२१ वर्षे लागली पण उदित नारायण यांच्या दुसऱ्या लग्नाचा घोळ अखेर जगासमोर उघड झालाच

बदलत्या जमान्यात गाण्यांची धून बदलली. रिमिक्स वैगरे गाण्यांचे फॅड आले. पण आमच्यासारखी जी युवा पिढी आहे, ज्यांना अजूनही खरी मजा जुन्या गाण्यांमध्ये येते. मोहम्मद रफी, किशोर कुमार सारख्या महान गायकांची गाणी कधीही ऐकली तरी मन शांत होतं. आसपास कितीही गर्दी असली तरीही या गायकांची गाणी मनातली चलबिचल दूर करून एका वेगळ्याच मुड मध्ये घेऊन जातात. आमच्या पिढीसाठी एक असाही गायक आहे, जो आमच्या विशेष जवळचा.

“पापा केहते है बडा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा, मगर ये तो कोई ना जाने के मेरी मंजिल हैं कहा”

या गाण्यातून जणू काही त्याने आमच्या मनातल्या भावनांना गाण्यातून वाट करून दिली. तर ‘पहला नशा, पहला खुमार’ सारख्या गाण्यातून प्रेमात पडल्यानंतर स्वत:च्याच धुंदीत जगण्याची शिकवण दिली.

हा गायक म्हणजे उदित नारायण. उदित नारायण यांचा आज वाढदिवस.

९० चं दशक उलटून गेलं होतं. आणि या दरम्यान मध्येच जन्मलेल्या माझ्यासारख्या मुलांनी जेव्हा सिनेमांची गाणी ऐकायला सुरुवात केली तेव्हा सर्वप्रथम उदित नारायण यांचीच गाणी कानावर पडली. कारण उदितजी १९९० पासून ते आजतागायत या संगीताच्या दुनियेत कार्यरत आहेत. यामुळे ९० नंतर जन्माला येणारी प्रत्येक पिढी त्यांची गाणी ऐकून मोठे झाले असावेत.

पण याच उदित नारायण यांच्या आयुष्यात एक मोठा वादग्रस्त किस्सा घडला होता, तोच आज तुम्हाला सांगणार आहे.

तारीख आजची, साल १९५५. यादिवशी उदित नारायण जन्माला आले. तसं उदित नारायण यांचं पूर्ण नाव उदित नारायण झा. पुढे इंडस्ट्रीत बऱ्यापैकी स्थिरस्थावर झाल्यावर किंवा सुरुवातीपासून नावातला ‘झा’ हा शब्द उदित नारायण यांनी वापरला नाही. असो !

उदित नारायण यांचे बाबा नेपाळी तर आई भारतीय. त्यांचे वडील नेपाळी असल्याने जेव्हा उदित नारायण यांना पद्मश्री देण्यात आली तेव्हा त्यांच्या भारतीय नागरिक असण्याच्या गोष्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. पण उदित नारायण यांनी सर्व आरोपांचं खंडन केलं. त्यांचा जन्म बिहार येथील बैसी या गावी झाला.

पुढील आयुष्यात सिनेमात गाणी गाऊन प्रेक्षकांकडून दाद मिळवलेल्या उदित नारायण यांना आयुष्यातली पहिली वाहवा वयाच्या ८ व्या वर्षी मिळाली.

बालपणी त्यांच्या गावात रामलीलांचे कार्यक्रम व्हायचे. त्या कार्यक्रमात उदित यांनी पहिल्यांदा गाणं सादर केलं. या गाण्यांना दाद देताना उपस्थित लोकांनी टाळ्या वाजवून छोट्या उदितचं कौतुक केलं. उदितजी मोठे झाले. सुरुवातीला मैथिली आणि नेपाळी भाषेतली गाणी गाणारे उदित पुढे मुंबईत आले. १९८० साली राजेश रोशन यांनी ‘उन्निस – बिस’ सिनेमासाठी उदित नारायण यांना गाण्याची संधी मिळाली. आणि इथून त्यांचा बॉलिवुडमध्ये प्रवेश झाला.

परंतु पुढची ८ वर्ष स्ट्रगल करून १९८८ साली आमिर खानच्या ‘कयामत से कयामत तक’ या सिनेमाच्या गाण्यांमुळे उदित नारायण यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली. हा सिनेमा आणि सिनेमातली गाणी सुपरहिट ठरली. आणि यानंतर उदित नारायण यांनी मागे वळून पाहिले नाही.

आत्ता उदित नारायण यांच्या आयुष्यातील वादग्रस्त किस्सा.. अगदी सिनेमात शोभावा असा प्रसंग उदित नारायणा यांच्या आयुष्यात घडला.

गायक म्हणून उदित नारायण यांचा स्ट्रगल सुरू होता. याचदरम्यान १९८४ साली त्यांनी रंजना नारायण यांच्याशी लग्न सुद्धा केले. पुढे गायक म्हणून स्वतःचं नशीब आजमावण्यासाठी उदित पत्नीला गावीच ठेवून मुंबईत आले. इथे आल्यावर ते एका नेपाळी गायिकेच्या प्रेमात पडले. या गायिकेचं नाव दीपा गेहेतराज. उदित आणि दीपा दोघांनी १९८५ साली लग्न केलं.

२००६ साली उदित नारायण यांची पहिली पत्नी रंजनाने मिडियासमोर लग्नाविषयी खुलासा केला. रंजना म्हणाली,

“मी इथे न्याय मागण्यासाठी आले आहे. मला संपूर्णपणे अंधारात ठेऊन उदित यांनी दिपाशी लग्न केलं. मी जेव्हा आमच्या लग्नाविषयी सर्वांना सांगायचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांनी मला आत्महत्येची धमकी देऊन गप्प केलं. परंतु आत्ता मला कसलीच भीती नाही.”

रंजनाच्या या वक्तव्यामुळे सर्वांना धक्का बसला.

उदित नारायण यांनी रंजना ही पहिली पत्नी आहे, ही गोष्ट स्पष्टपणे नाकारली. तिने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. परंतु जेव्हा रंजनाने त्यांच्या लग्नाचे फोटो दाखवले तेव्हा सत्य आणि पुरावा बाहेर आला. अखेर उदित यांनी रंजना सोबत झालेला विवाह कबूल केला. आणि तिला उत्पन्नातील वाटा देण्याचे मान्य केले.

अशाप्रकारे जे सर्व चाहते दिपाला उदित नारायण यांची पत्नी समजत होते. त्या सर्वांना २१ वर्षांनी कळालं की उदित नारायण यांची पहिली पत्नी रंजना आहे. सध्याच्या टीव्ही मालिकांमध्ये शोभेल असा किस्सा आहे हा.. असो ! दीपा आणि उदितजींचा मुलगा आदित्यचं नुकतंच लग्न झालं आहे. दोघाही बापलेकाची जोडी कायम चर्चेत असते.

उदित नारायण यांचं खाजगी आयुष्य कसंही असो.. त्यांचा आवाज मात्र प्रवासात, रात्रीच्या वेळेत, निवांत असताना, टेन्शनमध्ये, आनंदात, प्रेमात, विरहात अशा अनेक प्रसंगी कायम सोबत राहिला आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.