उदयनराजेंच्या सातारा जिल्हा बँकेवरच्या फेसबुक पोस्टचा रोख या दोन नेत्यावर आहे ?

जिल्हा सहकारी बँक म्हंटल कि आपल्या डोळ्यासमोर थेट जिल्ह्याचं राजकारण आणि मोठ्या मोठ्या राजकीय व्यक्ती दिसू लागतात. ज्याच्या ताब्यात जिल्हा बँक त्याची जिल्ह्याच्या राजकारणावर मोठी पकड असल्याचं नेहमीच म्हंटल जात. आज हा जिल्हा बँकेचा विषय सांगावयास कारण कि,

भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी एक संतप्त फेसबुक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांच्या निशाण्यावर दोन राष्ट्रवादीचे तर एक भाजप नेते आहेत. आणि ही पोस्ट आहे सातारा जिल्हा बँकेबाबतची..!

राजे काय म्हणतायत ते आधी बघूया..

सातारा जिल्ह्यातील निर्णय जिल्ह्यातच झाले पाहीजेत बैठक कुठंतरी बोलावली आहे. वास्तविक जे मतदार तुम्हाला मत देणार आहेत, आजपर्यंत मत देत आले आहेत, त्यांची मतेमतांतरे अजमावण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेसारखी बैठक बोलवली असती तर ते संयुक्तिक ठरले असते. ज्यांनी सहकारी संस्था मोडकळीस आणल्या, संस्थांचे खाजगीकरण केले, अश्या व्यक्तींना जिल्हा बँकेच्या मतदारांनीच बँकेपासून दूर ठेवणे गरजेचे आहे.

सातारा जिल्ह्याचे निर्णय जिल्ह्यातच झाले पाहिजे. साताऱ्याची बँक आणि निर्णय पुण्यात, असं होऊ देणार नाही, सहकारी संस्था कुणी मोडकळीस आणल्या ? संस्थांचं खाजगीकरण कुणी केलं?  कुणामध्ये अहंकार आहे ? कुणामध्ये मी पणा आहे?

या फेसबुक पोस्टमध्ये उदयनराजेंनी कोणत्याही नेत्याचं नाव घेतलेलं नाही. पण यात प्रामुख्याने अजित पवार, रामराजे निंबाळकर, शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर उदयनराजेंकडे अप्रत्यक्ष रोख असल्याची चर्चा आहे.

सातारा जिल्हा बँकेचा इतिहास पाहता,

सुरुवातीपासून काँग्रेसचे प्राबल्य या बँकेवर होत. अगदी स्थापनेपासून जिल्हा बॅंक ही काँग्रेस पक्षाच्या ताब्यात राहिली. यामध्ये किसन वीर आबांच्या नंतर काँग्रेसचे नेते विलासराव पाटील-उंडाळकर, लक्ष्मणराव पाटील यांनी बॅंकेची धुरा सांभाळली. सर्वाधिक कालावधी विलासराव पाटील यांच्याच नेतृत्वाखाली बॅंकेची वाटचाल राहिली.

त्यानंतर लक्ष्मणराव पाटील या राष्ट्रवादीच्या संचालकांनी बॅंक ताब्यात घेतली. सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर राष्ट्रवादीची जशी पकड घट्ट होत गेली तसतशी जिल्हा बँकेवर सुद्धा पकड घट्ट होत गेली. त्यामुळं आज इथली बँक राष्ट्रवादीच्याच हक्काचीच म्हंटल तर वावगं ठरणार नाही. म्हणजे बघा मंत्री, आमदार, खासदार कुणीही होवो, या बँकेवर तसा झेंडा राष्ट्रवादी काँग्रेसचाच असतो.

उदयनराजेंची फेसबुक पोस्ट तीन नेत्यांकडे बोट दाखवते कारण सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या राजकारणाचं चित्र ही तसंच आहे.

सध्या बँकेचे अध्यक्ष भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले अध्यक्ष असले, तरी सत्ताकेंद्र मात्र रामराजे निंबाळकर, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याच हातात आहे. सद्यस्थिती बघता खासदार उदयनराजेंनी आपल्या स्वत:च्या संचालक पदासोबतच आणखी दोन जागा हव्या आहेत. त्यामुळे ते गृहनिर्माण आणि पाणीपुरवठा मतदारसंघातून या वेळेसही लढणार हे निश्चित आहे.

शिवेंद्रसिंहराजे भाजपमध्ये गेल्यानंतरही त्यांना न दुखवता आपल्यासोबतच ठेवण्यात रामराजे यशस्वी झाले आहेत.

बँकेत राष्ट्रवादीचे बहूमत आहे. रामराजे यांनी शिवेंद्रसिंहराजे यांना उदयनराजेंना शह देण्यासाठी मागील पाच वर्षांंत भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या अध्यक्षपदाला आक्षेप घेतलेला नाही. पक्ष बाजूला ठेवून बँकेत पक्षविरहित राजकारण आत्तापर्यंत झालेलं दिसतंय. जिल्हा बँकेचे नेतृत्व करताना रामराजेंना लक्ष्मणराव पाटील आणि भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजेंची या दोन नेत्यांची खंबीर साथ मिळाली.

या दोन्ही नेत्यांच्या साथीमुळे रामराजेंनी बँकेवरील आपली पकड मजबूत ठेवली आहे. भविष्याचा विचार करून रामराजेंनी सहकार मंत्री व पालकमंत्री बाळासाहेब पाटील, शिवेंद्रसिंहराजेंना, आमदार मकरंद पाटील यांना अगदी कोणत्याच प्रकारे नाराज केलेल नाही. शिवेंद्रसिंहराजे यांच्या कलाने बँकेत निर्णय घेतले गेले.

रामराजे आणि शिवेंद्रसिंहराजे या जिल्ह्य़ाच्या राजकारणातील एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोघेही एकत्रितपणे जिल्ह्य़ाचे अनेक निर्णय ठरवतात. शिवेंद्रसिंहराजे काय भूमिका घेतील, याचा अंदाज घेवूनच रामराजेही अनेक निर्णय घेत असतात.

त्यात आणि जिल्हा बँक म्हंटल कि, सर्वच पक्षांना तिथं आपलं वर्चस्व हवं असत. आणि पश्चिम महाराष्ट्राच्या बँकां तशा गुटी खाऊन गुटगुटीत झालेल्या आहेत, त्यामुळे जिल्हा बँक एकाच पक्षाच्या हाती असणं म्हणजे जिल्हयात तुल्यबळ साधण्यासारखंच.

हे ही वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.