सी व्होटर सर्व्हे म्हणतोय उत्तरप्रदेश मध्ये योगीच उपयोगी !

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ च्या रणधुमाळीला सुरूवात झालीय. निवडणूक जाहीर होण्यासाठी अवघे काही महिने उरले असताना ‘एबीपी न्यूज चॅनल’ आणि ‘सी वोटर’कडून संयुक्तपणे नागरिकांचा कल जाणून घेण्यासाठी नुकताच एक सर्व्हे करण्यात आला.

या सर्व्हेत समोर आलंय की सत्तेत पुन्हा योगी आदित्यनाथचं येतील.

काय म्हणतोय सी वोटर सर्व्हे

एबीपी सी-व्होटर्सच्या २३ डिसेंबपर्यंतच्या सर्वेक्षणामध्ये ४८ टक्के लोकांनी भाजपा पुन्हा एकदा सत्तेत येईल असं मत व्यक्त केलंय. तर ३१ टक्के लोकांनी यंदा समाजवादी पक्ष राज्यातील सत्ता काबीज करेल असं मत व्यक्त केलंय. बसपाच्या मायावती पुन्हा राज्यामध्ये सत्तेत येतील असं मत ७ टक्के लोकांनी व्यक्त केलंय. ६ टक्के लोकांनी काँग्रेस तर दोन टक्के लोकांनी विधानसभेचा निकाल लागल्यानंतर त्रिशंकु परिस्थिती निर्माण होईल अशी शक्यता व्यक्त केली आहे.

एबीपी सी-व्होटर्सच्या १६ डिसेंबरच्या सर्वेक्षणामध्ये भाजपाच्या बाजूने मत नोंदवणाऱ्यांची टक्केवारी ४७ इतकी होती. एका आठवड्यात ही टक्केवारी एका टक्क्यांनी वाढली. तर दुसरीकडे मागील आठवड्यात अखिलेश यादव यांचा पक्ष यंदा बाजी मारेल असं मत असणाऱ्यांची संख्या कायम राहिली आहे. म्हणजेच अखिलेश यादव यांच्या प्रचारामुळे उत्तर प्रदेशमधील जनतेचं फारसं मतपरिवर्तन होताना दिसत नसल्याचं आकडेवारी सांगतेय.

बसपा आणि काँग्रेसला या निवडणुकीमध्ये तोटा होईल असा अंदाज या सर्वेक्षणातून समोर आलाय. १६ डिसेंबर रोजी आठ टक्के लोकांनी बसपाच्या बाजूने मत नोंदवलेलं. मात्र एका आठवड्यामध्येच ही आकडेवारी एका टक्क्यांनी खाली आलीय.

त्याचप्रमाणे राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याबाजूने उत्तर प्रदेशची जनता मत देताना दिसत नाहीय. काँग्रेस जिंकेल असं केवळ सहा टक्के लोकांच म्हणणं आहे.

कृषी कायदे मागे घेतल्याचा काही परिणाम दिसेल का ?

तर भाजपाने तिन्ही कृषी कायदे मागे घेतल्याने हा मुद्दा निवडणुकीमध्ये फारसा प्रभावी ठरणार नसल्याचं दिसत आहे. १४ डिसेंबर, १६ डिसेंबर आणि २० डिसेंबरच्या सर्वेक्षणामध्ये शेतकरी आंदोलनासंदर्भातील प्रश्न महत्वाचे ठरतील का यावर २५ टक्के लोकांनी पॉजीटिव्ह रिस्पॉन्स दिलाय. आता ही संख्या एका टक्क्याने कमी झाली असून २४ टक्के लोकांना हा महत्वाचा मुद्दा वाटतोय.

मतांच ध्रुवीकरण हा निवडणूकीतील मुद्दा असू शकतो काय?

