घोटभर दारू मिळावी म्हणून त्याने लिहिलेली कादंबरी म्हणजे ‘उमराव जान’

कोणती कलाकृती कसा जन्म घेईल काही सांगता यायचं नाही. असं म्हणतात एक रुमाल टेबलावर पडला होता. तो बघून शेक्सपियरच्या डोक्यात अनेक प्रश्न आले. हा रुमाल कोणाचा असेल ? त्याने तो इथे का ठेवला ? कोण विसरून गेलंय का ? वगैरे वगैरे. यातून शेक्सपियरच्या लेखणीतून जन्म झाला ‘ऑथेल्लो’ चा.

त्यामुळे लेखकाच्या डोक्यात असलेली कोणती कल्पना कधी जन्म घेईल काय सांगता यायचं नाही. कधी कधी काही गोष्टी इतक्या सहज जुळून येतात की खुद्द लेखक चकित होऊन जातो.

असंच काहीसं घडलं ‘उमराव जान’ या कादंबरीच्या बाबतीत.

‘उमराव जान’ हे नाव घेतल्यावर पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते बोलक्या डोळ्यांची अभिनेत्री रेखा. १९८१ साली प्रदर्शित झालेल्या ‘उमराव जान’ सिनेमात रेखाच्या अदा पाहणं, म्हणजे आनंदाची गोष्ट. फारुक शेख आणि रेखा ही जोडी या सिनेमात खूपच सुंदर दिसली. हा सिनेमा इतिहासातल्या एका सत्य घटनेवर आधारीत आहे की काय? असं वाटतं होतं.

पण थोडा सिनेमांचा इतिहास चाळल्यावर कळालं की, हा सिनेमा एका उर्दू कादंबरीवर आधारित आहे.

आणि ज्या लेखकाने ही कादंबरी लिहिली त्याची कहाणी मोठी गमतीशीर आहे.

ही कादंबरी ज्या लेखकाने लिहिली त्या लेखकाचं नाव मिर्झा हादी रुसवा.

त्यांचा जन्म १८५८ साली झाला. मिर्झा लहान असताना त्याच्या आई – वडिलांचं निधन झालं. त्यामुळे मिर्झाच्या काकांनी त्याचं संगोपन केलं. लहानपणापासून मिर्झाला लिखाणाची आवड होती. त्याचं अक्षर सुद्धा छान होतं. ज्याला आपण सध्याच्या काळात कॅलीग्राफी म्हणतो अशा गोष्टीमध्ये मिर्झा कुशल होता.

त्याकाळी असलेले प्रसिध्द कॅलीग्राफीस्ट हैदर बक्ष यांच्याकडे मिर्झाने अक्षर सुलेखनाचे धडे गिरवले.

मिर्झाने लिखाणासोबत स्वतःच्या शिक्षणावर सुद्धा लक्ष केंद्रित केले. त्यांनी लेखापालाची परीक्षा पास केली. यानंतर त्यांच्या नावापुढे ‘मुनशी’ ही पदवी जोडली गेली. आपल्यापैकी काही जणं जसं डॉक्टर, वकील अशी शैक्षणिक उपाधी नावापुढे जोडतात. तशी त्याकाळी ‘मुनशी’ ही पदवी प्रतिष्ठेची मानली जात असे.

काही काळ त्यांनी सरकारी नोकरी केली. परंतु ती नोकरी सोडून पूर्णवेळ शिकवण्यासाठी ते लखनऊ शहरात आले. लखनऊ येथील एका कॉलेजमध्ये गणित, विज्ञान, पर्शियन, तत्वज्ञान असे विषय ते विद्यार्थांना शिकवत होते.

१८८७ साली वयाच्या ३० व्या वर्षी त्यांनी लैला – मजनू च्या प्रेमकहाणीवर आधारित एक भलीमोठी कविता प्रकाशित केली.

लिखाण आणि विद्वत्ता अशा सर्व गोष्टी असलेल्या मिर्झाला दारूचं व्यसन लागलं. हे व्यसन पुढे इतकं वाढत गेलं की लिखाणाची आवड असलेल्या त्यांच्या हातून काहीच लिहिलं जात नव्हतं. त्यांच्या आसपासच्या लोकांना मिर्झाच्या आयुष्याची जी शोकांतिका होत होती, ती बघवत नव्हती.

