आणि त्यादिवसापासून शिवसेनेवर उद्धव ठाकरेंच राज्य सुरु झाल.

३० जानेवारी २००३,
महाबळेश्वर मध्ये शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांच शिबीर भरले होते. माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे व शिवसेनेचा भविष्य समजले जाणारे राज ठाकरे बोलत होते. बाळासाहेबांची अनुपस्थिती दिसून येत होती. स्वतः राज ठाकरे बोलताना म्हणाले,

“गेले काही दिवस मी माननीय बाळासाहेबांना शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर करा असे मागे लागलो होतो. गेल्या दोनतीन दिवसांपूर्वी बाळासाहेब मला म्हणाले की कार्यकर्त्याची एक बैठक घे. त्यांच्याशी बोलून बघ. आणि सर्वाना जर हा निर्णय मान्य असला तर तो ठराव तुम्ही करून घ्या पण मी तिथे उपस्थित असणार नाही. काही वेळाने शिवसेनाप्रमुख येतीलच. तो ठराव मी तुम्हाला वाचून दाखवत आहे.

असं म्हणून राज ठाकरेंनी आपल्या जवळचा कागद उचलला आणि ते म्हणाले,

“ठराव आहे शिवसेना पक्षात नवीन तयार झालेल्या कार्याध्यक्ष पदासाठी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांची निवड या प्रतिनिधी सभेने करावी असे मी सुचवीत आहे.”

टाळ्यांचा प्रचंड गडगडाट झाला. राज ठाकरेंनी ती चिठ्ठी खिशात ठेवली होती. उद्धव ठाकरेचं पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार केला.

शिवसेना नेत्यांना कळाल होतं की बाळासाहेबांनी आपला वारसदार निवडला आहे. काही वेळानी बाळासाहेब आले. त्यांनी तिथ गोळा झालेले हारतुरे पाहून विचारल की हे काय आहे? तेव्हा त्यांना सांगिण्यात आलं की राजने उद्धवना शिवसेना कार्याध्यक्ष जाहीर केलंय. बाळासाहेब म्हणाले,

“कोणाला विचारून केलं?”

लोकांना प्रश्न पडला की बाळासाहेबांना माहित नाही आणि एवढा मोठा निर्णय राज ठाकरेंनी घेतलाच कसा? राज ठाकरे कायम म्हणत होते की मी उद्धवच्या आड येणार नाही. अशी वेळ आली तर मी राजकारण सोडेन. उद्धव ठाकरेंना अनुभव नव्हता पण तरी घराणेशाहीचा विरोध करणाऱ्या बाळासाहेबांच्या शिवसेनेने त्यांना वारसदार नेमले होते.

वरवर पत्रकार परिषदेमध्ये कितीही गोडीगुलाबी चालू असली तरी ठाकरे कुटुंबीयांच्यामध्ये सार काही आलबेल नाही हे पत्रकारांना जाणवत होतं.

किणी हत्याकांड प्रकरणापासून राज ठाकरे सक्रीय राजकारणापासून थोडेसे दूरच झाले होते. त्यापूर्वी बाळासाहेबांची कार्बन कॉपी असं त्यांना ओळखल जात होत. वक्तृत्वापासून प्रत्येक गोष्टीत बाळासाहेबांच आक्रमक व्यक्तिमत्व राज ठाकरेंच्यात उतरलं होतं. अगदी कमी वयात विद्यार्थीसेनेच्या माध्यमातून त्यांनी संघटनेमध्ये काम केलं होतं.

त्यामानाने उद्धव ठाकरे उशिरा राजकारणात आले होते.

कोणी कितीही बोलल तरी या दोघांच्यात वाद होणार याचा अंदाज येऊ लागला होता. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राज समर्थकांची तिकिटे कापल्यापासून कुरबुर सुरु झाली होती. २००४ सालच्या विधानसभा निवडणुकीत देखील तेच घडले.

याच काळात उद्धव यांच्या येण्याने नाराज झालेल्या नारायण राणेनी पक्ष सोडला. त्यांच्या कणकवलीच्या जागेवर पोटनिवडणुक होती. त्याची जबाबदारी मुद्दामहून राज ठाकरेंना देण्यात आली. तिथल्या प्रचारात अनेक वाद झाले. राजनी प्रचार सोडून परत मुंबईला जायचं ठरवलं. त्यांच्या विरुद्ध सामनात मोठा  ‘एक कोंबडी सिंधुदुर्गाच्या वेशीपासून परत आली’  अशी टीका करण्यात आली. राज समर्थक व उद्धवसमर्थक यांच्यात बऱ्याच ठिकाणी वाद होऊ लागले.

अखेर २७ नोव्हेंबर २००५ रोजी राज ठाकरेंनी आपण शिवसेना सोडतोय हे जाहीर केलं. आता ते राजकारणाचा संन्यास घेतील किंवा नारायण राणेंच्या प्रमाणे काँग्रेसमध्ये जातील किंवा आणखी वेगळा पक्ष निवडतील अशी अनेक अटकळे बांधली जात होती.

काही महिन्यांनी या सगळ्यांचा अंदाज खोटा ठरवत ९ मार्च २००६ रोजी  राज ठाकरेंनी स्वतःच्या वेगळ्या पक्षाची स्थापना केली.

बाळासाहेब म्हणत राहिले की उद्धवला राजनेच कार्याध्यक्ष बनवलेलं, मला ठाऊकच नव्हत. राज ठाकरेनी हे सगळ खोट आहे असं सांगितलं. त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झेंड्याखाली सवतासुभा सुरु केला. आता पर्यंत छगन भुजबळ, नारायण राणे यांच्या जाण्याने शिवसेना फुटली होती पण राज ठाकरेंच्या जाण्याने ठाकरे घराण्यातील फुट चर्चा विषय ठरला. काका पुतण्याचा हा वाद महाराष्ट्रासाठी पहिल्यांदाच अनुभवायला मिळाला होता.

आणि इकडे शिवसेनेवर उद्धव ठाकरे यांचा एकहाती अंमल सुरु झाला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.