जहर अक्सर मध्ये राडा करणाऱ्या उदिताने शिक्षण पूर्ण करायसाठी फिल्म इंडस्ट्री सोडली होती..

लेह लद्दाख मधल हिमालयीन रखरखीत सौंदर्य. बॅकग्राउंडला बौद्ध मॉनेस्ट्री. तिथं उपचार घेत असलेला उगाच आपली बॉडी दाखवत गालावर खळ्या पडत हसणारा जॉन अब्राहम. त्याच्या पोटाला पट्टी बांधलेली असते. त्याची देखभाल करणारी एक नाजूक लद्दाखी मुलगी.

निर्जन वातावरण, दोघेही रोमँटिक मूड मध्ये आले आहेत.  बँक ग्राऊंडला राहत फतेह अली खानचा कातर आवाज कापत जातो.

लगन लागी तुमसे मन कि लगन.

खरं तर हिरो हिरोईन दोघांचीही ऍक्टिंगच्या साईडने बोंबाबोंब. तोंडावरचे भाव काही केल्या बदलत नाहीत. पण या गाण्यात दोघेही अफाट शोभले आहेत यात शंका नाही. पिक्चरचं नाव पाप होतं . हा पाप काय सिनेमाघरात टिकला नाही. पण त्यातली गाणी गाजली आणि त्यातली हिरोईन कायमची लक्षात राहिली.

उदिता गोस्वामी.

एकेकाळी अर्थ सारांश सडक जख्म असे एकापेक्षा एक बनवणाऱ्या महेश भट्टने दोन हजारच्या दशकात एक नवीन फॉर्म्युला डेव्हलप केला होता. तो स्वतः सिनेमा दिग्दर्शित करायचा नाही पण त्याचा भाऊ आणि कंपनी सिनेमा बनवायचे. एखादी एक्झॉटिक स्टोरी, भट्टांचा भाचा इम्रान हाश्मी हिरो. त्याच्या सोबत किसिंग सिन देणारी टंच हिरोईन. मग कधी लव्ह ट्रँगल तर कधी आणखी काय.

पण या सिनेमांचं एक बलस्थान असायचं ते म्हणजे त्यातली गाणी.

सुफी टाईपचं म्युजिक, जबरदस्त लिरिक्स, पाकिस्तानी गायक. पुढं हे सगळं गाळून तिथं थेट इम्रान हाश्मी आला. भट्ट कॅम्पचा पिक्चर बजेट कमी असायचं पण जरी पिक्चर पडला तरी त्यातल्या गाण्यांनी पिक्चरचा खर्च निघून जायचा. अशा या भट्ट कॅम्पचा पिक्चर मिळाला व म्हणून लोक तडफडायची.

क्वीन ऑफ अन-कन्व्हेन्शनल लाइफ चॉईस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उदिता गोस्वामीने तर पदार्पणच भट्ट कॅम्पच्या पिक्चरमधून केलेलं.

तिचा जन्म 9 फेब्रुवारी 1984 रोजी उत्तराखंडमधील एका छोट्या गावात झाला. वडील बनारसचे होते आणि आई शिलाँगची. उदिताचे सुरुवातीचे शिक्षण स्थानिक डीएव्ही शाळेत सुरू होते. जेव्हा ती 16 वर्षांची होती, तेव्हा तिला देहरादूनमधल्या फॅशन इंस्टिट्यूटसाठी रॅम्प वॉक करण्याची संधी मिळाली. मॉडेलिंगमध्ये उदिताची ही पहिली वेळ होती. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर उदिताने देहरादूनहून दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला. तिला मॉडेलिंगमध्ये आपले नशीब आजमायचे होते.

दिल्ली गाठल्यानंतर तिने आधी घरीच फोटोशूट केले. उदिताने आपले फोटो एमटीव्ही मॉडेल मिशन कॉन्टेस्टमध्ये पाठविली. ज्या ती जिंकली सुद्धा. सुरुवात थोडी हळू होती, परंतु मॉडेलिंग असाइनमेंट मिळायला सुरवात झाली. यावेळी, उदिता पेप्सी ते टायटन या मोठ्या कंपन्यांच्या अ‍ॅड फिल्ममध्ये दिसली.