इतका विद्वान माणूस दारूच्या नशेत स्वतःचं आयुष्य उध्वस्त करत होता.

दारूच्या व्यसनामुळे मिर्झाचे स्वतःजवळ असलेले पैसे संपत चालले होते. त्यामुळे त्याने लोकांकडे हात पसरायला सुरुवात केली. सुरुवातीला मिर्झाची विद्वत्ता डोळ्यासमोर ठेवून लोकांनी पण त्याला पैसे दिले.

परंतु मिर्झा वारंवार पैसे मागत असल्याने लोकं त्याला टाळू लागली.

एकदा असाच पैशाच्या शोधात मिर्झा एका मित्राच्या घरी गेला. मिर्झाची दारुण अवस्था मित्राला बघवली गेली नाही. मिर्झाने त्या मित्राकडे पैशाची मागणी केली.

‘आपण जर पैसे दिले तर मिर्झा ते पैसे व्यसनात बरबाद करणार’,

हे मित्र जाणून होता. मिर्झाला सुधारणं आवश्यक होतं. मित्राने मिर्झाला पैसे दिले. पण समोर एक अट ठेवली.

ती अट अशी होती, मिर्झाने पैसे घ्यावेत पण त्या बदल्यात एका महिन्याच्या आत मिर्झाने मित्राच्या देखरेखीखाली एक कादंबरी लिहून द्यावी.

मिर्झाने मित्राची ही अट मान्य केली.

पैसे घेऊन मिर्झा निघून गेला. आणि दुसऱ्या दिवसापासून मित्राच्या घरी जाऊन मिर्झा कादंबरीचं लिखाण करू लागला. सुरुवातीच्या काही दिवसात दारूशिवाय दिवस काढणं मिर्झाला त्रासदायक होत होतं. पण ज्या मित्राने ही अट समोर ठेवली होती, तो मित्र कादंबरी लिहिण्यासाठी सतत मिर्झाचा पाठपुरावा करत होता.

हळूहळू मिर्झाच्या लिखाणातून एक एक पानं साकार होत होती. दिवस पुढे जात होते.

मिर्झा लिखाणात इतका हरवून गेला की त्याचं दारूचं व्यसन सुटलं. अखेर अटीप्रमाणे मिर्झाने एका महिन्याच्या आत कादंबरी लिहून पूर्ण केली.

त्या कादंबरीचं नाव ‘उमराव जान अदा’.

१८८९ साली ही कादंबरी प्रकाशित झाली.

या कादंबरीमुळे मिर्झाला पुन्हा एकदा नावलौकिक मिळाला. ही पहिली कादंबरी होती ज्यामध्ये आधुनिक भारताची रोजच्या व्यवहारामध्ये असणारी भाषा वापरण्यात आली होती.

तसं बघायला गेलं तर कादंबरी काल्पनिक होती. परंतु मिर्झाने इतकं अस्सल वर्णन लिहिलं होतं की, खूप जणांना त्या वेळेस मिर्झाच्या आयुष्यातील घडलेल्या प्रसंगावर ही कादंबरी आहे, असंच वाटलं होतं.

या कादंबरीवर आधारित १९७२ साली ‘उमराव जान अदा’ हा पाकिस्तानी सिनेमा आला होता. भारतात सुद्धा या कादंबरीवर आधारीत ४ सिनेमे बनवले गेले.

मिर्झाने लिहिलेल्या या कादंबरीवर आधारीत मुझफ्फर अली दिग्दर्शित १९८१ साली आलेला ‘उमराव जान’ हा सिनेमा मात्र प्रचंड गाजला.

खय्याम साब या सिनेमाचे संगीत दिग्दर्शक होते. आशा भोसले यांनी गायलेली ‘दिल चीज क्या है’ आणि ‘इन आखों की मस्ती’ ही गाणी आजही संगीत प्रेमींसाठी आवडती गाणी.

रेखा, फारुक शेख, नसीरुद्दीन शाह असे दिग्गज कलाकार या सिनेमात होते. निमित्त व्यसनाचं होतं, परंतु या निमित्ताने मिर्झाच्या लेखणीतून ‘उमराव जान अदा’ सारखी उत्कृष्ट कलाकृती जन्माला आली.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.