मायानगरीत येणारा प्रत्येकजण सुपरस्टार ‘बच्चन’ होत नाही, काही जण ‘गुरबचन’ सुद्धा होतात !

मायानगरी मुंबईमध्ये येणारा प्रत्येकजण सुपरस्टार बच्चन  होत नाही. काही जण गुरबचनसुद्धा होतात.

कोण आहे हा गुरबचन सिंग?

पंजाबच्या गुरदासपूरचा पहिलवान. देवानंदपासून विनोद खन्नापर्यंत आणि गुरु रंधावा पासून ते जसपाल जस्सी पर्यंत अनेक सेलिब्रिटीचे गाव. तर अशा या गुरबचनला गावातल्या प्रत्येकाप्रमाणे मुंबईच्या फिल्मइंडस्ट्रीचे वेड होते. त्याचं कसरती शरीर देखणी चेहरेपट्टी बघून सगळे त्याला गुरदासपूरका ड्यूप्लीकेट धर्मेन्दर म्हणायचे. गडी घरच्यांच्या मागे लागला,

” मुझेभी बॉम्बे जाके हिरो बनना है.”

सुरवातीला कोणी तयार होत नव्हते. गुरबचनचे वडील कर्तारसिंग हे गुरदासपुरमध्ये तहसीलदार होते. आपल्या पोराने आपल्यासारखीच सरकारी नोकरी करावी आणि आयुष्यभर सुखाची रोटी खावी अशी साधी त्यांची अपेक्षा होती. पण गुरबचन मुंबईला जाणार म्हणून अडूनच बसला.

अखेर आईचे ममतामयी हृदय विरघळले. तिने पापाजींना मनवण्याची जबाबदारी घेतली. सुरवातीला आढेवेढे घेणाऱ्या कर्तारसिंगनी परवानगी दिली. एवढेच नाही तर त्याचा रोल मॉडेल सुपरस्टार धर्मेंद्रच्या नावे एक चिट्ठी लिहून गुरबचनच्या हातात दिली.

वडिलांनी धर्मेंद्रला लिहिलेली चिठ्ठी आणि आईने दिलेले डब्ब्यातले पराठे हृदयाशी धरून स्वप्नाळू डोळ्यांचा गुरबचन मुंबईला येऊन पोहचला.

धर्मेंद्र स्टार होता पण त्याच्या घराची दारे त्याच्या फॅन्ससाठी नेहमी उघडी होती. त्यात गुरबचन अपने साड्डे पंजाबदा होता. धर्मेंद्रन गावाकडून आपला छोटा भाऊ आल्याप्रमाणे त्याच स्वागत केलं. त्याची चिठ्ठी वाचली. त्याने त्याला आपल्या घरी ठेवून घेतलं. गुरबचनसारखे पंजाबवरून आलेले बरेचजन धर्मेंद्रच्या घरी राहत होते. त्याची आई सगळ्यांना आपल्या मुलाप्रमाणे खाऊ घालायची.

धर्मेंद्रच्याच ओळखीने “कच्चे धागे” या सिनेमामध्ये गुरबचनला एक छोटी भूमिका मिळाली. गुरदासपुरचे सपूत विनोद खन्ना हिरो होते आणि गुरदासपुरचेच राज खोसला दिग्दर्शक होते. गुरबचनला डाकूच्या गँगमधला एक डाकूचा रोल होता.

गुरबचनसिंगची गाडी अभिनयात अडखळणारीच होती. पण हीच गाडी हाणामारीच्या सीनमध्ये राजधानी एक्स्प्रेसपेक्षा वेगाने धावायची.धर्मेंद्रला समजत होत की गुरबचनचं फिल्ममध्ये टिकणं अवघड आहे. त्याने त्याची गाठ अॅक्शन डायरेक्टर रवी खन्नाशी करून दिली.

ज्या धर्मेंद्रचा ड्युप्लीकेट म्हणून गुरबचन अख्ख्या गुरदासपूरमध्ये फेमस होता त्याच धर्मेंद्रच्या स्टंटसीनमध्ये बॉडीडबलचं काम तो करू लागला. पोट तरी भरत होत.

रवी खन्नाने त्याची ओळख विरू देवगनशी करून दिली. विरू देवगन म्हणजे अजय देवगनचे वडील. रोटी कपडा मकान या पिक्चरचं स्टंट ते दिग्दर्शित करणार होते. त्यांचा हा पहिला चित्रपट असल्यामुळे कोणीतरी असिस्टंट त्यांना हवा होता. गुरबचनच्या रुपात त्यांना तो मिळाला.

