कोहली असो, पोलार्ड असो किंवा पंत, दरवेळी राड्यात घावणारे अंपायर नितीन मेननच असतात

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स मॅच अगदी घासून झाली. पहिली इनिंग बघताना लोकांना वाटलं राजस्थान आरामात जिंकतीये, दुसऱ्या इनिंगमध्ये पारडं दोन्हीकडं जरा वर-खाली झालं. पण खरा राडा झाला तो शेवटच्या दोन ओव्हरमध्ये.

१२ बॉल ३६ रन्स हवे असताना, प्रसिद्ध क्रिष्णानं मेडन ओव्हर टाकली. दिल्लीच्या हातातून मॅच गेल्यात जमा होती आणि तेवढ्यात पॉवेलनं शेवटच्या ओव्हरला सलग तीन सिक्स मारले. या तिसऱ्या सिक्सनंतर मात्र राडा झाला.

फुलटॉस आलेला हा बॉल नो-बॉल देण्यात यावा अशी मागणी दिल्लीचा कॅप्टन रिषभ पंतनं डगआऊटमधून केली. 

रॉवमन पॉवेल आणि कुलदीप यादव या दोन्ही बॅटर्सला पंतनं परतही बोलावलं. दिल्लीचे असिस्टंट कोच प्रवीण आमरे थेट मैदानात अंपायरशी वाद घालायला गेले.

या सगळ्या राड्यात दिल्ली हरली, जोस बटलरचं शतक आणि प्रसिद्ध क्रिष्णाची १९ वी मेडन ओव्हर या गोष्टी तर चर्चेच्या बाहेर गेल्या.

लक्षात फक्त दोनच गोष्टी राहिल्या, त्या म्हणजे नो बॉलचा निर्णय आणि अंपायर विरुद्ध प्लेअर राडा.

एवढं सगळं बॅकग्राऊंड तुम्हाला सांगितलं, कारण प्लेअर विरुद्ध अंपायर हा राडा होण्याची ही काय पहिलीच वेळ नाही. याआधीही दोन-चार सुपरहिट राडे झालेत आणि केंद्रस्थानी एकच कार्यकर्ता आहे,

अंपायर नितीन मेनन.

दिल्ली विरुद्ध राजस्थानमध्ये नो बॉल न देणारे अंपायर नितीन मेनन होते. त्यांच्या एका डिसिजनवरुन मैदानात पेटापेटी झाली. सोशल मीडियावर तर मेनन यांना बॅन करावं असं म्हणत लोकांनी राडा घातला.

पण हे नितीन मेनन आहेत तरी कोण?

एका शब्दात उत्तर अंपायर असलं, तरी यांनाही इतिहास आहेच. नितीन मेनन म्हणजे समस्त आई-वडील वर्गासाठी आदर्श मुलगा. मेनन सरळ रेषेतलं साधं आयुष्य जगले आणि वडिलांनी आखून दिलेल्या वाटेवर चालले आणि काही पावलं पुढेही गेले.

मेनन यांचे वडील नरेंद्र मेनन हे माजी क्रिकेटर. मध्य प्रदेशचे विकेटकिपर बॅट्समन असलेले नरेंद्र मेनन ५१ फर्स्ट क्लास मॅचेस खेळले आणि त्यात हजारपेक्षा जास्त रन्सही केले. नितीन मेनन यांनीही खांद्याला किटबॅग अडकवली आणि मैदानाचा रस्ता धरला; पण त्यांचं क्रिकेट करिअर मोसम पकडू शकलं नाही.

 त्यांना फक्त दोन लिस्ट ए मॅचेसमध्ये संधी मिळाली आणि त्याचं सोनंही करता आलं नाही.  त्यांचा हायस्कोअर होता ७ रन्स.

आता पुढं काय?

हा प्रश्न होताच. पण नितीन यांनी पुन्हा एकदा नरेंद्र यांनी आखलेला मार्गच निवडला. आपल्या वडिलांप्रमाणे नितीनही अंपायर झाले. क्रिकेट करिअरच्या बाबतीत पप्पा मेनन सवाई ठरले असले, तरी अंपायरिंगच्या बाबतीत मात्र बेटा मेनन यांची हवा आहे. विशेष म्हणजे अम्पायरिंगची परीक्षा देण्याचा सल्लाही नरेंद्र मेनन यांचाच होता.

नितीन मेनन हे अंपायर म्हणून प्रचंड नावाजले. कित्येक इंटरनॅशनल मॅचेसमध्ये त्यांनी अम्पायरिंग केलं. पण कसंय बऱ्याचदा त्यांच्याकडून घडलेल्या चुका आणि त्यांच्या निर्णयाला खेळाडूंकडून आलेली प्रतिक्रिया या गोष्टी जास्त गाजल्या.

उदाहरणार्थ वैगेरे

पोलार्ड विरुद्ध मेनन-

२०१९ ची मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स फायनल. कोसळलेल्या मुंबईचा आधारवड पोलार्ड होता. नेमका ब्राव्होचा एक बॉल वाईड गेला, पण पोलार्ड पुढं सरकलेला असल्यानं मेनन यांनी काय वाईड दिला नाय. आता पोलार्ड म्हणजे आडवं डोकं, त्यानं बॅट हवेत फेकून झेलली आणि पुढच्या बॉलला वाईड लाईनच्याही पलीकडं थांबला. हे बघून मेनन खवळले आणि थेट पोलार्डच्या अंगावर गेले. आता ते पोलार्ड केवढं हे आपले मेनन सर केवढे, पण तरी नडायला पुढं गेलेच.

कोहली विरुद्ध मेनन-

भारत विरुद्ध इंग्लंड सिरीज दरम्यान अनेकदा या जोडीत गरमागरमी झाली. कोहली कायम सुट्टी नॉट मोडमध्ये असायचा त्यात मेननही माघार घ्यायचे नाहीत. त्यामुळे समोरच्या टीममधल्या प्लेअरला नॉटआऊट देण्यावरुन, डीआरएसवरुन या दोघांमध्ये लय वेळा गरमागरमी झाली.

बरं इतकंच नाही, तर रोहित शर्मा, आर अश्विन यांच्यासोबतही मेनन यांचे खटके उडून झालेत.

हे एवढे राडे झालेत, याचा अर्थ नितीन मेनन हे बाद अंपायर आहेत का?

तर आजिबात नाही. सध्या आयसीसीच्या एलिट अंपायर्सच्या यादीत असलेले, नितीन मेनन हे एकमेव भारतीय अंपायर आहेत. एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं, ‘जसा प्लेअर्सचा फॉर्म असतो. तसा आम्हा अंपायर्सचाही असतो.’ साहजिकच आहे जेव्हा फॉर्म गंडतो तेव्हा कदाचित चुका होऊ शकतात. इंग्लंडच्या भारत दौऱ्यावेळी त्यांनी केलेल्या अम्पायरिंगचं तर प्रचंड कौतुक झालं होतं.

माणूस म्हणल्यावर चुका होणारच, पण अंपायरची एक चूक मॅचचा निकाल बदलू शकते आणि प्लेअरचा काही क्षणांचा राग त्याचं सगळं करिअर.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.