मरीन ड्राइव्ह, झेड ब्रिज, बँड स्टॅन्डला नटीसोबत बसलो म्हणून पोलिस अटक करु शकतात काय ?

मुंबईतल्या एका मुलानं ट्विट केलं की, रात्री मरीन ड्राईव्हवर बसलो म्हणून पोलिसांनी कारवाई करत २५०० रुपयांचा दंड ठोठावला. त्यानं  या ट्विटमध्ये मुंबई पोलिसांना टॅग केलं, त्यांनीही सगळी माहिती घेण्याचं आश्वासन दिलं. पण ट्विट करणाऱ्या त्या पोराला कुणी म्हणलं, अशी कारवाई होऊच शकत नाही, तर कुणाचं म्हणणं होतं करावी होऊ शकते.

या सगळ्या राड्यावरुन आम्हाला एक बेसिक प्रश्न पडला, गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड मरीन ड्राईव्हला, झेड ब्रिजवर, बँडस्टॅन्डला किंवा महाराष्ट्रातल्या इतर लोकप्रिय पॉईंट्सवर बसले, तर पोलिस कारवाई करु शकतात का ?

आता माहिती घेणं गरजेचं होतं आणि तुम्हाला सांगणं पण कारण प्रश्न जिव्हाळाचा होता…

सर्वात सोप्पा उपाय तो म्हणजे IPC अर्थात इंडियन पिनल कोड किंवा मुंबई पोलीस कायद्यात याबाबत काही लिहून ठेवलय का? तर होय IPC नुसार कलम २९४ नुसार सार्वजनिक ठिकाणी इतरांना त्रास होईल अशी कोणतिही अश्लिल कृती करणं हा कायद्यानं गुन्हा आहे. शिवाय महाराष्ट्र पोलीस अधिनियमन अर्थात जून्या मुंबई पोलीस ॲक्टच्या कलम ११०, ११२ आणि ११७ नुसार अशा अश्लिल वर्तन करत असाल तर कारवाई होवू शकते.

आत्ता हे झालं लेखीटाकी..

खरी गोम पुढय.. एकतर IPC २९४  तुम्ही तुमच्या नटीसोबत बसलाय म्हणून लावलं जात नाही तर हे कलम सार्वजनिक ठिकाणी उभा राहून वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना लावले जाते. सहसा हे कलम कपल्सवर लावलं जात नाही..

दूसरं कलम मुंबई पोलीस ॲक्ट नुसार ११०, ११२ आणि ११७. या कलमानुसार कारवाई केली जाते पण अश्लिल म्हणजे नेमकं काय हाच आपल्याकडे प्रॉब्लेम आहे. म्हणजे २०१८ साली एका केसमध्ये कोर्ट म्हणालं होतं, अश्लिलता ही बघणाऱ्याच्या डोळ्यात असते. म्हणजे कसय तर महाराष्ट्रातल्याच कोरेगाव पार्कात वनपीस घालून फिरणारी मुलगी आपल्या बोरगाव किंवा कासेगावमध्ये अश्लिल वर्तन करणारी ठरू शकते. मुबई सारख्या ठिकाणी एखादा किस पण खपून जातो पण गावात हात धरला तरी अख्खी भावकी तुडवून हाणू शकते..

थोडक्यात काय अश्लिलता व्यक्तिसापेक्ष असते त्यामुळे बॉम्बे ॲक्टनुसार कलम टाकली तरी कोर्टात ती किती टिकतात हा संशोधनाचा विषय आहे.

असो तर या विषयावर आम्ही काही मान्यवरांनाच विचारायचं ठरवलं. पहिला फोन लावला तो ॲडव्होकेट असिम सरोदे यांना, त्यांनी बोलभिडू सोबत बोलताना सांगितलं,

एखादं जोडपं सार्वजनिक ठिकाणी नुसतं बसलं असेल, हातात हात घेऊन गप्पा मारत असेल, तर पोलिस त्यांच्यावर कारवाई करू शकत नाहीत. त्यांच्या घरच्यांनाही फोन लावू शकत नाहीत. पण कुठलं जोडपं असामाजिक कृत्य करत असेल, तर त्यांच्यावर कारवाई करता येऊ शकते.

 घरी फोन लावणं, त्यांना दटावणं या गोष्टी मॉरल पॉलिसींगमध्ये येतात. जर काही चुकीची कृती करत असाल, तरच पोलिसांकडून कारवाई होते.

डव्होकेट विकास शिंदे यांनीही असंच मत व्यक्त केलं, ते म्हणाले

फक्त बसलाय, गप्पा मारताय म्हणून पोलिस कारवाई करू शकत नाहीत. जर काही कारण असेल, तर पोलिस जोडप्याला जायला सांगू शकतात. त्यांना मॉरल पॉलिसींगही करता येत नाही. 