दोघांची जोडी जमली. धर्मेंद्र विनोद खन्ना वगैरे हिरोच्या बॉडीडबलच काम तो करू लागला. सिनेमाच्या पडद्यामागचं काम सांभाळताना पडद्यावर झळकण्याच त्याच स्वप्न काही थांबत नव्हत.

अखेर एक दिवस विरू पुढे त्याने हा विषय काढला. विरू तरी काय एक अॅक्शन डायरेक्टरच होता, तो काही गुरबचन ला सिनेमामध्ये मोठे रोल मिळवून देऊ शकत नव्हता. पण आपल्या दोस्ताला नाराज करायचं नाही म्हणून मग आपल्या प्रत्येक सिनेमामध्ये अॅक्शन सीन मध्ये गुरबचनला काही न काही छोटासा रोल देण्यात येऊ लागला.

कधी मेन व्हिलनच्या गुंडाचा राईट हँड तर कधी एखादा भुरटा चोर अशा भूमिका त्याला मिळू लागल्या.गुरबचनच्या भूमिका पडद्यावर काही सेकंदापेक्षा जास्त असायचा नाही पण त्यातही तो खुश होता.

अशात एक सिनेमा आला “इन्कार” याचा पण हिरो विनोद खन्ना होता. या सिनेमाचं एक गाणं विशेष गाजलं. हेलनची मादक अदा असलेलं “मुंगळा मुंगळा”.

या गाण्याच्या सीन मध्ये तो बराच वेळ पडद्यावर दिसला. गाण संपल्यावर त्याची आणि गब्बरसिंगफेम अमजद खानची जबरदस्त फाईट होते. या फाईट मध्ये त्याने दिलेली फ्लायिंग किक ही विशेष गाजली. या किक मुळे त्याला आणखी एक मोठा सीन मिळाला.

अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन च्या मिस्टर नटवरलाल सिनेमामध्ये खुद्द बच्चन बरोबर मोठी फाईट करताना गुरबचन दिसला. गुरदासपूर मध्ये तेव्हा त्याच्या मित्रांनी हा पिक्चर वीस वीस वेळा पहिला.

पूर्ण भारतात मात्र या फाईटपेक्षा त्याच पिक्चरमधली बच्चन आणि वाघाची फाईट गाजली.

शराबी, कयामत,प्रेमरोग,मिस्टर इंडिया असे त्याचे अनेक पिक्चर आले, गाजले आणि गेले. गुरबचन कधी गुंडाच्या गर्दीतून पुढे येऊच शकला नाही. हिरो जरी बनता आल नाही तरी मेन व्हिलनचा रोल सुद्धा कधी त्याला मिळाला नाही.

फाईटमध्ये किती जरी हिरोपेक्षा भारी असला तरी पडद्यावर त्याचा मारच खाण गुरबचनच्या नशिबात होत. सगळ्यांनी त्याला कधीना कधी पडद्यावर पाहिलेलं असत. समोर जरी आला तरी आपल्याला ओळखेल हा सिनेमामध्ये काम करतो. पण गुरदासपुरच्या बाहेर कोणालाच त्याचं नाव माहित नाही.

नव्वदच्या दशकात हम आपके है कोण , दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे अशा घरगुती सिनेमामुळे पडद्यावरचा हिंसाचार कमी झाला.त्याचा लाडका धर्मेंद्रसुद्धा आता म्हातारा झाला होता. स्टंटचं काम करणाऱ्याचीही कामे कमी झाली. हळूहळू गुरबचनचं दर्शन कमीकमी होत गेलं. पण तरी तो पंजाबी फिल्मइंडस्ट्रीमध्ये काम करतच होता.

काही दिवसापूर्वी गुरबचन परत पडद्यावर दिसला. यावेळीही त्याला ब्रेक धर्मेंद्रने दिला. आपल्या कमबॅक असलेल्या “यमला पगला दिवाना” या सिनेमामध्ये गुरबचन बबू या छोट्या रोल मध्ये दर्शन देऊन गेला.

आपल्याला कोणी ओळखत नाही याच त्याला जरासुद्धा वैषम्य नाही. उलट अभिनयाचा जरासुद्धा गंध नसून इतकी वर्ष या इंडस्ट्रीमध्ये जवळपास २५० सिनेमामध्ये काम करायला मिळालं यातच तो समाधानी आहे. अभिनयाचा बादशहा दिलीपकुमारसाठी क्रांती या फिल्म मध्ये बॉडीडबलचं काम करायला मिळालं ही आठवण त्याने हृदयाशी जपून ठेवली आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.