भाजपचे बडे नेते धमकी देत असूनही संघाच्या एका आदेशावर उमा भारतींची घरवापसी झाली.

२००३ सालच्या मध्यप्रदेश निवडणूका. भाजपने विधानसभेच्या २३० पैकी १७३ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसची गाडी ३८ वर थांबली. भाजपकडून पक्षाचा चेहरा होत्या आक्रमक नेत्या उमा भारती. ८ डिसेंबर २००३ रोजी त्यांनी मध्यप्रदेशच्या १५ व्या मुख्यमंत्री म्हणून शपथ देखील घेतली.

मुख्यमंत्री म्हणून कामाची सुरुवात करून सहा ते सात महिने झाले असतील त्याच दरम्यान कर्नाटक मधील १९९५ सालचे एक जुने न्यायालयीन प्रकरण समोर आले.

कर्नाटकातील हुबळीमध्ये एका विवादित ईदगाह वरती उमा भारतींनी तिरंगा फडकावला होता. आणि यासंबंधी त्यांच्यावर त्यावेळी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर प्रकरण न्यायालयात जाऊन याबाबत अनेकदा हजर राहण्यास सांगितले. मात्र त्यांच्या अधिकाऱ्यांनी या नोटिसीला त्यांच्यापर्यंत पोहचू दिले नव्हते.

त्यामुळे हे विवादीत प्रकरण आणि न्यायालयाचा अवमान अशा दोन्ही प्रकरणात त्यांना वॉरंट बजावण्यात आले. त्या वादातुनच त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.

उमा भारती यांनी हो – नाही म्हणत राजीनामा तर दिला. पण त्यांनी त्यावेळी अट ठेवली की, न्यायालयातून दिलासा मिळताच संपूर्ण देशात तिरंगा यात्रा काढणार आणि यानंतरच पुन्हा मध्यप्रदेशमध्ये परतणार. पक्षश्रेष्ठींनी देखील त्यांच्या या अटीला दुजोरा दिला.

पुढे काही महिन्यातच कर्नाटक सरकारने उमा भारतींवरचा खटला मागे घेतला. यामुळे त्यांनी ठरवल्याप्रमाणे तिरंगा यात्रेची तयारी सुरू केली. पण त्याच वर्षी म्हणजे २००४ मध्ये महाराष्ट्रामधील निवडणुका होणार असल्याचे असे सांगत पक्षाचे जेष्ठ नेते प्रमोद महाजन आणि व्यंकय्या नायडू यांनी या यात्रेला विरोध सुरू केला.

अटल-अडवाणींना देखील पटवून देण्यात आले की या यात्रेमुळे महाराष्ट्रातील जनतेचे मुख्य निवडणुकीपासून लक्ष विचलीत होईल. नुकताच लोकसभेत पराभव झाल्यामुळे सगळ्यांनीच महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं असल्याचं मत या सगळ्यांचं होत. उमा भारतींच्या याच हट्टामुळे दिल्लीमधील भाजपचा मोठा गट त्यांच्यावर नाराज झाला.

मात्र या विरोधानंतर देखील उमा भारती या यात्रेवर ठाम राहिल्या आणि त्यांनी सुरुवात देखील केली.

कर्नाटक आणि महाराष्ट्र मधून या तिरंगा यात्रेला मोठा पाठिंबा मिळाला. त्यामुळे भाजपच्या गोटामध्ये अटल अडवाणी यांच्यानंतर पक्षाचा पर्याय कोण याच उत्तर मिळत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या.

याच भूमिकेला विरोध करत प्रमोद महाजन, सुषमा स्वराज, व्यंकय्या नायडू हे पक्षातील वरिष्ठ नेते उमा भारती यांच्या विरोधात एकवटले. या सगळ्या एकजुटीच्या पाठिमागे होते अरुण जेटली. या विरोधी राजकारणात सगळ्यात आधी प्रतिक्रिया आली ती व्यंकय्या नायडू यांची.

ते म्हणाले सप्टेंबर २००४ मध्ये उमा भारती यांना मध्यप्रदेशच्या पुनश्च मुख्यमंत्री बनवण्याचा कोणताही प्रस्ताव नाही.

इकडे मजल दर मजल करत तिरंगा यात्रा उत्तर प्रदेश मधील मथुरेमध्ये पोहोचली. याच यात्रेदरम्यान त्यांनी सर्वांनाच बुचकाळ्यात टाकणारी घोषणा केली. ‘राजकीय संन्यास’. पण अटल बिहारी वाजपेयी यांच्या मध्यस्थीने त्यांची नाराजी दुर झाली. आणि संन्यास टळला. यात्रा जेव्हा अमृतसरच्या जालियनवालामध्ये समाप्त झाली तेव्हा वाजपेयी तिथे उमा भारतींना आशिर्वाद द्यायला पोहचले.

मात्र दिल्ली भाजपच्या गोटात पक्षांतर्गत विरोधाच राजकारण चालूच होते. नोव्हेंबर २००४ मध्ये याचा परिणाम बघायला मिळालाच. लालकृष्ण अडवाणी यांच्या सोबत पक्षाच्या बैठकीत माध्यमांसमोर त्यांचा वाद झाला. हेच कारण पुढं करत शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं.