कमी वेळातच उदिता दिल्लीची टॉप मॉडेल बनली. बर्‍याच शो आणि जाहिरातींसाठी तिला मुंबईतच जावे लागले. त्यावेळी पूजा भट्ट तिच्या करिअरचा पहिला चित्रपट ‘पाप’ दिग्दर्शित करणार होती. तिने एका फॅशन मासिकाकडे पाहिले, ज्यात मेनपेजवर उदिताचा फोटो होता. तिने उदिताबद्दल थोडीशी विचारपूस केली आणि मग ती तिला भेटायला दिल्लीला गेली.

मुंबईत झालेल्या तिसर्‍या बैठकीत उदिताला चित्रपटासाठी साइन केले होते. या चित्रपटातील त्यांचा हिरो जॉन अब्राहम होता. अशाप्रकारे उदिता गोस्वामीचे करिअर सुरू झाले. दरम्यान, क्रिटिकल अ‍ॅक्लेम आणि बॉक्स ऑफिस रिटर्न्स या दोन्ही प्रकरणांमध्ये ‘पाप’ हा अयशस्वी चित्रपट मानला गेला.

मोहित सूरी दिग्दर्शित ‘जहर’ या चित्रपटातून तिला प्रसिद्धी मिळाली. ज्याला महेश आणि मुकेश भट्ट यांच्या कंपनीने प्रोड्यूस केले होते. चित्रपटाच्या आधी ‘जहर’चे एक पोस्टर रिलीज करण्यात आले. यात पांढऱ्या चादरीत गंडाळलेल्या उदिताची पाठ दिसत होती. जसे चित्रपट निर्मात्यांना हवे होते, हे पोस्टर खूप हिट झाले.

एका मुलाखतीत भट्ट बंधूंच्या या निर्णयाबद्दल विचारले असता उदिताने त्यांना सपोर्ट केले. ती म्हणाली,

त्याच आठवड्यात अजय देवगण संजय दत्त बॉबी देओल असे दिग्गज कलाकार असणारा मल्टी-स्टारर फिल्म ‘टँगो चार्ली’ रिलीज होणार होता.या सिनेमाबरोबर रिलीज होणाऱ्या ‘जहर’ मध्ये नवीन अॅक्टर्सने काम केले. अशा परिस्थितीत चित्रपटाची चर्चा रंगण्यासाठी हे केले गेले.

प्रेक्षक काही थिएटरमध्ये येतील त्यांना एक चांगला चित्रपट बघायला मिळाला. पण जेव्हा उदिताला तिच्या बॅकलेस प्रमोशनल पोस्टरबद्दल विचारले गेले तेव्हा ती भडकली.

तिने एका मुलाखतीत म्हंटले देखील की, “मी खूप दूखी होते की, प्रोड्यूसर्स मला प्रोमोशन मध्ये अशाप्रकारे वापरत आहे. जो बॅकलेस फोटो सगळीकडे झळकतोय, तो चित्रपटात कुठेच नाही. जर मला हे आधी माहीत असते तर मी कधीच ‘जहर’ मध्ये काम केले नसते. मी भट्ट फॅमिलीसोबत याआधीही काम केले होते. त्यामुळे मला त्यांच्यावर विश्वास होता. पण मला चांगलाच धडा मिळालाय’

त्याच मुलाखतीत उदिताने असेही सांगितले की, जी स्टोरी तिला सांगण्यात आली होती, चित्रपट त्यापेक्षा वेगळा आहे. तिच्या पात्राचे काम लहान आहे. चित्रपटाच्या सेकंड हाफमध्ये ती कुठचं दिसत नाही. तसेच तिच्यावर चित्रित केलेली गाणीही या चित्रपटामधून वगळण्यात आली.

भट्ट कॅम्पने तिची फसवणूक केली आहे. यानंतर तिने कधीही महेश-मुकेश भट्टसोबत काम केले नाही.

पुढे उदिता ‘अक्सर’, ‘दिल दिया है’, ‘अगर’ आणि ‘किससे प्यार करु’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसली. यापैकी ‘अक्सर’ हा एकमेव चित्रपट होता, जो थोडासा दिसला. कारण या चित्रपटाची गाणी विशेषत: ‘झलक दिखलाजा’ खूप लोकप्रिय झाले.

