सोलापूर इंदापूर मध्ये उजनीच्या पाण्यावरुन राजकारण तापलयं.. नेमका काय आहे वाद?

पाणी. लोकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. पण तितकाच वादग्रस्त देखील. कधी हा प्रश्न पेटेल सांगता येत नाही. आता हेच बघा कि, एकीकडे महाराष्ट्र कोरोनाने होरपळत असताना, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यामध्ये उजनीच्या पाण्याचा प्रश्न पेटला आहे. मागच्या चार दिवसांपासून सोलापूर आणि इंदापूर या भागातील राजकारण या एकाच प्रश्नांभोवती फिरत आहे.

त्याला कारण ठरलं आहे सरकारनं चार दिवसांपूर्वी घेतलेला एक निर्णय. या निर्णयामुळे एका बाजूला इंदापुरतील नागरिक पेढे वाटून आनंद व्यक्त करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला सोलापुरातील माणसं मात्र सरकारविरोधात आंदोलनात उतरली आहेत. पण नेमकं काय झालयं असं कि दोन बाजूला वेगवेगळी परिस्थिती दिसतं आहे? असा काय प्रश्न आहे?

हा सगळा प्रश्न समजावून घेण्याआधी ज्यांना उजनीबद्दल माहित नाही अशांसाठी. 

हे उजनी धरण आहे सोलापूरच्या माढा तालुक्यात. पुणे जिल्ह्यातून वाहत येणाऱ्या भीमा नदीवरच हे धरण. याची क्षमता आहे १२१ टीएमसी एवढी. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी १९६१ साली करमाळा तालुक्याच्या सीमेवर हे धरण साकारण्यास सुरुवात केली.

साधारण जून १९८० उजनीचं धरण पुर्ण झालं, पाणी आलं. त्यामुळे गांव आणि गावचं राजकारण झपाट्यानं बदलतं गेलं.

त्यानंतर प्रश्न आला पाणी वाटपाचा. हे धरण बांधत असताना सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, पुणे जिल्ह्यातील बारामती आणि इंदापूर तर नगर जिल्ह्यातील २ तालुक्यांमधील गावं बुडीत क्षेत्रात गेली. आता या धरणग्रस्त लोकांनुसार पाण्याचं वाटप केलं गेलं. यात प्रामुख्यानं आणि सर्वात जास्त पाणी दिल गेलं ते सोलापूर जिल्ह्यासाठी.

आता इतिहासत जास्त न रमता सध्याचं पाणी वाटप कसं ठरलं होतं ते बघू.

सध्याच पाणी वाटप

उजनी धरणाची एकूण पाण्याची क्षमता – ११७ टीएमसी.

मृत साठा – ६३.६६ टीएमसी. तर उपयुक्त पाणी साठा – ५३.५७ टीएमसी.

उजनी धरणाचे पाणी वाटप खालीलप्रमाणे. आकडे टीएमसीमध्ये (२०१८ नूसार)

भीमा (उजनी) प्रकल्प प्रवाही क्षेत्र- ३४.५१

खासगी उपसा क्षेत्र – ७.६३

सीना -माढा उपसा सिंचन योजना – ४.७५

भीमा-सीना जोड कालवा- ३.१५

दहिगाव उपसा सिंचन योजना – १.८१

शिरापूर उपसा सिंचन योजना – १.७३

आष्टी उपसा सिंचना योजना – १.००

बार्शी उपसा सिंचन योजना – २.५९

एकरुख उपसा सिंचना योजना – ३.१६

सांगोला उपसा सिंचन योजना – २.००

लाकडी- निंबोडी उपसा सिंचन योजना – ०.५७

मंगळवेढा उपसा सिंचना योजना – १.०१

धरणातील बाष्पीभवन – १४.६८ (सर्वाधिक बाष्पीभवन २००८-०९)

पिण्यासाठीचा पाणीवापर – २.४९

औद्यागिक पाणीवापर – ३.२६

असं जवळपास ८२ टीएमसी पाणी हे सोलापूर जिल्ह्यासाठी दिलेलं आहे. उर्वरित २१ टीएमसी पाणी कृष्णा – मराठवाडा योजनेसाठी विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना मंजूर झालेलं आहे. म्हणजेच धरणच पाणी वाटप यापूर्वी पूर्ण झालं आहे.

इथं आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी म्हणजे, कोणत्याही धरणाचं पाणी वाटप करताना एक बेसिक काय असतं तर जो उपयुक्त पाणी साठा आहे, तेवढ्याच पाण्याचं वाटप करायचं असतं. आणि उर्वरित जो मृत साठा असतो तो भविष्याच्या नियोजनासाठी, उन्हाळ्यासाठी, पाण्याचं दुर्भिक्ष असतं अशावेळी वापरायचा असतो.

मात्र उजनी धरण या बाबतीत अपवाद असल्याचं दिसून येत. कारण इथं उपयुक्त पाणीसाठा ५४ टीएमसी असताना ठेवत यातील जवळपास ८२ टीएमसी पाणी हे सोलापूर जिल्ह्यासाठी दिलेलं आहे

आता सरकारनं काय निर्णय घेतला आहे?

