या एका माणसाच्या जिद्दीमुळे जगातली सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरु झाली.

आपल्यापैकी अनेकांनी लहानपणी पोलिओचे दो बुंद चाखले आहेत. दरवर्षी पोलिओ दिवस शासनातर्फे आयोजित केला जायचा, बच्चनसाहेबांची खास खर्जातल्या आवाजात आर्जव करणारी जाहिरात यायची.

अख्ख्या भारतातील पाच वर्षांखालील बच्चे कंपनी आपल्या आईबापासह ओळीत उभी राहायची.

पोलिओ या आजारास बालपक्षाघात किंवा पोलिओ या नावाने ओळखले जाते. हा एक संसर्गजन्य रोग आहे. थेट चेतारज्जू वर आघात करणाऱ्या या विषाणूमुळे लहानमुलांमध्ये अपंगत्व येण्याचं प्रमाण वाढलं होतं.

एकोणिसाव्या शतकापासून या रोगाचा प्रचंड प्रादुर्भाव झाला होता.

अख्ख्या युरोपात पोलिओने हाहाकार उडवला होता. एकदा हा रोग झाला तर त्यावर उपचार करणे अशक्य आहे. त्यामुळे या रोगावरची लस शोधण्यासाठी चढाओढ सुरू होती.

१९५२ साली जोनस सॉल्क  व १९६२ साली अल्बर्ट सेबिन पोलियोच्या लसी विकसित केल्या.

दवाखान्यात जन्मलेल्या प्रत्येक बाळाला इंजेक्शन वाटे अथवा तोंडावाटे ही लस दिली जाऊ लागली.

त्यानंतर युरोपमध्ये बऱ्याचअंशी पोलिओ वर नियंत्रण मिळाले.

पण भारत, पाकिस्तान बांगलादेश अशा विकसनशील देशांमध्ये घरीच बाळंतपणे होत असल्यामुळे व लसीकरणाबद्दल जागृती नसल्यामुळे पोलिओचा उद्रेक कमी होत नव्हता.

साधारण १९८०च्या दशकात जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHOने पोलिओ समूळ नष्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. विशेषतः अप्रगत देशांमध्ये यासाठी त्यांनी काम सुरू केलं.

पण भारत पोलिओ निर्मूलनामध्ये मागे पडतोय याबद्दल जागतिक पातळीवर चिंता व्यक्त केली जात होती.

साधारण १९९४ सालची गोष्ट भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी यांच्याकडे एका सकाळी दिल्ली राज्याचे नव्यानेच नियुक्त झालेले आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन भेटीला आले. हर्षवर्धन यांना दिल्लीमध्ये एक पोलिओच्या लसीकरणाची मोहीम हाती घ्यायची होती.

अडवाणी याना या उत्साही कार्यकर्त्याचं आश्चर्य वाटलं. पण हर्षवर्धन स्वतः नाक कान घसा तज्ञ डॉक्टर होते शिवाय दिल्ली मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष देखील होते.

अडवाणींनी त्यांना आपल्या शंका विचारल्या, त्याला हर्षवर्धन यांनी समर्पक उत्तरे दिली.

डॉ.हर्षवर्धन होमवर्क करून आले होते.

त्यांनी पोलिओसंदर्भात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या प्लस पोलिओ या मोहिमेचा संपूर्ण अभ्यास केला होता.

तोंडावाटे दिल्या जाणाऱ्या या लसीकरणाच्या मोहिमेमुळे ब्राझील, फिलिपिन्स या देशातील पोलिओ वर विजय मिळवला याची माहिती त्यांनी अडवणींना दिली व भारतातही हे शक्य आहे हे पटवून दिले.

अडवणींनी या योजनेला हिरवा झेंडा दाखवला.

२ ऑक्टोबर गांधी जयंतीला दिल्लीमध्ये पोलिओ दिवस साजरा करायच ठरलं.

डॉ. हर्षवर्धन कंबर कसून कामाला लागले. दिल्लीत त्यांना रोटरी क्लबने मदत करायचं मान्य केलं. पोलिओ जनजागृतीची जोरदार मोहीम हाती घेतली गेली.

दिल्लीत होत असलेल्या या घडामोडीकडे WHOचे संपूर्ण लक्ष होते. त्यांना या योजनेच्या यशस्वीतेबद्दल खात्री नव्हती. तिथल्या महिला बाळासाठी लस घेण्यास पोलिओ बूथ वर येतील का? किती बूथ उभारावे लागणार? असे हजारो प्रश्न उभे होते.

