जिल्हा बँकेत उदयनराजे आणि शिवेंद्रराजे बिनविरोध होण्यामागं किंगमेकर आहेत रामराजे !

जिल्हा सहकारी बँक म्हंटल कि आपल्या डोळ्यासमोर थेट जिल्ह्याचं राजकारण आणि मोठ्या मोठ्या राजकीय व्यक्ती दिसू लागतात. त्यात आणि जिल्हा बँकांच्या निवडणुका लागल्या की उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग अशी काहीशी गत नेत्यांची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची असते. पण यात एखादा किंगमेकर असतोच असतो. कुणी किती ही नाचू दया किंग ठरवणार तेच घडणार.

आता तुम्ही म्हणाल असं कुठं असतंय व्हय… तर होय असं साताऱ्यात तरी असतयंच. आणि साताऱ्याच्या जिल्हा बँकेचे किंगमेकर रामराजे नाईक निंबाळकर आहेत ते आता तुम्ही वाचणार आहे त्या गोष्टीतून कळेलच तुम्हाला. 

तर ही गोष्ट आहे साताऱ्याच्या २०२१ च्या जिल्हा बँक निवडणुकीची.  म्हणजे हल्ली हल्लीच्याच निवडणुकीची. 

सातारा जिल्हा बँकेचा इतिहास पाहता, सुरुवातीपासून काँग्रेसचे प्राबल्य या बँकेवर होत. अगदी स्थापनेपासून जिल्हा बॅंक ही काँग्रेस पक्षाच्या ताब्यात राहिली. यामध्ये किसन वीर आबांच्या नंतर काँग्रेसचे नेते विलासराव पाटील-उंडाळकर, लक्ष्मणराव पाटील यांनी बॅंकेची धुरा सांभाळली. सर्वाधिक कालावधी विलासराव पाटील यांच्याच नेतृत्वाखाली बॅंकेची वाटचाल राहिली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं विलासकाका उंडाळकार यांच्या विरोधात ताकद लावत जिल्हा बँकेत सत्ता प्रस्थापित केली.

लक्ष्मणराव पाटील या राष्ट्रवादीच्या संचालकांनी बॅंक ताब्यात घेतली. सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर राष्ट्रवादीची जशी पकड घट्ट होत गेली तसतशी जिल्हा बँकेवर सुद्धा पकड घट्ट होत गेली. त्यामुळं आज इथली बँक राष्ट्रवादीच्याच हक्काचीच म्हंटल तर वावगं ठरत नव्हतं. म्हणजे बघा मंत्री, आमदार, खासदार कुणीही होवो, या बँकेवर तसा झेंडा राष्ट्रवादी काँग्रेसचाच असायचा.

उदयन राजेंची आणि शिवेंद्र राजेंची जिल्हा बॅंकेतली एंट्री तशी उशिराच झाली. २००९ सालात. फलटणच्या रामराजे नाईक निबाळकरांच्या तुलनेत हे दोन्ही छत्रपती तसे नवखेच. पण पुढं सातारच्या जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत रामराजे नाईक-निंबाळकर, शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि बाळासाहेब पाटील यांची भूमिका महत्वाची ठरत गेली. 

२००९ मध्ये जेव्हा जिल्हा बँकेची निवडणूक झाली तेव्हा काॅंग्रेसचे जेष्ठ नेते विलासकाका पाटील-उंडाळकर यांच्या पॅनलमधून उदयनराजेंनी गृहनिर्माण, दूध उत्पादक संस्था मतदारसंघातून निवडणूक लढवली. राष्ट्रवादीच्या सत्ताधारी पॅनलचे बाळासाहेब पाटील विरुध्द उदयनराजे अशी ती निवडणूक झाली. त्या निवडणुकीत राष्ट्रवादीची ताकद असूनही बाळासाहेब पाटील यांच्यासारखा मातब्बर विरोधात असतानाही उदयनराजेंनी एकतर्फी विजय मिळविला होता.

पुढं २०१४ ला राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राज्यातील राजकारण झपाट्यानं बदललं. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. साताऱ्यात आमदार शिवेंद्रराजे, तर राष्ट्रवादीकडून खासदारकी निवडून आलेल्या उदयनराजेंनी देखील भाजपचा पर्याय स्वीकारला. शिवेंद्रराजे भोसले भाजपमध्ये गेल्यानंतर ही त्यांची जिल्हा बँकेतील ताकद लक्षात घेता राष्ट्रवादीनं त्यांना अध्यक्षपदावरून हटवण्याची रिस्क घेतली नाही.

बँकेचे अध्यक्ष भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले अध्यक्ष होते, तरी सत्ताकेंद्र मात्र रामराजे निंबाळकर आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याच हातात होत. 

शिवेंद्रसिंहराजे भाजपमध्ये गेल्यानंतरही त्यांना न दुखवता आपल्यासोबतच ठेवण्यात रामराजे यशस्वी झाले. बँकेत राष्ट्रवादीचे बहूमत होत. पण रामराजेंनी  उदयनराजेंना शह देण्यासाठी २०१९ नंतर भाजपवासी झालेले आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या अध्यक्षपदाला आक्षेप घेतला नाही. पक्ष बाजूला ठेवून बँकेत गटातटाचा राजकारण आत्तापर्यंत झालं.

२०१४ ते २०२१ पर्यंतच्या काळात जिल्हा बँकेचे नेतृत्व करताना रामराजेंना लक्ष्मणराव पाटील आणि भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजेंची या दोन नेत्यांची खंबीर साथ मिळाली. या दोन्ही नेत्यांच्या साथीमुळे रामराजेंनी बँकेवरील आपली पकड मजबूत ठेवली आहे. भविष्याचा विचार करून रामराजेंनी सहकार मंत्री व पालकमंत्री बाळासाहेब पाटील, शिवेंद्रसिंहराजेंना, आमदार मकरंद पाटील यांना अगदी कोणत्याच प्रकारे नाराज केलेल नाही. शिवेंद्रसिंहराजे यांच्या कलाने बँकेत निर्णय घेतले गेले.

