उत्तर प्रदेशमधील मराठी बोलणारं गाव, इथेही एकेकाळी शनिवार वाडा होता..

उत्तरप्रदेश. भारतातील सर्वात मोठं राज्य. काऊ बेल्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंदी भाषिक पट्ट्याची राजधानी. आजवर देशाला अनेक पंतप्रधान दिलेल्या युपीने देशाच्या राजकारणावर आजही आपली पकड ढिली केलेली नाही. आपल्या हिंदीचा अभिमान असणाऱ्या अभिमान असणाऱ्या युपी मध्ये एक गाव मात्र मराठी आहे.

महाराष्ट्रापासून हजारो किलोमीटर दूर असणाऱ्या या गावाला मराठ्यांचा मोठा इतिहास आहे.

 गावाचं नाव बिठूर उर्फ ब्रम्हावर्त.

कानपुर पासून वीस पंचवीस किलोमीटरवर असलेले हे गाव.

१८१८ साली जेव्हा इंग्रजानी मराठ्यांचा पराभव केला आणि पुणे पडले तेव्हा दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनां पळून जाण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नाही. दौलतराव शिंदे आणि नागपूरकर भोसले  मिळेल म्हणून तो उत्तरेच्या दिशेने निघाले.  इंग्रजानी  बाजूनी चांगलेच घेरले होते. रानोमाळ भटकणारे पेशवे शिंद्यांच्या अशीरगडाजवळ आश्रयाला होते. तिथून नर्मदापार पार करण्याचे त्यांच्या योजना फसल्या.

१ जून १८१८ रोजी दुसऱ्या बाजीराव पेशवे यांनी इंग्रज अधिकारी माल्कम याची भेट घेऊन आपला अखेरचा तह केला. त्यावेळी त्यांच्या सोबत कुटुंब कबिला, बापू गोडबोले बक्षी, हुजुरातीच्या पागा आणि स्वार, बापू गोखले यांच्या निसबतीतील रामचंद्र वेंकटेश, बाळाजीपंत मराठे, भिकाजी जगताप, विंचूरकरांचे दिवाण बाळोबा सालकाढे, ढमढेर्यांचे सरदार श्रीधर बापू दामले यांची पागा यांच्या सहित तब्बल २५०० लोक होते.

इंग्रजानी त्यांना २४ तासांच्या आत शरण येण्यास सांगितले.

३ जून रोजी पेशव्यांना अटक झाली. त्यांना तातडीने महाराष्ट्राबाहेर धाडण्यात आले. बुंदेलखंडात ठिकठिकाणी युद्ध सुरु असल्यामुळे बाजीरावांना राजस्थान मार्गे उत्तरेत नेण्यात आलं. त्यांना कुठे ठेवायचं हा प्रश्न इंग्रजांसमोर होता. बाजीरावांची इच्छा होती की काशीच्या तीर्थ क्षेत्रावर आपली राहणायची व्यवस्था करण्यात यावी पण इंग्रजांनी त्याला नकार दिला.

कंपनी सरकारतर्फे मुंघेर, गोरखपूर हे पर्याय देण्यात आले मात्र तिथल्या गरम हवामानामुळे बाजीरावास ते मान्य झाले नाहीत. ते मथुरा येथे मुक्कामी काही दिवस राहिले. शेवटी गव्हर्नर जनरलच्या निर्णयानुसार गंगेकाठचे बिठूर म्हणजे ब्रह्मावर्त ही जागा बाजीरावास मान्य करावी लागली.

लवकुश यांची जन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रम्हावर्तला उत्तरेत एक तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता आहे. बाजीराव पेशवे आपल्या परिवारासह बिठूरला आले. तिथे त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एका इंग्रज अधिकाऱ्याची नेणूक करण्यात आली. जवळपास साडे तीनशे एकरचा प्रदेश कॅंटोन्मेंट म्हणून जाहीर करून पेशवेना तिथे वसवण्यात आले.

बाजीराव पेशवे यांना इंग्रजांनी वार्षिक ८ लाख रुपये ही मोठी रक्कम पेन्शन म्हणून मंजूर केली.

असं म्हणतात की त्याकाळच्या मानाने ही रक्कम प्रचंड मोठी होती मात्र इंग्रजांनी ती मानूर करण्यामागे त्यांचे एक गणित होतं. यापूर्वी कारण पेशवे घराण्यातले पुरुष या आधी फार जगले नव्हते. इंग्रजांना वाटले दुसरा बाजीराव देखील फार काळ जगणार नाही पण इंग्रजांची सगळी गणिते खोटी ठरवत बाजीराव पेशवे ७६ वर्षे जगले.

20180828 175431 scaled

आयुष्याचा सगळं उत्तरार्ध त्यांनी बिठूर मध्येच व्यतीत केला. या गावात रेल्वे स्टेशन जवळ त्यांच्यासाठी दोन चौकी, दोन मजली वाडा होता. पण पेशव्यांना तो त्यांचा मान-मरातबास साजेसा नाही, लहान आहे असे वाटले. म्हणून त्यांनी एक नवा वाडा बांधला. तो कित्येक एकर जमिनीवर पसरला होता. गालिचे, आरसे, चिनी वस्तू, हस्तिदंत यांनी तो वाडा सजवलेला होता. काचेची सुंदर झुंबरे टांगली होती. पेशव्यांच्या सर्व पूर्वजांची चित्रे भिंतीवर टांगलेली होती.