WHOने हर्षवर्धन यांना लसीकरणाची तारीख पुढे नेण्याची सूचना दिली.

पण हर्षवर्धन गांधी जयंतीलाच हा कार्यक्रम घेण्यासाठी ठाम होते. दिल्लीतील बालकांचा नेमका आकडा किती आहे याचा अंदाज घेण्यासाठी त्यांनी एक शक्कल लढवली.

दिल्लीतल्या प्रत्येक शाळेतील प्रत्येक मुलाला एक होमवर्क दिला, आपल्या घरात व शेजारी पाजारी ५ वर्षा खालील वयाची किती मुले आहेत याची माहिती घेऊन येणे. ३० सप्टेंबरपर्यंत ही यादी पोलिओ केंद्रावर पोहचवण्याची जबाबदारी शिक्षकांवर देण्यात आली होती.

१९९४ सालच्या त्या गांधी जयंतीला दिल्लीमध्ये चमत्कार झाला.

पोलिओ लसीकरणासाठी मोठमोठ्या रांगा लागल्याचं चित्र सगळीकडे दिसत होतं. WHO ला सुद्धा यामुळे आश्चर्य वाटलं.

हर्षवर्धन सांगतात, या योजनेच्या यशाचं सगळं श्रेय दिल्लीतल्या शाळकरी मुलांना जाते, त्यांनी आपल्या आयांना बळजबरीने पोलिओ केंद्रावर नेलं. आपल्या भावंडांना लस घ्यायला लावली.

ही मुलेच पोलिओची पहिले ब्रँड अँबेसिडर ठरले.

ही योजना देशभर राबवली जावी म्हणून डॉ. हर्षवर्धन तत्कालीन पंतप्रधान पीव्ही नरसिंहराव यांच्याकडेही गेले होते मात्र त्यांनी त्या कडे दुर्लक्ष केले होते. अखेर लाल कृष्ण अडवाणी यांनी भाजपची सत्ता असलेल्या महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात व दिल्ली या राज्यात ही मोहीम चालवली.

तिथे या योजनेला मिळालेल्या यशामुळे व डॉ. हर्षवर्धन यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे प्लस पोलिओ लसीकरणाची मोहीम १९९५ साली देशभर राबवली गेली. या योजनेला अभूतपूर्व यश लाभले.

दो बुंद जिंदगी के या नावाने हे लसीकरण देशाच्या कानाकोपऱ्यात खेडोपाडी पोहचले.

अमिताभ बच्चन यांनी केलेल्या जाहिरातीचा जनजागृतीसाठी मोठा परिणाम झाला. भारतातलीच नाही तर जगभरातली ही सर्वात मोठी लसीकरण मोहीम होती.

M Id 5995

मात्र पोलिओच्या संपूर्ण निर्मूलनासाठी भारताला २०१३ हे साल उजाडले.

डॉ. हर्षवर्धन यांचं या निमित्ताने जगभर कौतुक झालं. पोलिओ निर्मूलन आणि तंबाखू विरोधी चालवलेल्या मोहिमेबद्दल त्यांना WHOचा सर्वोच्च पुरस्कार बिल क्लिंटन व फुटबॉलपटू पेले यांच्या हस्ते देण्यात आला.

बिल गेट्स यांनी याबद्दल लिहिलेल्या लेखात याचे संपुर्ण श्रेय हर्षवर्धन यांच्या जिद्दीला व चिकाटीला दिलं.

अटलबिहारी वाजपेयी त्यांना गंमतीने स्वास्थ्यवर्धन अशी हाक मारायचे.

याच डॉ. हर्षवर्धन यांची नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळात आरोग्य मंत्री म्हणून निवड केली आहे. सध्या चालू असलेल्या कोरोना काळात त्यांनी पडद्याआड राहून मोठी भूमिका बजावलेली आहे.

याच संकटाच्या काळात WHO ने त्यांच्यावर मोठा विश्वास टाकून आपल्या कार्यकारी बोर्डाच्या चेअरमनपदाची जबाबदारी दिली होती. ज्या प्रमाणे पोलिओच्या लसीकरणची मोहीम त्यांनी जिद्दीने पार पडली त्याच प्रमाणे कोरोना लसीकरण देखील देखील यशस्वी करून दाखवतील यात शंकाच नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.