यावर १४ डिसेंबर रोजी १६ टक्के लोकांनी होकारार्थी मत नोंदवलेलं. आता यामध्ये एक टक्क्यांनी वाढ झाली असून १७ टक्के लोकांनी हा मुद्दा महत्वाचा ठरेल असं मत व्यक्त केलंय. तसेच करोना हा सुद्धा या निवडणूकीमध्ये महत्वाचा मुद्दा ठरु शकतो असं अनेकांनी म्हटलंय. कायदा सुव्यवस्था हा महत्वाचा मुद्दा असेल असं मानणाऱ्यांची संख्या दोन टक्क्यांनी वाढलीय.

हे सर्व्हेच झालं पण समाजवादी पक्षाकडून मतदारांचं मन वळवण्याचे प्रयत्नही सध्या अपयशी होण्याची चिन्हं आहेत. बहुजन समाज पार्टी आणि काँग्रेसही या निवडणुकीमध्ये फार चांगली कामगिरी करण्याची शक्यता कमीच असल्याचं या सर्वेक्षणाच्या अहवालात म्हटलं आहे. मागील दहा दिवसांमध्ये राज्यामधील जनतेचं मत जाणून घेत हा सर्वेक्षण अहवाल तयार करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.

मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून योगी आदित्यनाथ यांनाच पसंती

मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून योगी आदित्यनाथ यांची कामगिरी नागरिकांना समाधानकारक वाटतेय. जवळपास ४१ टक्के नागरिकांनी योगी आदित्यनाथ यांना आगामी निवडणुकीतही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पसंती दिलीय. सपा प्रमुख अखिलेश यादव यांना मुख्यमंत्रीपदी पाहण्याची इच्छा जवळपास ३१ टक्के लोकांनी व्यक्त केलीय. तर बसपा अध्यक्ष मायावती यांना १७ टक्के नागरिकांनी मुख्यमंत्रीपदासाठी पसंती दिलीय.

उत्तर प्रदेश विधान सभा निवडणुकीत विजयासाठी असलेली मॅजिक फिगर २०२ आहे. निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेला जो पक्ष किंवा आघाडी या आकड्यापर्यंत किंवा त्याच्या पुढे पोहोचेल, त्यांचाच विजय होईल.

२०१७ च्या निवडणुकीचा विचार करता भाजपनं ३१२ मतदारसंघात विजय मिळवत मोठं यश मिळवलं होतं. ४०३ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपनं ३९.६७ टक्के मतं मिळवली होती. समाजवादी पार्टीनं ४७ तर बहुजन समाज पार्टीनं १९ जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेसला केवळ ७ जागा जिंकता आल्या होत्या. 

या निवडणुकीत वेगळे मुद्दे काय ? 

तर या निवडणुकीत गेल्या निवडणुकीपेक्षा सर्वात वेगळी बाब म्हणजे योगी आदित्यनाथ. २०१७ मध्ये जेव्हा भाजप प्रचारात उतरलं होतं तेव्हा राज्यात मुख्यमंत्रापदासाठी त्यांच्याकडे चेहरा नव्हता. मात्र यावेळी योगी आदित्यनाथ यांचा चेहरा आहे. 

दुसरीकडे समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी स्वतंत्र लढणार हे जवळपास निश्चित आहे. गेल्या वेळीही हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले होते. मात्र २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र आले होते.

गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यांची आघाडी होती. मात्र यावेळी ते कठीण वाटत आहे. यावेळी उत्तर प्रदेशात प्रियंका गांधी काँग्रेसचा चेहरा आहेत. तसंच असदुद्दीन ओवैसीही मैदानात आहेत

लोकसंख्येचा विचार करता उत्तर प्रदेश हे देशातील सर्वांत मोठं राज्य आहेच, मात्र त्याचबरोबर राजकीयदृष्ट्यादेखील हे सर्वात महत्त्वाचं राज्य आहे. त्यामुळे इथली निवडणूक रंगतदार ठरणार हे मात्र निश्चित.

हे हि वाच भिडू 

WebTitle : UP Election 2022 : As per ABP C voter opinion survey BJP will be in leading in UP

Leave A Reply

Your email address will not be published.