पण आत्ता लागलेल्या निवडणुकीत उदयन महाराज जास्तच आक्रमक झालेले दिसले. सातारा जिल्हा बँकेवरून दोन्ही राजेंमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झालं. रामराजे नाईक निंबाळकर आणि शिवेंद्र महाराजांवर अप्रत्यक्ष निशाणा साधत उदयन महाराज म्हंटले होते,

सातारा जिल्हा बँकेच्या पॅनेलमध्ये मला घेणारे ते कोण ? मी ठरवतो. माझी जिरवण्यासाठी फील्डिंग लावणाऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे. मला विरोध करा पण सभासदांची जिरवू नका.

रामराजे आणि शिवेंद्रसिंहराजे या जिल्ह्य़ाच्या राजकारणातील एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोघेही एकत्रितपणे जिल्ह्य़ाचे अनेक निर्णय ठरवतात. शिवेंद्रसिंहराजे काय भूमिका घेतील, याचा अंदाज घेवूनच रामराजेही अनेक निर्णय घेत असतात.

अशातच एका निवडणुकीपूर्वी झालेल्या सभेत रामराजे म्हंटले, 

जिल्हा बँक निवडणुकीसाठी अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. मात्र, कोणी कितीही नाचले तरी जिल्हा बँक आमचीच असणार आहे.

पण राष्ट्रवादीच पॅनेल किती जरी मजबूत असलं तरी त्यांना धास्ती होती ती आमदार जयकुमार गोरे आणि उदयनराजे भोसले यांचीच. कारण…

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांना खासदार उदयनराजे भोसले व आमदार जयकुमार गोरे यांची सर्वाधिक भिती वाटत होते. ही मंडळी एकत्र येऊन राष्ट्रवादीला आव्हान देऊ शकतील, अशी शक्यता सर्वांची होती. त्यानुसार उमेदवार अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी माढाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांनी आपल्या काही समर्थकांसह शासकिय विश्रामगृहातून चालत येत शक्तीप्रदर्शन करीत अर्ज दाखल केले होते.

बँकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांसह विरोधी पॅनेल तयार करण्याची घोषणा आमदार जयकुमार गोरे यांनी केली होती. आणि या पॅनेल जवळ उदयनराजे गेले तर…? त्यामुळे त्या दोघांना ही न चुचकारता काही करता येऊ शकत का याची चाचपणी सुरू होती. अशात चर्चा रंगल्या त्या खासदार उदयनराजेंना रामराजे पॅनलमध्ये घेणार का? याच्या.

या पॅनेलचा निर्णय राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार घेणार होते. पॅनेल मध्ये शिवेंद्र राजे असणार हे फिक्स ठरलंच होत. पण उदयनराजे यांच्याविषयी काय भूमिका घ्यावी याची गलबत सुरूच होती. कारण उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांचं हाडवैर सर्वश्रुत आहे. त्यामुळे सरतेशेवटी पवारांनी उदयनराजे यांच्या संबंधित विषय शिवेंद्र राजेंकडे सरकवला.

उदयनराजेंना पॅनेलवर घेणार का ? यावर शिवेंद्रराजे म्हंटले होते,

मीच पॅनलमध्ये आहे हे का मलाच माहीत नाही. पॅनलचा निर्णय शरद पवार, अजित पवार घेतील त्यांना त्यांनी बोलावं.

गुंता काही सुटला नाही. कारण दोघेही तसे तुल्यबळ आणि एकमेकांना विरोधक देणारच. 

पण म्हंटल होत ना, किंगमेकर खूप महत्त्वाचा असतो.

तर उदयनराजे भोसले आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यात साधा विस्तवही जात नव्हता एवढे वैर होते. मात्र ऐन दिवाळीत सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर रामराजे व उदयनराजेंची बंद दाराआड चर्चा झाली. दोघांच्या या भेटीत खुमासदार हास्यविनोदही झाले. दोघांनीही एकमेकांचे हातात हात घेतले होते.

आणि त्यामुळेच सातारा जिल्ह्याच्या राजकारणात नव्या मनोमिलनाची घटस्थापना आहे का अशी चर्चा सूरू झाली.

चर्चा तर अशा ही होत्या की, रामराजेंनी शिवेंद्रराजेंची समजूत काढली. आणि त्यांना उदयनराजेंच्या विरोधात उमेदवार देऊ नका म्हणून सांगितलं. तर उदयनराजें सोबत झालेल्या बैठकीत ही रामराजेंनी शिवेंद्रराजेंच्या विरोधात उमेदवार देऊ नका असच सांगितलं. पण निवडणुकीच्या शेवटच्या क्षणापर्यंत सर्वांचीच उत्सुकता ताणली गेली होती.

शेवटी दोन्ही राजे बिनविरोध निवडून आले. ते कसे ? तर उदयनराजे यांनी गृहनिर्माणमधून अर्ज दाखल केला होता. त्यांच्याविरोधात रामराजे समर्थक ज्ञानदेव पवार, दिलीप सिंह भोसले, उदयसिंह बरदाडे यांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज माघार घेण्याचा शेवटच्या दिवशी यांच्यासह अन्य उमेदवारांनी माघार घेतली. तर  शिवेंद्रसिंहराजे यांच्या विरोधात विनय कडव आणि पांडुरंग देशमुख यांनी अर्ज दाखल केले होते. त्यांनीही अर्ज काढून घेतल्याने शिवेंद्रसिंहराजे हेही बिनविरोध निवडून आले.

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.