नाशिकच्या एकूण आयकरापैकी २५ टक्के आयकर एकट्या उंट छाप बिडीचा होता.. 

बिडी म्हणल्यावर जून्या लोकांनी लय नावं आठवतील. उंट छाप, गाय छाप, कोंबडा छाप, वासरू छाप अशा अनेक नावाने भारतात बिड्या होत्या. यातील बहुतांश नाशिकच्या सिन्नर भागातल्या. या बिडीच्या धंद्यातलं सर्वात मोठ्ठ नाव होतं ते उंट छाप बिडीचं.

१९९० साली उंट छाप बिडी एक दिवसाला एक कोटी बिडीचं उत्पादन करत होती. सिन्नरच्या विडी कारखानादारांपैकी सर्वांधिक आयकर देणारा ब्रॅण्ड म्हणून त्यांची ओळख होती. उंट छाप बिडी एका वर्षात नाशिक परिसरातून जितका आयकर गोळा होत होत्या त्यापैकी २५ टक्के आयकर एकटी भरायची. अस सांगितलं जातं की १९३० च्या काळात त्यांच्या कंपनीत १६,००० महिला काम करायच्या…. 

उंट छाप बिडीची ही माहितीच अगाध अशी आहे. महाराष्ट्राच्या मातीतून पुढे येत अगदी इंग्लड, स्विझर्लड पर्यन्त या बिडीचं कौतुक झालं… 

पण बिडीची ही सुरूवात झाली तर कशी… 

बिडीच्या सुरवातीचे अनेक वेगवेगळे दाखले दिले जातात. मात्र बिडीचा कोणीही संशोधक नाही ही गोष्ट नक्की. सुरवातीच्या काळात हुक्का होता. हा हुक्का प्रवासात वापरता येत नव्हता. शिवाय हुक्का पेटवण्यासाठी अनेक गोष्टींचा झांगडगुत्ता करावा लागत. त्याला पर्याय म्हणून चिलीम आली. चिलीम ला देखील मर्यादा होत्या.

चिलिम भरायची म्हणलं तर पुन्हा त्रास आला. अशा वेळी गुजरातच्या भागातून बिडीची संकल्पना पुढे आली. मिळेल त्या पानात तंबाखु वळायची आणि पेटवायची अशी ही पद्धत. पुढे गुजराती लोक मुंबईत आले आणि मुंबईत देखील विडीचे प्रस्थ वाढू लागले. १९०० च्या काळात फक्त मुंबईत असणाऱ्या गुजराती लोकांमध्येच हे विडीचं प्रमाण होतं. 

त्यानंतर विडी अथवा बिडी नाशिक परिसरात पोहचली. सिन्नरजवळच्या डुबेरे गावाच्या बाळाजी वाजे यांनी मुंबईची ही बिडी पहिल्यांदा नाशिकमध्ये आणली. १९०६ साली बिडीचा पहिला कारखाना या भागात सुरू झाला. त्यांच पाहून १९१० साली येवल्याच्या भिकुसा क्षत्रिय यांनी या व्यवसायात पदार्पण केलं. 

१९२२ साली बस्तीराम सारडा यांनी देखील आपल्या कांदा आणि लसणाच्या दलालीसोबत बिडीचा व्यवसाय सुरू केला… 

बिडीला सातासमुद्रापार घेवून जाण्याचं श्रेय जातं ते याच सारडा कुटूंबाला.

बस्तिराम सारडा व त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र किसनलाल सारडा यांनी हा व्यवसाय वाढवला. किसनलाल सारडा यांना लोक मिस्टर बिडी नावानेच ओळखतात. 

सारडा यांनी त्या काळात किंगफिशरच्या कॅलेंडरप्रमाणे विडीकामगार महिलांचे कॅलेंडर प्रसिद्ध केले. पण हे किंगफिशरसारखे अश्लिल नव्हते तर विडीकामगार महिलांच्या कामांच कर्तृत्व दाखवण्याचा हा मार्ग होता. किसनलाल सारडा यांनी आपल्या बिडीचे व्हॅनिला, बनाना, स्ट्रॉबेरी असे वेगवेगळे सहा फ्लेवर त्या काळात आणले होते.

विडीच्या उद्योगात ब्रॅडिंग कधी आलं… 

सुरवातीच्या काळात विडी उद्योग आणि ब्रॅण्ड हे समीकरण नव्हतं. पण विडीचा उद्योग यशस्वी झाला, स्पर्धा वाढली आणि स्वतंत्र ओळखिची गरज भासू लागली. सारडा यांनी उंट छाप नाव रजिस्टर करुन घेतले. चांडक यांनी कोंबडा छाप तर चोथव्यांनी गाय तर निंबाळकरांनी बासरू छाप सुरू केला. पुढे वाजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर केला. लोकभावना समजून हे नाव पुढे टाळलं गेलं.. 

आत्ता उंट छाप बिडीचे हे मालक कसे होते…? 

राजस्थानमधून आलेले सारडा कुटूंब दोनशे वर्षांपासून महाराष्ट्राच्या मातीत रुळले. इतकं की त्यांची डुबेर गावाची कुलदेवता देखील आपली करुन घेतली. किसनलाल सारडा हे अखिल भारतीय विडी उद्योग महासंघाचे उध्यक्ष होते. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे देखील ते अध्यक्ष राहिले. 

त्यांच्या सामाजिक बांधिलकीचा एक किस्सा सांगायचं झाला तर तो हमीद दलवाई यांच्याबाबत सांगावा लागतो, 

हमीद दलवाई मुस्लीम समाजात सुधारणा घडवून आणण्यासाठी आग्रही होते. आचार्य अत्रेंच्या मराठा मध्ये नोकरी करत करत ते राज्यभर फिरून ही जबाबदारी पार पाडत. साहजिक त्यांच्या कामासाठी पैसे अपुरे पडत. अशा वेळी सारडा यांनी दलवाईंना महिना पाचशे रुपये पगार देण्याची तरतुद केली. कोणत्याही कामाविना मोबदला देण्याची ही पद्धत. पुढे यशवंतराव चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करुन  त्यांना रेल्वेच्या वर्ग एकचा आजीवन मोफत पास देण्यात आला. २० ऑगस्ट १९६९ साली सारडा व यशवंतराव चव्हाण यांच्या पत्रातून ही गोष्ट समजली. सारडा यांनी आपल्या परोपकारांची कुठेही वाच्यता केली नव्हती. 

स्वत:च्या पैशातून बी.एन.सारडा या विद्यालयाची इमारत बांधून पुर्ण केली. वारकरी समाजासाठी धर्मशाळा बांधण्यापासून ते समाजातील वेगवेगळ्या व्यक्तींच्या पाठीमागे उभा राहण्यासाठी उंट छाप बिडीने कामगिरी फत्ते केली.. 

या गोष्टी तर महत्वाच्या आहेतच शिवाय एखाद्या गावातून एक ब्रॅण्ड उभा राहणं. तब्बल २० हजार महिलांना काम मिळणं व कामगारांना हक्काचं काम मिळणं या गोष्टी देखील तितक्याचं महत्वाच्या वाटतात. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.