बाहेर सत्तेचा खेळ चालू होता आणि हे दोघे एकाच जंगलात अडकून पडलेले..!!!

दिग्विजय सिंग कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीत उतरलेत. गहलोत यांनी माघार घेतल्यानंतर आत्ता दिग्विजय सिंग विरुद्ध शशी थरूर असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत. तर दूसरीकडे कोर्टाच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंकडून पक्ष, चिन्ह जातय का या चर्चा सुरू झाल्या आहेत.

सध्यातरी हे दोन्ही नेते बातम्यांमध्ये आहेत. चर्चेत आहेत. पण हा किस्सा आहे सुमारे २० वर्षांपूर्वीचा 

दिग्विजय सिंग तेव्हा मुख्यमंत्रीपदी होते. जवळपास दहा वर्षे त्यांनी मध्यप्रदेशच नेतृत्व केलं होतं त्यामुळे काँग्रेसच्या राष्ट्रीय राजकारणात देखील त्यांचं वजन वाढलं होतं.

मध्यप्रदेशमधील बांधवगड जंगल हे वाघांसाठी फेमस आहे. दिग्विजय सिंग हे  राजघराण्यातील असल्यामुळे त्यांना पूर्वीपासून शिकारीचा शौक होता. आपल्या महाविद्यालीयन जीवनात त्यांनी बांधवगडच्या जंगलात कित्येकदा मोठमोठ्या शिकारी केल्या होत्या. पण पुढे इंदिरा गांधींनी शिकारीवर बंदी आणल्यापासून त्यांनी आपल्या बंदुकीच्या शूटिंगचा छंद कॅमेऱ्याच्या शूटिंगमध्ये बदलला.

वाईल्ड लाईफ फोटोग्राफी 

राजकारणाच्या धकाधकीतून विरंगुळा म्हणून दिग्विजय सिंग बांधवगडच्या जंगलात जाऊन तिथे प्राण्यांचे फोटोग्राफी करायचे. या वाईल्ड लाईफ फोटोग्राफी साठी शिकारीप्रमाणेच एकाग्रता, संयम आणि अनेक तास वाट पाहण्याची चिवट क्षमता लागते.

दिग्विजय म्हणतात,

अनेकदा माझ्यासोबत या वाघांच्या फोटोग्राफी साठी महाराष्ट्रातून शिवसेनेचा वाघ यायचा, उद्धवजी ठाकरे.

वयाने तरुण असले तरी उद्धव ठाकरे यांची दिग्विजय सिंग यांच्याशी फोटोग्राफी वरून चांगली मैत्री जमली होती. बऱ्याचदा ते जेव्हा बांधवगडला येणार असायचे तेव्हा मुख्यमंत्री त्यांची तिथल्या गेस्ट हाऊस मध्ये खास सोय करायचे. इतकेच नाही तर जमत असेल तर स्वतःदेखील त्यांच्या सोबत फोटो ग्राफीला जाण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा.

दिग्विजयसिंग सांगतात की आमची मैत्री इतकी चांगली होती की त्याकाळात उद्धव ठाकरे हे मध्यप्रदेशचे पर्मनंट स्टेट गेस्ट होते.  

असच एकदा दोघेही बांधवगडला आले. दोन चार दिवस त्यांचा मुक्काम होता. नेहमीप्रमाणे दिवसभर त्यांनी वाघांचे आणि इतर प्राण्यांचे फोटो काढले. रात्री दोघेही मुक्कामाला तिथल्या सरकारी गेस्ट हाउसवरच होते. हसत खेळत गप्पांमध्ये त्यांचा तिथला वेळ निघून जात होता.

अशातच एक बातमी आली कि सेनेचे विधानसभेतील विरोधी पक्ष नेते नारायण राणे यांनी विलासराव देशमुखांच्या सरकारविरुद्ध अविश्वासाचा ठराव आणला आहे.