आपल्या पुण्याच्या वाड्याच्या स्मरणार्थ त्यांनी त्याला ‘शनिवार वाडा’ असच नाव दिले होते.

दुसऱ्या बाजीरावांसह टोपे, मोघे, टाकणीकर, सप्रे, हर्डेकर अशी अनेक मराठी कुटुंबे या बिठूर गावात येऊन वसली. 

सुरवातीच्या काळात इंग्रजांनी त्यांच्यावर करडी नजर ठेवली होती. मात्र दुसऱ्या बाजीरावांच्या कडून कोणतीही विद्रोहात्मक हालचाल न दिसून आल्यामुळे त्यांच्यावरील पाहारा कमी करण्यात आला. एवढंच नाही तर आसपासच्या गावाचा कारभार देखील त्यांच्याकडे सोपवला.

बाजीराव पेशवे यांनी या भागात अनेक मंदिरे बांधली. गंगाकिनारी सुंदर घाट उभारले. त्यांनी तिथे चांगलेच ऐश्वर्य उपभोगले. इंग्रजांच्या तनख्याचा पैसा असाच खर्च करून टाकला. मात्र त्यांना एकच दुःख होते की हा वारसा चालवण्यासाठी पुत्र नाही. मुलगाच व्हावा म्हणून दुसऱ्या बाजीरावानी तब्बल ११ लग्ने केली. त्यांना दोन मुली होत्या.

अखेर त्यांनी एका मुलाला दत्तक घेतले, त्याच नाव नानासाहेब    

दुसऱ्या बाजीराव पेशव्यानां काहीही झाले तरी बिठूर सोडण्यास इंग्रजांची परवानगी नव्हती. नानासाहेबांच्या मुंजीचे आमंत्रणे देखील पाठवू नाहीत. पेशवे होळकर शिंदे एकत्र येऊन आपल्या विरुद्ध कट करू नयेत हा यामागचा उद्देश होता.

दुसरे बाजीराव पेशवे बिठूर मध्येच वारले. त्यांची समाधी तिथल्या घाटावरच उभारण्यात आली आहे. त्यांनी कधी इंग्रजांच्या विरुद्ध बंड केला नाही. मात्र या बिठूरच्या मातीतच भारतातल्या सर्वात मोठ्या स्वातंत्र्य उठावाची बीजे रोवण्यात आली.

हेच ते १८५७ चे बंड. 

बाजीराव पेशव्याचे दत्तक पुत्र नानासाहेब पेशवे यांना इंग्रजानी पेशव्यानां मंजूर केलेली पेन्शन देण्यास नकार दिला. तेव्हा त्यांनी त्यांच्या विरुद्ध बंड पुकारायच ठरवलं. संपूर्ण भारतात या ना त्या कारणाने कंपनी सरकारविरुद्ध असंतोष होता. वेगवेगळ्या संस्थांनचे राजे एकत्र आले. त्यांनी बिठूर मध्ये  उठावास सुरवात केली.

यात सर्वात आघाडीवर होत्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई. त्या मूळच्या मणिकर्णिका तांबे. त्यांचे वडील बिठूर येथे पेशव्यांच्या दरबारातील मानकरी होते. लक्ष्मीबाई वाढल्या बिठूर येथेच. नानासाहेब पेशवे, तात्या टोपे यांच्या समवेतच त्यांचं बालपण गेलं. इंग्रजांच्या विरोधात ते एकत्र लढले. १८५७ चा उठाव त्यांना जिंकता आला नाही. पण बिठूरच्या या सुपुत्रांनी आपल्या मातीचा वारसा जरूर जपला.

मधल्या काळात इंग्रजांनी नानासाहेब पेशव्यांवर १८५७ चा सूड म्हणून बिठूर येथील त्यांचे सगळे वाडे आणि मंदिरे पाडून टाकली. फक्त शनिवार वाड्यातील ७ विहिरी मात्र खजिन्याच्या अफवेमुळे वाचल्या.

आजही बिठूर आणि कानपुर परिसरात दोन हजारच्या वर मराठी कुटुंबे राहतात. यापैकी कित्येकांच्याकडे इथल्या जमिनी आहेत. गेल्या अनेक पिढ्या ते उत्तरप्रदेशला आपले कर्मस्थळ मानून राहत आहेत पण तिथे जाऊनही आपली मराठी संस्कृती ते विसरलेले नाहीत.

आजही तिथल्या अनेक घरांमध्ये मराठी बोललेली पाहावयास मिळते. कानपुर शहरातच जवळपास २० हजार मराठी माणसे राहतात. तिथे गणेशोत्सव मोठ्या धडाक्यात साजरा केला जातो.

31 12 2018 nana rao 18806760

काही वर्षांपूर्वी कानपुर येथे १८५७च्या आठवणींमध्ये नाना राव पार्क उभारण्यात आले आहे. या पार्कमध्ये नानासाहेब पेशवे, झाशीची राणी लक्ष्मी बाई, तात्या टोपे अशा अनेक पराक्रमी वीरांचे पुतळे उभे आहेत. कानपुर-बिठूर  परिसरात आजही मराठ्यांच्या गाथा आजही सांगितल्या जातात.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.