उत्तरप्रदेशात ऑक्सिजन मागणाऱ्या हॉस्पिटलवरच योगीजी FIR दाखल करत आहेत
दूध मांगोगे तो खीर देंगे, काश्मिर मांगोगे तो चीर देंगे….
भारतात पाकिस्तानला उद्देशून हे वाक्य कायमचं वापरलं जातं. पाकिस्तानला काश्मिरकडे बघायचं पण नाही असा इशारा यात आहे. पण सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये उत्तरप्रदेशमध्ये या वाक्यात थोडासा बदल झालेला दिसतो. तो असा कि,
दूध मांगोगे तो खीर देंगे, ऑक्सिजन मांगोगे तो FIR कर देंगे….
उत्तरप्रदेशच्या सद्यस्थितीचे वर्णन करण्यासाठी हे वाक्य अगदी तंतोतंत लागू आहे. कारण ऑक्सिजनच्या संदर्भातून गुन्हा दाखल झाल्याची सलग तिसरी बातमी येऊन धडकत आहे. आता एका बाजूला राज्यात गाईंच्यासाठी आरोग्यासाठी मदत कक्ष सुरु करण्याचे आदेश दिले जात आहेत तर दुसऱ्या बाजूला कोरोनामध्ये मदत मागणाऱ्या हॉस्पिटल विरोधातच गुन्हा दाखल केला जात आहे.
बुधवारी रात्री लखनऊ शहरातील एका खाजगी हॉस्पिटल विरोधात ऑक्सिजनच्या कमतरतेची अफवा पसरवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं आहे.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार,
लखनऊ शहरातील गोमती नगर परिसरात एक महिन्यापूर्वी ‘सन हॉस्पिटल’ हे कोरोनासाठी बनवण्यात आलं आहे. साधारण ३ मे रोजी हॉस्पिटल प्रशासनानं एक नोटीस जारी केली. त्यात म्हंटलं होतं की,
आमच्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची कमतरता आहे, त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी दुसरीकडे हलवण्यात यावं.
हॉस्पिटलच्या सांगण्यानुसार, ३ मे रोजी ४५ बेडच्या हॉस्पिटलमध्ये ३८ रुग्ण होते. जे सगळे जण ऑक्सिजन सपोर्टवर होते. तर ६ तारखेला इथं २८ रुग्ण होते, ज्यामधील २० जण ऑक्सिजन सपोर्टवर होते.
मात्र या नोटिशीनंतर विभूती खंड पोलीस ठाण्याचे प्रमुख चंद्रशेखर सिंह यांनी हॉस्पिटलचे संचालक अखिलेश पांडेय यांच्या विरोधात ‘आपत्ती आणि रोगराई व्यवस्थापन अधिनियमाच्या कलमांसोबत भारतीय दंड संहितेमधील विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार,
प्रकरणाचा तपास सुरु आहे, आणि यात जर अन्य लोकांचा सहभाग आढळल्यास त्यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल केला जाईल.
हॉस्पिटल प्रशासनानं ३ मे रोजी सोशल मीडियावर कथित रित्या अफवा पसरवली कि हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची कमतरता आहे. यासोबतच ऑक्सिजन सपोर्टवरील रुग्णांच्या नातेवाईकांना संबंधित रुग्णांना इतर ठिकाणी नेण्यासाठी सांगितलं जात होत.
मात्र त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या पडताळणीत आढळलं की हॉस्पिटलमध्ये त्यावेळी ८ जम्बो ऑक्सिजन सिलेंडर, २ बी-टाइप सिलेंडर आणि कॉन्सेंट्रेटर देखील होते. त्यामध्ये पुरेसा ऑक्सिजन साठा उपलब्ध होता.
लखनऊ प्रशासन आणि सरकारनं ऑक्सिजनच्या कमतरतेविषयी अफवा पसरवू नये असे आदेश असताना देखील हॉस्पिटल प्रशासनानं नोटीस काढली, त्यामुळेच गुन्हा दाखल करण्यात आला आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे.
हॉस्पिटलच्या म्हणण्यानुसार,
अखिलेश पांडेय यांनी या सर्व आरोपांच पूर्णतः खंडन केलं आहे. ते म्हणाले, माझी मागणी आहे कि प्रशासनानं हॉस्पिटलमध्ये येऊन तपास करावा आणि सोबतच रुग्णांच्या नातेवाईकांना देखील विचारावं कि ३ मे रोजी काय झालं होतं. या संपूर्ण बेकायदेशीर कारवाई विरोधात आम्ही न्यायालयात रिट दाखल करणार आहोत.