समजा एखादं जोडपं अश्लील चाळे करत असेल, त्यांना आपण सार्वजनिक ठिकाणी आहोत याचं भान उरलं नसेल, तर मात्र पोलिस कारवाई करतात, त्यांना गुन्हाही दाखल करता येतो.

जोडप्यांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या राईट टू लव्ह या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष के. अभिजित बोल भिडूशी बोलताना म्हणाले,

जर जोडपी बसली असतील आणि त्यांच्याबद्दल कुणाची तक्रार असेल, तर पोलिस त्यांना उठून जायला सांगतात, किंवा इथं बसू नका असं सांगतात. हातात हात घेणं, खांद्यावर हात टाकणं इथपर्यंत गोष्टी ठीक आहेत. 

पण समजा कुणी रस्त्यावर किस करत असेल, तर ते इतर लोकांना विशेषतः लहान मुलं किंवा ज्येष्ठांना अश्लील वाटू शकतं. 

यासाठीच आम्ही २०१९ मध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कपल गार्डन असावं अशी मागणी केली होती. जसं ज्येष्ठांसाठी किंवा लहान मुलांसाठी गार्डन असतं, तसं कपल्ससाठीही असावं. 

अशी सोय नसल्यानं कपल्स अंधार असलेल्या किंवा निर्जन ठिकाणी बसतात आणि मग लुबाडणूक, विनयभंग अशा गंभीर गोष्टी घडतात.

ही सगळी झाली मान्यवरांची मतं. पण अस झेड ब्रीजवर बसणं, मरीन ड्राईव्हला बसणं याबद्दल पोलीस प्रशासनाला काय वाटतयं? आम्ही डिपार्टमेंटमधल्या काही चांगल्या लोकांना विचारलं तेव्हा ते म्हणाले कसय समोर कोणता पोलीस आहे आणि कोणती जागा आहे यावर अनेक गोष्टी घडत असतात. समजा एखादा पोलीस वडिलकिच्या भूमिकेतून समजावून सांगतो. एखादा असलाच चुकीचा तर तो कुठे फोटो काढ, कुठे घरात फोन लावण्याची धमकी दे असले उद्योग देखील करु शकतो..

शिवाय कुठे बसलात यावर पण अनेक गोष्टी अवलंबून असतात. एकांत हवा म्हणून अनेक कपल्स कुठेतरी शेतात, डोंगरात जातात. अशा ठिकाणी संबंधितांवर बलात्कार, खून, लुटालूटीसारखे गंभीर गुन्हे पण अनेकदा घडलेले दिसून येतात.

त्यांच्या सुरक्षेसाठीच आम्ही बऱ्याचदा अशा ठिकाणावरून त्यांना घालवतो.

जर काही चुकीचं करत असतील, तर समज देतो. पण आम्ही फक्त कपल्सलाच नाही, तर उशिरापर्यंत किंवा निर्जन स्थळी थांबलेल्या कुणालाही जायला सांगतोच. कारण सामाजिक सुरक्षा राखणं आमचं काम असतं.

आत्ता या व्हिडीओतून तुम्हाला काय कळालं तर मोरल पोलिसींग केलं जातं पण कोर्टात बऱ्याचदा यावर आक्षेप घेतला जातो. दूसरी गोष्ट अश्लिलता म्हणजे काय हे आपल्या भौगोलिक सांस्कृतिक विविधतेवर ठरते, तिसरी गोष्ट म्हणजे डोंगर कपाऱ्यात प्रायव्हसी शोधणं हे कधीच सेफ असू शकत नाही. आणि मोरल पोलिसींग होत असेल तर कायदेशीर रित्या तुम्ही अडकत नाही पण घरादारात, पै पाहूण्यात मात्र बाजार उठतोच.. जसा आमच्या रम्याचा बाजार उठला तसाच..

तरीपण एवढं ऐकूनही तुम्ही झेड ब्रिज, पाषाण लेक किंवा बँडस्टॅन्डला बसणारच असाल, तर बसा फक्त जरा जपून. कसंय प्रेम ही लय भारी गोष्ट ए, ती उन्हातान्हात ओढणी डोक्यावर घेऊन, ट्रॅफिकचा आवाज किंवा नाल्याचा वास सहन करुन व्यक्त नाही केली तरी चालतंय. दुसरे पर्याय लय आहेत की.

बाकी आम्ही कधी अशा ठिकाणी गप्पा मारताना वैगरे दिसणार नाहीच, पण दिसलो तर ओळख तेवढी दाखवू नका.

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.