अपक्षांच्या टेकूवर उभे असलेले काँग्रेस राष्ट्रवादी सरकार हे अस्थिर करण्यासाठी शिवसेना भाजप युतीचा अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरु होता आणि त्यात नारायण राणे यांना यश मिळालं होतं.

सरकारमधीलच दहा बारा नाराज आमदार युतीच्या गळाला लागले होते. राज्यात राजकीय भूकंप झाला. असंतुष्ट आमदारांना घेऊन अविश्वास प्रस्ताव जिंकण्याचा नारायण राणे यांचा प्रयत्न सुरु होता. मुख्यमंत्रीपद अगदी त्यांच्या आवाक्यात आलं होतं.

तिकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पोलिटिकल मॅनेजर्सनी आपली सूत्रे वेगाने हलवण्यास सुरवात केली. शरद पवारांनी आघाडीच्या आमदारांना इंदौरला हलवलं.          

हे सगळं सुरु होतं तेव्हा उद्धव ठाकरे होते बांधवगड मध्ये दिग्विजय सिंग यांच्या सोबत बांधवगडच्या जंगलात फोटोग्राफीसाठी आले होते. ते  तेव्हा नव्यानेच शिवसेनेचे कार्याध्यक्ष बनले होते. शिवसेना प्रमुख स्वतः बाळासाहेब ठाकरे असले तरी कार्याध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांचा निर्णय प्रक्रियेतील सहभाग वाढला होता.

रात्रीच्या वेळी सरकार पाडण्याच्या घडामोडीला वेग आला. स्वतः उद्धव ठाकरे फोनवर मुंबईमध्ये काय चाललंय याचा आढावा घेत होते. गंमत म्हणजे याच गेस्ट हाऊस मध्ये त्यांच्या सोबत असलेल्या दिग्विजय सिंग यांना काँग्रेसचे आमदार इंदौरमध्ये असल्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांचा फोन सुरु होता.

एक अर्थे सरकारच्या अविश्वास प्रस्तावाचे सगळे डावपेच बांधवगडच्या जंगलातून आखले जात होते. दिग्विजय सिंग म्हणतात,

“हम को मालूम था क्या हो रहा है मगर आपस में चर्चा नही कर पा रहे थे.”

उद्धव ठाकरे यांना मुंबईला जाण्याची गडबड होती मात्र ते या राजकीय घडामोडीत बांधवगड मध्ये अडकले होते. दुसऱ्या दिवशी ते मुंबईला परतले. काँग्रेसने देखील आपले आमदार इंदौरमधून बेंगलोरला हलवले. विलासराव देशमुख यांच्या हुशारीने नारायण राणे आणि त्यांचा डाव परतवून लावला. काँग्रेसचे सरकार अविश्वास प्रस्तावाच्या अग्निपरीक्षेतून सहीसलामत पार पाडले.

दिग्विजय सिंग हा किस्सा कधीच विसरू शकले नाहीत. पुढे उद्धव ठाकरे आणि त्यांच्यात अनेकवेळा राजकीय टीकाटिप्पणी देखील झाली. त्यांनी ठाकरेंना मूळचे बिहारचे असल्याचा आरोप केला तर उद्धव ठाकरे यांनी दिग्गी राजांच्या विधानांना मूर्खपणाचे ठरवले. 

पण पॉलिटिकली एकमेकांचे हाडवैरी असले असले तरी त्या दोघांमधील फोटोग्राफिमधून बनलेली मैत्री अतूट आहे. अजूनही उद्धव ठाकरे कधीकधी आपल्या लाडक्या बांधव गडच्या जंगलात जात असतात. त्यांनी इथल्या गेस्ट हाऊसला दोन बस गाड्या देखील भेट दिलेल्या आहेत. तिथले कर्मचारी आजही उद्धव ठाकरेंच्या आणि दिग्विजय सिंग यांच्या वाईल्ड लाईएफ फोटोग्राफीच्या आठवणी सांगतात.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.