समान नागरी कायदा लागू करण्यासाठीची नेमकी आव्हान काय आहेत?

काल दिल्ली उच्च न्यायालयाने बहुचर्चित समान नागरी कायद्याबाबत एक मोठं भाष्य केलं. नुसतं भाष्यचं नाही केलं तर न्यायालयाने केंद्र सरकारला सामान नागरी कायदा लागू करण्याबाबतचे योग्य ती पावलं उचलण्याचे निर्देश देखील दिले.

न्यायालय काल म्हणाले,

संविधानाच्या कलम ४४ मधील समान नागरी कायद्याच्या धारणेला प्रत्यक्ष वास्तवात आणण्याची वेळ आली आहे. भारत आता बदलत आहे. लोक जाती, धर्माच्या पलिकडे जात आहेत. त्यामुळे पारंपारिक बंधनं कमी होताना दिसत आहेत. अशावेळी लग्नानंतर घटस्फोट घेण्यासारख्या काही प्रकरणात तरुणांना अडचणी येऊ शकतात. त्यातून मार्ग काढण्यासाठी देशात समान नागरी कायदा लागू करण्याची गरज आहे.

खरंतर या आधी देखील देशात वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक एकत्र राहत असल्यामुळे इथे समान नागरी कायदा असण्याची गरज अनेकदा व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, त्यावर ठोस निर्णय किंवा त्या दिशेने ठोस प्रयत्न होताना दिसले नाहीत. राज्यघटना लागू झाल्यापासून समान नागरी कायद्याचं कलम हे मृत कलम म्हणून ओळखल जात आहे.

पण या निमित्ताने हा प्रश्न उभा राहतो की, हे समान नागरी कायदा लागू होण्यासाठी नेमकी आव्हान कोणती आहेत? आव्हान जाणून घेण्याआधी आपल्याला हा कायदा काय आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. 

काय आहे समान नागरी कायदा?

आपल्या देशात विविध धर्म आहेत. यात त्यांच्या विवाह, वारसाहक्क, दत्तक या बाबत वेगवेगळे नियम व कायदे आहेत. एकाच भारत देशात राहत असताना वेगवेगळे कायदे असणे ही बाब राष्ट्रीय भावना निर्माण करण्यासाठी पोषक ठरत नाही म्हणूनच घटनाकारांनी ‘एक देश एक कायदा’ असावा असा विचार मांडला होता. 

हिंदू नागरी कायद्यामध्ये बौध्द, जैन, सीख, लिंगायत, वीरशैव तसेच इतर धर्म येतात. तर ख्रिश्चन, मुस्लिम अशा धर्मांचे स्वतंत्र असे कायदे आहेत.

परंतु संविधान सभेपासूनच समान नागरी कायद्याला मुस्लिम बांधवांचा विरोध असल्यानं हा विषय कळीचा मुद्दा ठरला. २३ नोव्हेंबर १९४८ रोजी जेव्हा संविधान सभेत हा विषय चर्चेला आला तेव्हा फार मतभिन्नता झाली, शेवटी समान नागरी कायदा करताना सामाजिक भावनांचा विचार केला गेला. यानंतर या कायद्याबाबत सरकारच्या मार्गदर्शक तत्वात कलम ४४ नुसार तरतूद केली आणि त्याबाबत कायदा करण्याची जबाबदारी सरकारवर टाकली.

थोडक्यात वेगवेगळ्या धर्माधर्मामध्ये जे काही भेदभाव आहेत ते संपवून एकच कायदा सर्व धर्मांसाठी लागू करणे म्हणजे समान नागरी कायदा.

मात्र तो आता पर्यंत लागू करण्यासाठी नेमकी आव्हान काय?

या आव्हानांमध्ये सगळ्यात पहिलं आणि मोठं आव्हान आहे ते म्हणजे विविध धर्मिंयाचा विरोध. म्हणजे हा कायदा लागू केला तर आपला धर्म धोक्यात येणं असं वाटतं. त्यामुळेच या कायद्याला बराच विरोध होतो.

मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सचिव जफरायाब जिलानी हे माध्यमांशी बोलताना कायम सांगतात की, शरीयत कायदा अल्लाहची देणगी आहे, मनुष्याची नाही. आमचा शरीयत कायदा कुराण आणि हदीसवर आधारित आहे. त्यामुळे कोणतीही संसद यात दुरूस्ती करू शकत नाही आणि केली तरी आम्ही मानणार नाही.