इमरान हाश्मी आणि उदिता यांनी बर्‍याच सिनेमांमध्ये एकत्र काम केले होते. तिच्यावर अनेक अफवांचा गॉसीपचा भडिमार करण्यात आला. पण उदिताने सर्व अफवांना बाजूला केले. जेव्हा तिच्या आणि इमरान हाश्मी यांच्यातील संबंधांची चर्चा झाली तेव्हा उदिता म्हणाली की इम्रान तिच्या भावासारखा आहे.

पुढे तिने आणखी काही चित्रपटांमध्ये काम केले. पण ते चित्रपट आपटले. उदिताच्या वाट्याला मोठे चित्रपट कधी आलेच नाही, कारण तिला नेटवर्किंग जमले नाही. तसंच ती फिल्मी पार्ट्यांपासून लांबच राहायची.

पण ‘जहर’ नंतर तिच्या कारकिर्दीचा आलेख चढण्याऐवजी जोरात घसरत होता. पण ती नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चेत राहिली. माध्यमांनी वारंवार ‘जहर’ चे दिग्दर्शक मोहित सुरीशी उदिताचे नाव जोडले.

2010 मध्ये उदिताने चित्रपटातून ब्रेक घेतला. जेव्हा ती चित्रपटांत आली तेव्हा ती फक्त बारावी पास होती. तिने ठरविले की ती डिग्री पूर्ण करेल. त्यांनी करसपॉन्डेंसने बॅचलर ऑफ कॉमर्सची डिग्री घेतली. पुढे तिला एमबीए करायचे होते की अचानक तिला डीजे म्यूजिकचा चस्का लागला. त्यामुळं तिने अँक्टिंग सोडून म्यूजिक पॅशन फॉलो केले.

मधल्या काळात तिने डीजे सुकेतूच्या हाताखाली डिस्क जॉकी होण्यासाठी ट्रेनिंग घेतले. फूल पॉवरने तिने म्यूजिक सीनमध्ये एन्ट्री केली . काही गिग्स केले. पण या बद्दल ती जास्त प्रोफेशनल होऊ शकली नाही.

आजकाल कुठेय उदिता गोस्वामी

मिडीयाशी लपाछपी खेळत उदिता आणि मोहित ऑन अँड ऑफ 8 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. 2013 मध्ये दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांना देवी नावाची मुलगी आणि कर्मा नावाचा मुलगा होती. मोहित जिथे त्याच्या चित्रपटसृष्टीच्या कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करत आहे.

ज्या ज्या भट्ट कॅम्प पासून ती दूर जाण्याचा प्रयत्न करत होती त्याच भट्ट कॅम्पच्या नात्यातल्या  मोहित सुरीशी तिने लग्न केलं. मोहित हा आलिया भट्ट ,पूजा भट्ट, इम्रान हाशमी यांचा भाऊ लागतो. या नात्याने उदित त्यांची वहिनी झाली.  

उदिता चित्रपटांपासून दूर राहिली आहे. 2012 मध्ये ती ‘डायरी ऑफ ए बटरफ्लाय’ नावाच्या चित्रपटात ती शेवटच्या वेळी दिसली होती. नुकत्याच झालेल्या तिच्या काही मुलाखतीत ती स्क्रिप्ट लिहिणार असल्याचं सांगत होती. पण ती स्क्रिप्ट पुढील काही काळ चित्रपटात रूपांतरित झाल्याचे दिसले नाही.

जेव्हा तिला विचारले गेले की, ती बॉलिवूड किंवा तिच्या अभिनय कारकीर्दीला मिस करत नाही का. याला उत्तर म्हणून उदिता म्हणाली-

“आपल्या मुलांच्या आपल्या डोळ्यांसमोर मोठे होताना पाहण्यापेक्षा कोणताही आनंद किंवा पॅशन नाही.” उदिता गोस्वामी आपल्या कुटूंबासह मुंबईत राहते.

आजही उदिता गोस्वामी म्हटलं की तिचे ते बारीक खोलवर जाणारे डोळे, तिचे बॅकलेस फोटो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिची गाणी आठवत राहतात.

 हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.