हेच भगवान श्री कृष्ण मंदिर उडपीच्या पाककलेचे जन्मस्थान ठरले….
भारतातल्या कुठल्या पण शहरात जा तिथ उडपी हॉटेल असतच. मध्यम उंची खांद्यावर शुभ्र पंचा, कमरेला तशीच शुभ्र लुंगी नेसलेले अण्णा मंडळी या हॉटेलमध्ये गल्ल्यामागे उभे असलेले दिसतात. टिपिकल इडली डोसा सांबरम रस्समची ही रेस्टॉरंट आपल्या प्रत्येकाची लाडकी असतात.
पण तुम्हाला माहिती आहे का हे सर्व रेस्टॉरंट, हॉटेल कर्नाटकातल्या एका जिल्ह्यातून आलेल्या माणसांनी सुरु केलेले आहेत.
उडपी.
दक्षिण कर्नाटकात अरबी समुद्राला लागून असलेल्या हिरव्यागार कोकण किनारपट्टी भागातल एक शांत निवांत गाव. या गावाला जवळपास दीड-दोन हजार वर्षांचा इतिहास आहे.
उडुपी अथवा चंद्र तपश्चर्या करून शिवप्रसादाने येथे कलंकमुक्त झाला, या आख्यायिकेवरून गावाला उडपी (उडुपी, उडुपपूर) नाव पडले. याच कारणाने चंद्रमौलीश्वराचे मंदिर व चंद्रसरोवर येथे आहेत. परशुरामाने सागर हटवून निर्मिलेल्या नवभूमीतील सात क्षेत्रांपैकी रजतपीठ येथे आहे.
तेराव्या शतकातील द्वैतवादी वेदान्ती मध्वाचार्यांची ही जन्मभूमी व कर्मभूमी. त्यांनी स्थापन केलेले कृष्णमंदिर येथे असून त्याची पाळीपाळीने दोनदोन वर्षे व्यवस्था पाहणारे वैष्णवांचे आठ संपन्न मठ उडपीत आहेत.
हेच भगवान श्री कृष्ण मंदिर उडपीच्या पाककलेचे जन्मस्थान ठरले.
गेली सात आठशे वर्ष दूर दूरहून माध्व संप्रदायाचे भाविक उडपीला तीर्थाटनास येत. माध्वाचार्यांनी येथे सुरवातीपासुन दंडक घातला होता की मंदिरात येणाऱ्या प्रत्येकाला महाप्रसादाची व्यवस्था करायची. हे जेवण कसे बनवायचे याची पद्धत देखील त्यांनी स्वतः सांगितली होती.
उडपीमधल्या आठही मठांमध्ये महाप्रसाद अजूनही बनतो. हा महाप्रसाद बनवण्याची जबाबदारी उडपी जवळच्याच शिवाली या खेड्यातील ब्राम्हण मंडळीकडे असायची. त्यांना शिवाली ब्राम्हण असे म्हणतात. त्यांची स्वयंपाक करायची एक विशिष्ट पद्धत होती. दुधी भोपळा, शेवग्याच्या शेंगा घातलेलं सार, खोबऱ्याचा आणि चिंचेचा मुक्तहस्ते वापर, तांदळाच्या पिठाचे पदार्थ, वेगवेगळ्या पद्धतीच्या चटण्या, केळीच्या पानावर जेवण हे त्यांचं वैशिष्ट्य होतं.
किती जरी गर्दी झाली तरी वेगाने भात शिजवून प्रत्येकाचं उदरभरण करण्याची त्यांची खासियत होती.
साधारण अठरा-एकोणिसाव्या शतकात इंग्रजांच या भागात आगमन झाल. उडपी हा तुळूनाडू प्रदेशाचा भाग. येथे लोक तुळू भाषा बोलतात. मुख्य व्यवसाय भात शेती. पण या काळात शेतीची मालकी काही विशिष्ट जमीनदारांकडे वळली. सावकारी व इतर कारणांनी उडपीची जनता त्रस्त झाली.
यामुळे कामधंद्याच्या शोधात उडपी बाहेर जाण्यास सुरवात झाली. मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊ लागल.
अशाच एका पुजाऱ्याच्या घरात जन्मलेल्या के.कृष्ण राव यांनी गरिबीला कंटाळून तेव्हाचे मोठे शहर असलेल्या मद्रासची वाट पकडली. अगदी सतरा अठरा वर्षांचा हा मुलगा. यापूर्वी मठात स्वयंपाकघरात काम करण्याचा औभ्व होता. मद्रास मधल्याच एका हॉटेलात भाज्या चिरणे, भांडी घासणे हे काम करू लागला.
