सिमेंटचं जंगल झाडं लावून सुंदर करायच्या नादात या भिडूनं उगाओ ब्रॅण्ड उभारला

प्रथम वंदितो गजानना।
नंतर वंदितो वृक्षनारायणा।।
तदन्ंतर पूजितो श्री गणेशा।
त्यानंतर सांगतो वनस्पती कथा।
सरतेशेवटी सांगीन वृक्षव्यथा।।

आता हा श्लोक लिहिण्यामागचं एकच कारण, ते म्हणजे भारतीय संस्कृतीत वास्तू, वनस्पती आणि वृक्ष यांचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे. पण आज वाढत्या शहरीकरणामुळं झाडं कमी झाली.

शहर कोणतंही असो तिथं हमखास दिसणारी एक गोष्ट म्हणजे जगण्या मरण्याची लढाई. आणि याचसाठी प्रत्येकाची सुरू असलेली धावपळ. शहर सकाळी लवकर उठतात आणि रात्री उशिरापर्यंत जागी असतात. उसंत नसलेले जीव या सिमेंटच्या जंगलामध्ये यंत्रमानवाप्रमाणे धडपडत काम करत असतात.

गावाकडं असं नसतं. तुम्हाला कामाची गडबड धडपड असते पण निसर्ग तुम्हाला तिथं कंटाळू देत नाही. दिवसभराचा क्षीण नदीच्या काठावर बसून घालवता येतो. आडव्या तिडव्या वेगाने वाढणारी शहर हाच धागा विसरून गेली आणि त्यामुळं निसर्ग आपल्या हातून सुटून गेला.

हाच धागा पकडून ugaoo नावाचं स्टार्टअप सुरू झालं.

सिद्धांत भालिंगे हे मूळचे पुण्याचे. त्यांनी कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी मधून लँडस्केप आर्किटेक्ट मध्ये शिक्षण पूर्ण केलं. पण परदेशी नोकरी करण्यापेक्षा आपल्या मायदेशी येऊन एखादं स्टार्टअपचं सुरू करावं असं त्यांच्या मनात होत.

आता सुरुवात कुठं आणि कशी करायची ? तर आपल्या वडिलोपार्जित व्यवसायातूनच काहीतरी सुरू करावं असं सिद्धांतच्या डोक्यात आलं. सिद्धांत यांचा वडिलोपार्जित व्यवसाय पण शेतीशी संबंधित. १८८५ साली स्थापन झालेल्या नामदेव उमाजी ऍग्रीटेक कंपनीला जवळपास १३० वर्षांचा वारसा आहे.

वारसा लाभलाय पण तो नीट सांभाळला पण पाहिजे. म्हणून २०१५ पर्यंत तरी सिद्धांत ऍग्रीच्या मार्केटचा अभ्यास करत होते. बऱ्याच साईट व्हिजिटिंग नंतर त्यांच्या लक्षात एक आलं ते म्हणजे लोकांना गार्डनींग बद्दल फारसं काही माहीत नाहीये. शहरातल्या लोकांना आपला दहा बाय दहाचा स्पेस पण झाडं लावून सुंदर करायचाय. पण आपलं घर, त्याची रंगसंगती आणि तिथं उपलब्ध असणारी जागा याचा मेळ साधणारी कोणती झाड लावायची हे मात्र प्रश्नचिन्ह…

आणि यातूनच १५ डिसेंबर २०१५ ला उगाओ आकाराला आलं!

उगाओ काय करत ? तर तुमचं घर केवढं पण असो, तुम्हाला झाड लावायचा नाद आहे ना, तर ते तुम्हाला उगाओच्या वेबसाईटवर मिळून जातं. वेगवेगळ्या प्रकारची घरी कुंड्यांमध्ये लावता येणारी रोप, खतं, कुंड्या, बी – बियाण, तणनाशक, किचन गार्डनसाठी लागणाऱ्या गोष्टी सगळं कसं ऑनलाईन. एका क्लिकवर! हे पण कमी की काय म्हणून तुम्हाला उगाओच मार्गदर्शन पण मिळत.

पण कंपनी काढली म्हणजे सगळंच सोपस्कार पार पडलं असं ही नाही होत. जमिनीची जशी मशागत करावी लागते, एकदम त्याच पद्धतीने व्यावसायाची पण मशागत करावीच लागते.

सुरुवातीच्या टप्प्यात झाड ऑनलाईन खरेदी करायची कन्सेप्ट लोकांसाठी नवीच होती. त्यामुळे म्हणावा तसा रिस्पॉन्स मिळत नव्हता. पण अशक्य असं काहीच नसतं. उगाओच्या सुरुवातीच्या ७० ते ८० ऑर्डर्स दिवसागणिक, महिन्यागणिक वाढतच होत्या. आता दिवसाला या ऑर्डर्स १६०० ते २००० च्या घरात आहेत.

कधी कोणी स्वप्नात विचार केला नसेल की आपण ऑनलाईन झाडं विकू शकू. पण भिडू डोकं शाबूत असेल ना तर माणूस भंगारातून पण आपलं साम्राज्य निर्माण करू शकतो.

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.