अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा सहकार क्षेत्रातच नाही तर राज्यातला मोठा गेम चेंजर ठरणाराय.
देशाचे सहकारमंत्री अमित शाह यांचा पुणे दौरा वादळी ठरला. अहमदनगरमधील प्रवरानगर इथं झालेल्या पहिल्यावहिल्या सहकार परिषदेला त्यांनी उपस्थिती लावली आणि त्याचबरोबर राजकारणात द्यावे लागतात तसे बरेचसे इंडिकेशन्स दिले.
पहिलं इंडिकेशन म्हणजे राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजलंय. शहा यांनी शिवसेनेपासून राज्यातील कार्यकर्त्यांपर्यंत अनेकांना जोरदार संकेत दिले. शहा यांच्या वीकेंड दौऱ्यामुळे राज्याच्या राजकारणावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील ३६ दिवसांच्या अभूतपूर्व राजकीय नाट्यानंतर, अमित शहा महाराष्ट्रात पूर्ण अॅक्शन मोडमध्ये दिसण्याची ही कदाचित पहिलीच वेळ आहे. राज्यात दोन दशकांहून अधिक काळ शिवसेनेची सत्ता असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेसह (BMC) महत्त्वाच्या महापालिका निवडणुका येत्या काही महिन्यांत होणार आहेत.
पहिल्यांदा तर, शाह यांनी या भेटीदरम्यान आपला माजी सहकारी असणाऱ्या शिवसेनेवर हिंदुत्वाचा बुरखा पांघरून विश्वासघात केल्याचा आरोप केला. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढण्याचे आव्हान देऊन शिवसेनेला चांगलेच फैलावर घेतले.
यातून मॅसेज काय गेला तर आगामी निवडणुकीत भाजपसाठी शिवसेनाच प्रमुख प्रतिस्पर्धी असेल. शहा यांनी एक प्रकारे भाजप-सेना युतीची कुरकुरही संपवली आहे. शिवसेनेला ५०-५० सत्तावाटपाचा कोणताही फॉर्म्युला देण्यात आलेला नव्हता, हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केल.
महापालिका निवडणुकीपूर्वी, विशेषत: महत्त्वाच्या शहरी भागात दोन्ही पक्षांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. सत्तावाटपाचा मुद्दा उपस्थित करून युती तोडण्यात आली या आरोपावर शहा यांनी शिवसेनेलाच जबाबदार धरलय.
शहा यांचा दुसरा महत्त्वाचा मॅसेज काँग्रेस आणि इतर नेत्यांना होता. विशेषत: राज्यातील सहकार क्षेत्रावर नियंत्रण ठेवणाऱ्या पवारांना होता. शहा यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) ला भेट देण्याचे पवारांचे निमंत्रण नाकारले आणि विखे-पाटील यांनी आयोजित केलेल्या सहकार परिषदेला उपस्थित राहणे पसंत केल.
यातून त्यांनी एकप्रकारे यंहा के हम सिकंदर असल्याचं दाखवून दिलंय.
साखर कारखान्यांना बँक हमी देण्याच्या वादग्रस्त मुद्द्याकडे लक्ष वेधून शहा यांनी या क्षेत्रात आपण मूक प्रेक्षक बनून राहणार नाही असा संदेश दिला. विशेष म्हणजे सहकार क्षेत्रात भाजपचा बालेकिल्ला असलेल्या पंकजा मुंडे, हरिभाऊ बागडे यांच्यासारख्या जुन्या नेत्यांना सहकारमंत्र्यांनी आपल्या भाषणात स्थान न देता, त्याऐवजी राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील यांच्यासारख्या टर्नकोट आणि सहकारी बॅरन्सला महत्त्व दिलं.
तिसर म्हणजे, शहा यांनी कथित शहा-फडणवीस शीतयुद्ध संपवण्याचा प्रयत्न केला. २०१९ पासून शहा आणि माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात ‘ऑल इज नॉट वेल’च्या कुरबुरीने महाराष्ट्राचे राजकीय वर्तुळ गाजवले आहे.
२०१९ च्या राजकीय नाटकात (पहाटेचा शपथविधी) शहा यांच्या अनुपस्थितीने पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरही अनेकांना आश्चर्य वाटलं होत. काहींनी या अनुपस्थितीचा संबंध फडणवीस यांच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षेतून निर्माण झालेल्या दोघांमधील शीतयुद्धाशी जोडला होता. पण २०१९ मध्ये शिवसेनेसोबत झालेल्या चर्चेचा संदर्भ देत शहा यांनी, राज्याचे नेतृत्व करण्यासाठी फडणवीस यांची निवड पक्षानेच केल्याचे स्पष्टपणे अधोरेखित केले. दोघांमधील कथित ताणलेल्या संबंधांवरून नेहमीच संभ्रमात असल्याचे पक्षाच्या कार्यकर्त्यांना आताच्या भेटीमुळे मॅसेज मिळालाय.
महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्था ‘मिनी विधानसभा’ निवडणुकीपूर्वी शहा यांनी फडणवीस हे राज्यातील सर्वात मोठे नेते असल्याचे स्पष्ट केलय.
येत्या एक-दोन महिन्यांत शहा पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. पुणे भेटीदरम्यान शहा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे उद्घाटन केले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची पायाभरणीही केली. यातूनही काही संदेश द्यायचा होता का हे काही सांगता येत नाही.
मात्र अमित शहा यांनी आता महाराष्ट्रात आपला इंटरेस्ट दाखविल्याने, आता महाराष्ट्र बिग पॉलिटिकल शोडाऊनचा सेट होणार हे मात्र निश्चित.