मागच्या १५ ते २० वर्षांपासून इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची ५ टीएमसी पाण्याची मागणी होतं होती. बरीच वर्ष राजकारण झालं, अखेरीस २३ एप्रिल २०२१ रोजी इंदापूरचे आमदार आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नांतून उजनीतून इंदापूर तालुक्यातील शेतीच्या सिंचनासाठी सरकारने ५ टीएमसी पाणी उचलण्यासाठी सरकारनं परवानगी  दिली आहे.

कुंभारगाव परिसरातील उजनी जलाशयातून १० हजार एचपीच्या पंपानं हे पाणी उचलणार आहेत. पुढे ते जवळपास १० किलोमीटरवरच्या शेटफळगढे परिसरातील खडकवासला कालव्यात टाकलं जाणार आहे. तिथून हे पाणी सणसर कटद्वारे नीरा डाव्या कालव्यावरील २२ गावातील शेती सिंचनासाठी वापरलं जाणार आहे.

तर खडकवासला कालव्यातून इंदापूर पर्यंतच्या शेती सिंचनासाठीही पाणी वापरलं जाणार आहे. दोन्ही कालव्यावरील सुमारे ६३ हजार एकर क्षेत्र ओलिता खाली येणार असून शेतकऱ्यांना कायमस्वरुपी पाणी मिळणार आहे.

सरकारनं हा निर्णय घेताना हे सांडपाणी असल्याचं सांगितलं आहे. म्हणजे काय तर धरणक्षेत्रात पाऊस झाला नाही, तरी पुणे, पिंपरी चिंचवड या भागातील मुळा-मुठा नदीतून धरणात सरासरी २५ ते ३० टीएमसी पाणी (सांडपाणी) दरवर्षी जमा होतं असल्याचा दावा केला जातो. याच सांडपाण्यातील पाच टीएमसी पाणी खडकवासला व नीरा डावा कालव्यावरील इंदापूर तालुक्यातील २२ गावांना दिले जाणार असल्याचं सरकारनं सांगितलं आहे.

सोलापूरकरांचा म्हणणं काय आहे?

सोलापूरचे शेतकरी बसवराज पाटील म्हणाले,

उजनी धरण तयार होतं असताना करमाळा तालुक्यातील २९ गावे, हजारो हेक्टर सुपीक शेतजमीन, माझ्या वडिलांच्या घरासह अनेकांची घर गेली. त्यानंतर धरण पूर्ण झालं. त्यामुळे या पाण्यावर आमचा आणि तालुक्याचा अधिकार असताना आधी मराठवाडयाला आणि आता इंदापूरला नेलं जात आहे.

तर दुसऱ्या एका शेतकऱ्यानं नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितलं,

ज्या जिल्ह्याच पालकमंत्री दत्तामामा भरणे आहेत त्यांनी त्या जिल्ह्यातील अर्ध्या राहिलेल्या योजना पूर्ण करायला पाहिजे होत्या. पण त्यांनी स्वतःच्या मतदारसंघाकडे पाणी पळवून नेलं आहे.

सोलापूर तरुण भारत संवादचे संपादक रजनीश जोशी यांनी ‘बोल भिडू’शी बोलताना सांगितलं,

उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील २२ गावांना सिंचनासाठी पुरवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. मात्र, या योजनेसाठी बिगर सिंचनातून उजनी जलाशयातील सांडपाणी उचलण्याची सूचना करण्यात आली आहे. पण जलाशयात ५ टीएमसी सांडपाणी उपलब्ध होते का, हाच मुळात कळीचा मुद्दा आहे.

येत्या दोन वर्षात ही योजना पूर्ण होणार आहे. पण महाराष्ट्र राज्य जल संसाधन नियामक प्राधिकरण (एमडब्लूआरआरए) आणि राज्यपालांकडून या योजनेला हिरवा कंदील मिळणेही गरजेचे आहे.

एखादी नवी योजना कार्यान्वित करताना तिच्या व्यवहार्यतेचा मुद्दा महत्त्वाचा असतो. उजनी जलाशयात पाच टीएमसी सांडपाणी जमते का, याची शहानिशा नाशिकच्या ‘जलविज्ञान’कडून करून त्यांचे तसे प्रमाणपत्र घेण्याचा आदेश सध्या देण्यात आला आहे. मात्र तसे सिद्ध झाल्यास त्यातून धरणातील जल प्रदूषण इतक्या मोठ्या प्रमाणावर होत असताना जलसंपदा खाते कृतीशून्य कसे, असा नवा मुद्दा चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.

दत्तात्रय भरणेंनी काय म्हणाले?

सोलापूर जिल्ह्यातून वाढता विरोध लक्षात घेऊन मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूरकरांना आपण त्यांच्या हक्काचं पाणी नेणार नसल्याचं सांगितलं आहे. ते म्हणाले,

उजनी धरणातील पाण्याचे वाटप ठरल्याप्रमाणे होईल. सोलापूरकरांच्या हक्काचं एक थेंब ही पाणी इंदापूरला नेलं जाणार नाही. तसं झालं तर मंत्रिपद, आमदारकीचं काय, तर राजकीय संन्यास घेईन.

त्यामुळे उजनी पाणी वाटपाचा हा वाद आता कोणतं नवीन रूप घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.