पुतीन यांनी अमेरिकन निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचं पारडं झुकावं म्हणून हस्तक्षेप केला होता

रशिया आणि युक्रेन यांच्यातील वाद दिवसेंदिवस अजूनच ज्वलंत होत चाललाय. या दोन्ही देशांमध्ये इतर देश देखील हस्तक्षेप करत शांतात राखता येईल का? म्हणून प्रयत्न करत आहेत. यात अमेरिका मोठी भूमिका बजावत आहे. अनेक बैठका घेऊन मध्यस्थीचा प्रयत्न अमेरिका करत आहे.

अशात रशिया आणि अमेरिकेबाबतीत एक घटना समोर आली आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकन निवडणुकीदरम्यान मदत केल्याचं एका रिपोर्टमधून समोर आलं आहे.

नुकतंच एक गुप्त रिपोर्ट समोर आली आहे. ज्यात सीआयएच्या एका व्यक्तीने ही संबंधित माहिती दिली आहे. २०१७ साली या व्यक्तीला रशियामधून निष्कासित करण्यात आलं होतं. त्याच व्यक्तीने असा उलगडा केला आहे की २०१६ च्या अमेरिकन निवडणुकीमध्ये रशियाने हस्तक्षेप केला होता.

पुतीन यांनी अशा हस्तक्षेपाचे ‘खाजगी’ आदेश दिले होते. यामागचा त्यांचा हेतू होता तो डोनाल्ड ट्रम्प यांना मदत करण्याचा. निवडणुकीमध्ये ट्रम्प यांना झुकतं माप मिळावं म्हणून पुरेपूर मदत देण्याची तयारी त्यांनी दर्शवली होती.

सीआयएने याआधीही सांगितलं होतं की, रशियाने रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना निवडणुकीत जिंकवण्यासाठी मदत केली होती. आता या व्यक्तीच्या दुजोऱ्याने हा दावा खरा ठरल्याचं रिपोर्टनुसार सांगितलं जातंय. मात्र ज्याने ही बातमी उघडकीस आणली आहे त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या सुरक्षेची काळजी आता सीआयएला लागली आहे. त्याचमुळे या व्यक्तीचं नाव जगजाहीर करण्यात आलेलं नाहीये. 

तसं तर ट्रम्प यांच्यावर नेहमीच रशियासोबतच्या त्यांच्या संबंधांना घेऊन टीका केली जाते, मात्र ते नेहमीच अशा टीकांना नाकारत आले आहेत. मात्र ४४८ पेजेसच्या रिपोर्टच्या या दाव्याला अजून एका व्यक्तीची साथ मिळाली आहे. या प्रकरणी अमेरिकेचे विशेष वकील रॉबर्ट म्युलर यांनी २२ महिने चौकशी केली होती आणि त्यांनी रशियन हस्तक्षेपाच्या अहवालावर साक्ष देण्याचंही मान्य केलं होतं. त्यानुसार १७ जुलैला, ते सर्वप्रथम जनतेशी बोलले आणि नंतर हाउस ज्यूडिशियरी एंड इंटेलिजेंस कमेटी समोर हजर झाले होते. 

 म्युलर यांनी या रिपोर्टमध्ये हे देखील लिहिलं आहे की, जेव्हा ते रशियन हस्तक्षेपाबाबतीत तपास करत होते तेव्हा ट्रम्प यांनी त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी म्युलर न्याय विभागात होते आणि त्यांना हटवण्याचाही ट्रम्प यांनी प्रयत्न केला. मे महिन्याच्या अखेरीस त्यांनी स्वत: या पदाचा राजीनामा दिला. 

मात्र इतके प्रयत्न करूनही रिपोर्टमध्ये असं देखील लिहिल गेलं आहे की रशियाने अमेरिकेच्या निवडणुकीत हस्तक्षेतप केल्याचे पुरेसे पुरावे सापडलेले नाहीत. 

या रिपोर्टमध्ये इतर देशांच्या बाबतीत काय सांगण्यात आलं आहे?

रशिया आणि इराणने निवडणूक निकालांवर प्रभाव टाकण्यासाठी व्यापक प्रयत्न केले होते. यात रशियाने ट्रम्प जिकावे म्हणून प्रयत्न केले तर इराणने मतदानावरील विश्वास कमी करण्याचा प्रयत्न केला आणि ट्रम्प यांची पुन्हा अध्यक्ष होण्याची शक्यता कमी करण्यासाठी प्रयत्न केले होते. तर चीनने मात्र यात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप केला नाही. याबद्दल अमेरिकी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की चीनला अमेरिकेसोबत संबंध स्थिर आणि शाबूत ठेवायचे आहे, म्हणून ते या भानगडीत पडलेच नाही. 

तर या रिपोर्टमध्ये असंही सांगण्यात आलं आहे की, कोणत्याही परकीय हस्तक्षेपाचा अमेरिकेच्या निवडणुकीतील मतांवर किंवा मतदान प्रक्रियेवर परिणाम झाला नव्हता. कारण तसे कोणतेही पुरावे सापडले नाही.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.