त्यांना वाटले पक्ष पुन्हा आपली समजूत काढेल. मात्र हाच त्यांचा गैरसमज ठरला. जवळपास दीड वर्ष अज्ञातवासात काढल्यानंतर ३० एप्रिल २००६ मध्ये त्यांनी नविन पक्षाची घोषणा केली.

भारतीय जनशक्ति पक्ष

२००८ च्या मध्यप्रदेश निवडणूकीत हा पक्ष २१३ जागांवर निवडणूक लढला. पण त्यापैकी केवळ ६ जागांवरच यश मिळाले. उमा भारती स्वतः कॉंग्रेसच्या यादवेंद्र सिंह यांच्याकडून ९ हजार मतांनी पराभूत झाल्या. काही दिवसातच पक्ष चालवणे सोपी गोष्ट नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.

त्यामुळे उमा भारतींना भाजपमध्ये घरवापसीचे वेध लागले. यासाठी त्यांनी संघाच्या मदतीचा रस्ता निवडला. यासाठी त्यांचे जवळचे सहकारी गोविंदाचार्य संघ प्रमुखांसमोर सतत लॉबिंग करत होते.

याला यश येत संघाने भाजपवर दबाव वाढला. त्यातुनच राजनाथ सिंह आणि लालकृष्ण अडवाणी यांचा निरोप समारंभ फिक्स झाला आणि पक्षांची नवे प्रमुख म्हणून नागपूर मधून नितीन गडकरी यांना पाठवण्यात आले. पण नितीन गडकरी यांच्यावर देखील उमा भारतीना पक्षात प्रवेश देऊ नये यासाठी जेष्ठ नेत्याकडून दबाव टाकण्यात येऊ लागला.

यावर तोडग काढण्यासाठी गडकरी तडक नागपूरचा केशव भवनमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांची भेट घेण्यासाठी पोहोचले.

गडकरी म्हणाले,

सहा जूनला लखनऊमध्ये कार्यकारिणीची बैठक आहे, मी उमा भारती यांना पक्षात परत घेऊ इच्छितो. पण दिल्लीमध्ये बसलेले नेते उमा भारतींच्या पक्ष प्रवेशासाठी विरोध करत आहेत. सुषमा स्वराज आणि व्यंकय्या नायडू दबावतंत्र म्हणून राजीनाम्याची धमकी दिली आहे.

यावर भागवत म्हणाले मी,

त्यांना भाजपमध्ये पाठवत आहे. जर कुणाला काही अडचण असेल तर त्यांनी खुशाल राजीनामा द्यावा. माझा निर्णय बदलणार नाही.

त्यानंतर ७ जून २०११ मध्ये उमा भारती यांनी दिल्लीस्थित अशोक रोडच्या केंद्रीय कार्यालयांमध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यासोबतच त्यांच्या दुसऱ्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली.

पण एका अटीवर, जी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौव्हान यांनी ठेवली होती. की उमा भारती यांना पक्षात प्रवेश दिला तरी त्या मध्य प्रदेश पासून दूर राहतील.

त्यामुळे भारतींचे राजकीय पुर्नवसन करणे गरजेचे होते. आणि अध्यक्ष या नात्याने गडकरींची पहिलीच राजकीय परीक्षा होती उत्तर प्रदेशची निवडणूक. त्यामुळे गडकरी यांनी नवीन योजना बनवली.

त्यानुसार २०१२ च्या उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये भारतींना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित केले. उमा भारती आपल्या लोध जातीची प्रभाव असलेल्या हरिमपूर मधील चरखारी जागेवरून निवडणूक लढल्या आणि जिंकल्या देखील. पण राज्यात मात्र पक्षाचा सलग तिसरा मानहानिकारक पराभव झाला.

त्यानंतर दोन वर्षातच उत्तर प्रदेश मध्ये भाजपचा जुना प्रभाव सुरू झाला. कारण ही मोदी युगाची सुरुवात होती. उमा भारती यांना लोकसभेसाठी आजूबाजूच्या लोधी जातीच्या मतदारांचा प्रभाव असलेल्या झाशी या जागेवरून तिकीट दिले. मोदी लाटेमधे त्या तिथून निवडणून आल्या. यानंतर त्यांना गंगा सफाई मंत्री बनवण्यात आलं.

गंगेची सफाई अवस्था कितपत बदलली माहित नाही पण मोदी युगात उमा भारतींच राजकारण बदललं हे मात्र नक्की. ज्या शिवराज सिंग चौव्हान यांनी पक्षप्रवेशासाठी मध्यप्रदेश पासून लांब ठेवण्याची अट भारतींना घातली होती त्याच चौव्हान यांनी मध्यंतरी राज्यात झालेल्या पोट निवडणूकीमध्ये प्रचारासाठी स्वतः दिल्लीत जाऊन त्यांना आमंत्रित केले होते.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.