“मुस्लीम पर्सनल लॉमध्ये कोणीही मुस्लीम बदल करू शकत नाही. त्यांना तो अधिकार नाहीय. तो नागरी कायदा होऊ शकत नाही. त्यात ना कोणी मुसलमान दखल देऊ शकत, ना कोणी इतर दखल देऊ शकत”

तर हिंदू धर्मातील लोक म्हणतात कि, दक्षिण भारत असो, ईशान्य भारत किंवा आदिवासी भाग असो, भारतात सर्वत्र लग्नपरंपरा वेगवेगळ्या आहेत. जसं की दक्षिण भारतातील हिंदू समाजात एका गटात मामा-भाचीच्या लग्नाला परवानगी आहे. मात्र, हेच जर उत्तर भारतात असं काही करायचं लांब विचार देखील मनात आणत नाहीत.

तर ख्रिश्चन समाजामध्ये स्वतःच कॉमन सिविल कोड आहे. यात रोमन कॅथलिक आणि प्रोटेस्टंटही असे दोन वेगवेगळे समाज आहेत. यात रोमन कॅथलिकमध्ये घटस्फोट पद्धत नाही. त्यांच्यात लग्न जन्मोजन्मीचं बंधन असते. तर दुसऱ्या बाजूला, प्रोटेस्टंटमध्ये घटस्फोट पद्धत आहे.

दुसरं सगळ्यात मोठं आव्हान आहे ते म्हणजे भारत हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र असल्यामुळे समान नागरी कायदा लागू करणं, म्हणजे धर्माबाबत असणारं स्वातंत्र्य हिरावून घेणं असं अनेक जणांचं म्हणणं आहे. मात्र तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार धार्मिक स्वातंत्र्य हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे, प्रत्येकाला हा राज्यघटनेनं बहाल केलेला हक्क आहे. त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी न्यायालयावर आहे. 

तिसरी गोष्ट म्हणजे भारतात बहुसंख्य हिंदू समाज असल्यामुळे हा कायदा लागू झाल्यास त्यांच्या दबावाखाली येऊ, अशी भीती इतर धर्मीयांमध्ये आहे. मात्र अनेक जण ही भीती फोल असल्याचं सांगतात. कारण भारतात सर्व धर्मियांना आपलं धार्मिक स्वातंत्र्य आहे.

त्याचबरोबर चौथं आव्हान म्हणजे काँग्रेस पक्षाने आतापर्यंत अल्पसंख्यांक वोट बँक लक्षात घेऊन हा कायदा मंजूर होऊ नाही दिला असा आरोप वारंवार केला जातो. त्यासाठी १९८५ सालचं उदाहरण देखील दिलं जातं.

१९८५ मध्ये शाहो बानो प्रकरण झाल्यानंतर न्यायालयाने असा निर्णय दिला होता की मुस्लिम समाजातील स्त्रियांना घटस्फोट दिल्यानंतर तिच्या पतीकडून पोटगी मागण्याचा अधिकार आहे. मात्र, त्यानंतर राजीव गांधी यांचं सरकार आल्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या बहुमताने संसदेत पुन्हा कायदा नाकारून टाकला.

लागू केल्यास काय बदल होतील?

पहिली तर लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे अनेक तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, समान नागरी कायदा लागू केल्यास देशातील कायद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करावे लागतील आणि हे सर्व अत्यंत अडचणीचं आणि आव्हानात्मक असेल. शिवाय, ही एका झटक्यात होणारी प्रक्रिया नसून मोठी प्रक्रिया आहे.

पण तरीही जर हा कायदा लागू केल्यास विविध जातीधर्म असले तरी कायद्यानुसार सर्व समान असतील. सगळ्यांना समान नागरी हक्क आणि संधी मिळतील. विवाह, घटस्फोट, पोटगी हे सारे एकाच कायद्याने लागू होईल.

सोबतच सर्व लोकांना एकच कायदा लागू असल्यामुळे सर्वामध्ये एकीची भावना निर्माण होऊ शकेल.

त्यानंतर कायद्यासमोर सर्व लोक समान असतील. विविध धर्माच्या वैयक्तिक कायद्यांमुळे न्यायव्यवस्थेला देखील मोठ्या प्रमाणात अडचण येते ती कमी होऊ शकते.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.