्यादेमध्ये तक्रार दाखल करणे गरजेचे आहे.

मात्र या गोष्टीला ३ वर्षे उलटून गेली आहेत, त्यामुळे काय वाद निर्माण झाला असं वाटत नाही. म्हणूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर कारवाई होऊ शकत नाही.

तर याच बाबत ‘बोल भिडू’शी बोलताना ऍड. कल्याणी माणगावे म्हणाल्या कि, 

तक्रार होऊन गुन्हा दाखल करून घेता येऊ शकतो. मात्र कारवाई कितपत होऊ शकेल याबाबत शंका आहेत. कारण २ गोष्टी आहेत.

एक तर संबंधित व्हिडीओ क्लिप आपण नीट ऐकली तर आपल्या लक्षात येऊ शकेल कि त्यांनी कुठेही थेट योगी आदित्यनाथ असं म्हंटलेलं नाही. त्यांनी केवळ योगी असा उल्लेख केलेला आहे. योगी नावाचे अनेक व्यक्ती असतात. याच तांत्रिक मुद्द्यावर बोट ठेवता येऊ शकेल. सोबतच या तीन वर्षाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था याचा प्रश्न देखील निर्माण झालेला नाही.

मात्र यापलीकडे जाऊन देखील कारवाई करण्याची वेळ आलीच तर कलम ५०३ या जाणीवपूर्वक अपमानजनक वक्तव्य करणं या अंतर्गत कारवाई होऊ शकते. या कलमांतर्गत जास्तीत जास्त २ वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे. मात्र पुन्हा नावाच्या तांत्रिक मुद्द्याचा प्रश्न निर्माण होऊ शकते.

या सगळ्यामुळे आता या पुढच्या काळात पोलीस नेमकी काय भूमिका घेणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र यातून बोलण्याबद्दलचा एक धडा सगळ्याच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी घ्यायला हवा हे नक्की.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.