मुख्य म्हणजे मी हॉस्पिटलचा मॅनेजर आहे आणि पोलिस मला संचालक समजत आहेत.
सोबतच पांडेय म्हणाले कि,
पोलिस उपाधिक्षकांनी माझ्यावर दबाव टाकला होता. या संबंधी माझ्याजवळ उपाधिक्षक साहेबांचा व्हिडीओ देखील आहे, ज्याच्या ऑडिओमध्ये ते माझी मदत करण्याच्या बदल्यात काय काय गोष्टी करता येऊ शकतात ते लिहीत आहेत. आता त्यांनीच माझ्या विरोधात नोटिस काढली आहे. त्यामुळेच मी आता अटकपूर्व जामीन आणि निष्पक्ष तपासाची मागणी करणार आहेत
यानंतर पांडेय म्हणाले की,
हॉस्पिटलला ऑक्सिजनचा बॅकअप देखील ठेवावा लागतो. अनेक वेळा मागणी करून देखील ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत कोणताही आश्वासन मिळालं नव्हतं प्रशासनाकडून तर नकारच यायचा. औषध निरीक्षकांनी मला सांगितलं की, अख्या लखनऊ शहरात ऑक्सिजन उपलब्ध नसताना तुला कुठून देऊ?
त्यामुळेच आम्ही नोटीस काढली, आमची इच्छा होती कि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हॉस्पिटलमध्ये रुग्णांचा जीव जायला नको.
न्यायालय काय म्हणाले होते?
४ मे रोजी मेरठच्या मेडिकल कॉलेजच्या ट्रॉमा सेंटर आयसीयूमध्ये ऑक्सिजन न मिळाल्यामुळे पाच जणांचा मृत्यू झाल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली. यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाने मेरठच्या जिल्हाधिकाऱ्यांना या घटनेच्या पडताळणीचे आदेश दिले होते.
त्याच वेळेस न्यायालय म्हणाले कि,
जर ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणाचा जीव जात असेल तर तो मनुष्यवधाच्या गुन्ह्यांपेक्षा कमी गुन्हा नसणार, आणि जर ही बातमी खरी असेल तर ‘राज्य सरकारच्या सगळीकडे ऑक्सिजन पुरवठा नीट आहे’ या दाव्याच्या एकदम विरुद्ध ही घटना आहे.
त्याच वेळी या सन रुग्णालयात ऑक्सिजन कमतरता असल्यामुळे डॉक्टरांनी रुग्णांना इतर ठिकाणी उपचारासाठी नेण्यास सांगितलं आहे, ही गोष्ट देखील न्यायालयात सांगण्यात आली होती.
यापूर्वी देखील ऑक्सिजनसाठी मदत मागितली म्हणून गुन्हा दाखल झाला होता.
२८ एप्रिल २०२१ रोजी उत्तरप्रदेश मधील शशांक नामक तरुणाने आपल्या आजोबांसाठी ऑक्सिजनची गरज असल्याचं ट्विट केलं होतं. यात त्याने सोनू सूद आणि इतर अनेकांना टॅग केलं होतं. फक्त कोरोना पॉजिटीव्ह आहेत कि नाहीत याचा उल्लेख त्याने या ट्विट मध्ये केला नव्हता.
यानंतर त्याला मदत करण्यासाठी सर्व स्तरातून लोक पुढे आले. यात अगदी केंद्रीय मंत्री आणि अमेठीच्या खासदार स्मृती इराणी यांचा देखील समावेश होता.
मात्र रात्री शशांकच्या आजोबांचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे पुढे आले. त्यामुळे आजोबा कोरोना पॉझिटिव्ह नसताना अशाप्रकारचं ट्विट करुन भीतीचं वातावरण निर्माण केल्याप्रकरणी शशांक विरोधात ऑक्सिजनची कमतरता असल्याची अफवा पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यानंतर न्यायलयाने देखील सोशल मीडिया वर मदत मागितल्यावर कारवाई केली जाऊ नये असे आदेश दिले होते.
हे हि वाच भिडू.
- ऑक्सिजन चेक करण्यासाठी वापरत असलेली ९८ टक्के पल्स ऑक्सिमीटर चीनी आहेत.
- महाराष्ट्रासारखीच परिस्थिती, पण हे राज्य ऑक्सिजनसाठी धडपडत नाही तर निर्यात करत आहे….
- ऑक्सिजन आणि कोरोनाची औषधं सप्लाय करणारा फ्रॉड आहे का हे कसं चेक करायचं ?