कृष्ण रावच शिक्षण काही झालं नव्हत. पण तो हुशार होता, प्रामाणिक होता. मद्रासच्या जॉर्ज भागातील शारदा विलास ब्राम्हण हॉटेल हे त्याच घर झालं. मेहनतीने त्याने पैसे साठवले. त्याची कष्टाळू वृत्ती पाहून त्या हॉटेलचा मालक खुश झाला. त्याला काही कारणामुळे हे हॉटेल विकावे लागणार होते. त्याने कृष्णराव ला हॉटेल घे अस सांगितल.
कृष्ण राव कडे तेवढे पैसे नव्हते पण मालकाने जसे जमतील तसे हप्त्याने पैसे देण्याची मुभा दिली.
मद्रासमध्ये जाऊन तीन वर्षातच भाज्या चिरणारा हा पोऱ्या हॉटेलचा मालक बनला.
त्याच्या हाताला चव होती. उडुपीच्या खास रेसिपी त्याने मद्रासला आणल्या. १९२५-२६ साली त्याने शुद्ध शाकाहारी पहिले उडपी श्री कृष्ण विलास हे हॉटेल सुरु केले. काही वर्षात उडपी हॉटेल, वूडलँड रेस्टॉरंट सुरु केले जे आजही चेन्नईमध्ये पाहायला मिळते.
के कृष्ण राव हे उडुपी हॉटेलचे जनक मानले जातात.
त्यांनी बेंगलोर, कोईमतूर, अहमदाबाद, दिल्ली, मुंबई इतकेच काय तर लंडन, न्यूयॉर्क येथे देखील उडपी हॉटेल्स सुरु केले. त्यांनी फक्त स्वतः हॉटेल सुरु केले नाहीत तर आपल्या गावकडच्या मुलांना बोलवून घेतलं, त्यांना हॉटेल मध्ये काम दिल. पुढे त्यांना हॉटेल काढून दिले.
ही परंपरा आजही उडुपी हॉटेलमध्ये पाळली जाते. मुंबईत उडपी रेस्टॉरंटची सुरवात करणारे रमा नायक हे १९२२ साली मुंबईला आले तेव्हा फक्त अकरा वर्षाचे होते. त्यांनीदेखील टेबल पुसणाऱ्या वेटरपासून सुरवात केली व कालांतराने उडपी श्रीकृष्ण नावाचे माटुंग्याला पहिले हॉटेल सुरु केले.
जगात उताप्पा, इडली, डोस्याला फेमस कोणी केलं असेल तर नायक, शेट्टी, कामत या अण्णा मंडळीनी.
गेल्या शंभर वर्षात या लोकांनी आपली चवीची परंपरा जपली शिवाय आधुनिकतेची देखील कास धरली. आज त्यांच्या मेन्यूकार्डवर टिपिकल उडपी पदार्था बरोबर मॉडर्न पदार्थ देखील दिसतात. त्यांच्या गुणवत्ते व सचोटीमुळे गावागावात गिऱ्हाईक त्यांनी बांधून घेतले आहेत.
दुधात साखर मिसळल्याप्रमाणे ज्या त्या गावी ही उडपी मंडळी मिसळून गेली आहेत.
त्यांचे मॅनेजमेंट कौशल्य हा एखाद्या एमबीए कॉलेजमध्ये अभ्यासाचा विषय ठरू शकतो. एकमेकांना मदत करण्याची वृत्ती त्यांना टोपलीतून इडली विकण्यापासून जगभरातील मोठे हॉटेल चेन्स बनवण्यापर्यंत पोहचवली आहे.
संदर्भ- History of Udupi hotels and how they unwittingly helped curb caste segregation in Indian public spaces
हे हि वाच भिडू.
- दक्षिणेतल्या सांबरचा शोध संभाजी महाराजांमुळे लागला.
- दया नायक सध्या काय करतोय !
- आपल्याच देशात शोध लागलेल्या खेळात नंबर वन होण्यासाठी प्रकाश पदुकोण जन्मावा लागला.
- अशोक वैद्य, सुधाकर म्हात्रे की बाजीराव पेशवे ; वडापावचा शोध कोणी लावला ?
You have given useful information about the hardworking & soft minded Udupi society , I am also from Karnataka origin and experienced the awesome taste of their menu’s . Once again thanks for the article .