छोटी बहूच्या पक्षांतर करण्यामागं लखनऊ कँटचं असलेलं कारण नक्की आहे तरी काय

सध्या उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांचं वादळं सुरु झालायं. प्रचारसभा, बैठका, रॅली, मोठमोठ्या नेत्यांच्या गाठभेठी, उमेदवारांची यादी, तिकीट वाटप या सगळ्यात पक्षांचा नुसता बाजार उठलाय. त्यात पक्षात तिकिटांसाठी नवनवीन उमेदवारांची भरती सुद्धा सुरु आहे. 

आता हे पक्षांतराचं  सत्र काही नवीन नसतयं म्हणा, कारण निवडणुकांच्या टायमाला एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्यांची लाईनच लागलेली असते. त्याच्यामागे बरीच कारण सुद्धा असतात. म्हणजे तिकीट, पाहिजे तोच मतदार संघ, पक्षात महत्वाची जागा, बऱ्याच वर्षांची नाराजी, अशीच बरीचशी…

आता पक्ष फोडणाऱ्या या उमेदवारांच्या येण्या – जाण्याने पक्षाला तोटा तर सहन करावा लागतो, पण पक्षफोड्या हा घरातलाच असेल तर…. असच काहीस घडलंय मुलायम सिंह यादव यांच्या पक्षात आणि घरात.  म्हणजे यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर मुलायम सिंह यादव यांच्या छोट्या सुनबाई अपर्णा यादव यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपात एन्ट्री केलीये.

म्हणजे समाजवादी पक्षाचं असं होऊन बसलंय कि, घर का भेदी लंका ढाए’ …  

आता अपर्णा यादव म्हणजे मुलायम सिंह यांची दुसरी बायको साधना गुप्ता यांचा मुलगा प्रतीक यादव याची बायको. त्यांनी अखिलेश यादव यांच्या काळात उत्तर प्रदेश सरकारला ‘भोकाल मंत्रालय’ हे नाव  दिल होते. अपर्णा यादव या सामाजिक कार्यकर्त्या आहेत सोबतचं त्या हर्ष ही संस्थाही चालवतात.

असं म्हंटल जातंय कि, अपर्णा यादव  पक्षावर लयचं नाराज आहेत, त्यामुळे त्यांनी डायरेक्ट बाहेर पडून भाजपची वाट धरलीये. पण भिडू छोटी बहुच्या या  निर्णयामागे काहीतरी कारण तर असणारचं ना भिऊ

 तर यामागचं कारण म्हणजे लखनऊची कॅन्ट विधानसभेची जागा. या जागेवरून २०१७ च्या निवडणुकीत अपर्णा यादव यांनी सपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती आणि त्यांना ६१ हजारांहून जास्त मतं मिळालेली. या जागेवरून आतापर्यंत निवडणूक लढवणाऱ्या सपा उमेदवारांमध्ये अपर्णा यांना मिळालेली मत ही सगळ्यात जास्त आहेत. पण त्यांचा पराभव झालेला. 

आता यंदाच्या म्हणजे  २०२२ च्या  निवडणुकीत सुद्धा अपर्णा यांनी कँट विधानसभा मतदारसंघातून दावा केला होता. त्यांनी पक्षाला तसं तिकीट सुद्धा मागितलं होत. पण सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी कुटुंबातील कोणालाही उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला आहे. 

आता लखनऊ कँटमधून तिकीट  मिळालं नाही म्हणून छोटी बहू अपर्णा यांनी अमेठीच्या तिलोई सीटला सुद्धा भेट दिली, पण त्यांना आपला राजकीय प्रवास सुरू करण्यासाठी लखनऊ कँटची जागा योग्य वाटली. त्या स्वतः म्हणतात कि, ‘मी गेल्या ५ वर्षांपासून कँटमध्ये वैद्यकीय शिबिरापासून ते अनेक सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यापर्यंत मेहनत घेतेय.’ आता त्यामागे सुद्धा जातीय समीकरण आहे. 

म्हणजे लखनऊ कॅन्ट सीटवर ब्राह्मणांचे वर्चस्व आहे. या जागेवर सुमारे एक लाख ब्राह्मण मतदार आहेत. तर दुसरा नंबर लागतो तो सिंधी-पंजाबी मतदारांचा, ज्यांची लोकसंख्या सुमारे ६५ हजार आहे. त्याचबरोबर मुस्लिम लोकसंख्या २५ हजार, यादव जातीची सुमारे २० हजार आणि ठाकूर जातीची जवळपास १५ हजार मते आहेत. 

आता अपर्णा यांची भाजपमध्ये जाण्यामागचं कारण म्हणजे  त्यांना लखनऊ कॅन्ट ही जागा पाहिजेच आणि ती जागा भाजपचा बालेकिल्ला मानली जाते. २०१७ च्या निवडणुकीत रिटा बहुगुणा जोशी  या जागेवरून भाजपच्या तिकिटावर विजयी झाल्या होत्या. यानंतर पोटनिवडणुकीत भाजपचे सुरेश तिवारी आमदार झाले. याआधी सुरेश तिवारी यांनी या जागेवर तीन वेळा म्हणजे १९९६, २००२ आणि २००७ साली भाजपचा झेंडा फडकावला आहे. २०१२ च्या निवडणुकीत रिटा बहुगुणा काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाल्या होत्या.

आणि राजकीय समीकरणाच्या दृष्टीने ही जागा भाजपसाठी अतिशय महत्वाची आहे. त्यामुळे या जागेवरून भाजपचे अनेक उमेदवार मैदानात उतरलेत. म्हणजे पहिल्या क्रमांकावर स्वत: आमदार सुरेश तिवारी आहेत. याशिवाय रीटा बहुगुणा जोशी आपला मुलगा मयंक जोशी, उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा, कॅबिनेट मंत्री महेंद्र सिंह आणि महापौर संयुक्ता भाटिया आपल्या मुलासाठी दावा करत आहेत.

अपर्णा यादव यांच्याशिवाय अखिलेश यादव यांचे निकटवर्तीय पंडित प्रदीप शर्मा, माजी नगरसेवक राजू गांधी, पवन मनोचा आणि रितेश साहू हे देखील सपाकडून निवडणूक लढवत आहेत. माहितीनुसार, अखिलेश यांनी आपल्या कुटुंबातील कोणालाही तिकीट न देण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे अपर्णा यादव यांना लखनऊ कँटमधून तिकीट मिळणं अवघड झालं होत. त्यामुळे अपर्णा यादव यांनी डायरेक्ट घर बदलण्याचाच निर्णय घेतला. 

आता त्यांच्या भाजप प्रवेशानंतर अपर्णा यादव यांना लखनऊ कॅन्टमधून विधानसभा निवडणूक लढायला मिळणार असं मानलं जातंय. पण त्यासाठी भाजपला आपल्या जुन्या मंडळींना नाराज करायला लागणार, त्यामुळे पुढे जाऊन अजून मोठा गोंधळ पाहायला मिळणार आहे. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.