म्हणून योगींच्या विजयात ‘बुलडोझर’ चा रोल जास्त महत्वाचा आहे

देशातल्या राजकीय निवडणुकांचा इतिहास पाहिला तर लक्षात येईल की,  प्रत्येक निवडणुका काही ना काही तरी रंजक आठवणी सोडून जातात. आताचं बोलायचं तर ५ राज्यांच्या निवडणूका पार पडल्या आणि निकाल लागला. 

उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर, उत्तराखंड या राज्यांपैकी गोवा सोडलं तर इतर ४ राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष विजयी ठरलाय. पंजाबने आप ने हवा केली अन सगळ्यात राज्यात काँग्रेसचा तर सर्वच राज्यात सुफडा साफ झाला. असो या निकालांच्या चर्चेमध्ये युपीच्या निकालाबाबतच्या काही गोष्टीवर चर्चा करू. 

युपीत सलग दुसऱ्यांदा योगी जिंकून आलेत. त्यांच्या विजयामुळे २ विषय चर्चेत आले. एक म्हणजे, दुसऱ्यांदा निवडून आलेले योगी आदित्यनाथ हे २०२४ मध्ये पंतप्रधान पदाचे दावेदार असू शकतात आणि दुसरा विषय म्हणजे युपीचे लोकं योगी यांना बुलडोझर बाबा म्हणतायेत. 

पण का ? योगी आदित्यनाथ यांचं बुलडोझरशी काय कनेक्शन आहे ? 

यूपीत अशी चर्चा हे कि, भाजप जिंकून येण्यात या बुलडोझरचा मोठा रोल आहे…

आपल्या देशात एक मात्र आहे, रस्त्यात कुठेही बुलडोझरच काम चालू असलं की, लोकं काम सोडून त्या बुलडोझरला बघत बसतात. 

उत्तर प्रदेश राज्याबद्दल बोलायचं तर या राज्याचा लौकिक असा आहे की, केंद्रात सत्तेवर असलेल्या पक्षाला विधानसभा निवडणुकीत पुन्हा सत्ता मिळत नाही. पण हा ‘नियम’ योगी आदित्यनाथ यांनी मोडून दाखवला. योगी यांनी ३७ वर्षानंतर इतिहास घडविला आहे. सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पद मिळविलं. आणि याच विजयाचं सेलिब्रेशन करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी बुलडोझर रॅली काढली.

युपीची राजधानी लखनौ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संसदीय जिल्हा वाराणसी आणि योगींचा स्वतःचा मतदारसंघ गोरखपूरसह राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या विजयी बुलडोझर रॅली काढल्यात. योगींच्या समर्थकांनी  ‘बुलडोझर बाबा झिंदाबाद’, “गूंज रहा है एक ही नाम बुलडोजर बाबा जय श्री राम’ च्या घोषणा देत मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. 

तर भाजपचे कट्टर समर्थक सुमंत कश्यप यांनी विजयाच्या आनंदात डोक्यावर खेळण्यातला बुलडोझर फिरवल्याचा व्हिडीओ देखील व्हायरल होतोय. 

 

पण योगी यांना बुलडोझर बाबा म्हणत आहेत ? खरं तर योगी यांना बुलडोझर बाबा हे नाव भाजपच्या कार्यकर्त्यांनी नाही दिलं. तर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी योगींना चिडवत चिडवत हे नाव दिलेलं. निवडणुकांच्या रॅलींमध्ये अखिलेश यादव यांनी सीएम योगींवर टीका करत त्यांना बुलडोजर बाबा म्हंटल होतं. पण अखिलेश यांच्या टीकेचा परिणाम नेमका उलटा झाला..योगींनी आणि भाजपने अखिलेश यादव यांचं चिडवणं सकारात्मक पद्धतीने घेतलं. 

याच टीकेचा फायदा घेत भाजपने जनतेचा मनात बुलडोझरचं एक पॉझिटिव्ह पर्सेप्शसन क्रिएट केलं कि, 

योगींचा बुलडोझर हा घराणेशाहीचा, माफियांचा, युपीच्या गुंडाराजचा नाश करणारा आहे.  दुर्जनांच्या बीमोडाचे प्रतीक म्हणजे हे बुलडोझर, असा दावा योगी आणि त्यांच्या समर्थकांकडून केला जात असायचा. आणि त्यानंतर योगींच्या प्रत्येक प्रचार सभेत बुलडोझर दिसू लागले. सभेत जमलेल्या गर्दीच्या नजरा मंडपाच्या बाहेर लावलेल्या बुलडोझरवर जात असायच्या. योगी देखील आपल्या भाषणात बुलडोझरचा वारंवार उल्लेख करायचे. 

ते म्हणत की,बुलडोझरचा वापर जसा एक्स्प्रेसवे आणि हायवे बांधण्यासाठी केला जातो. तसाच वापर आम्ही लोकांचे शोषण करणाऱ्या माफियांना चिरडण्यासाठी करणार आहोत”. 

आत्ताच्या निवडणुकांच्या काळातच नाही तर योगींच्या मागच्या कार्यकाळात देखील बुलडोझरचा विषय बराच गाजला होता.  

२०१७ मध्ये सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माफियांच्या अवैध संपत्तीवर बुलडोझर धोरण जाहीर केले होते. योगी यांनी ‘अँटी लँड माफिया टास्क फोर्सची’ स्थापना केली. या टास्क फोर्सने गेल्या ५ वर्षांत मुख्तार अन्सारी, अतीक अहमद, विजय मिश्रा, कुंटू सिंग या सर्व माफियांच्या,बाहुबली नेत्यांच्या मालमत्तांवर सरकारी बुलडोझर फिरवला होता. सुमारे दोन हजार कोटींची बेकायदेशीर मालमत्ता, तसंच ६७ हजार एकर पेक्षाही जास्त सरकारी जमिनींवरील अतिक्रमणे पाडण्यात आली होती. त्यामुळे योगी सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात राज्यात कायद्याचे राज्य असल्याचा विश्वास जनतेमध्ये निर्माण झाला आहे. 

“आता दुसऱ्यांदा निवडून आलोत आणि पुढच्या सरकारमध्ये देखील बुलडोझर चालतच राहतील”, असे भाजपने ठणकावून सांगितले. 

तसं तर बऱ्याच काळापासून यूपीतला कायदा आणि सुव्यवस्था हा मोठा मुद्दा राहिला आहे. पूर्वीच्या सरकारांमध्ये जनता, व्यापारी आणि अधिकारी माफियांच्या गुंडगिरीने त्रस्त होते. अशा परिस्थितीत या निवडणुकीत बुलडोझर ही भाजपसाठी लिटमस टेस्ट होती.  

आत्ताचे निकाल पाहता,  भाजपच्या बुलडोझर धोरणाला जनतेचा पाठिंबाच मिळाला असं दिसून येतंय.

ज्या बुलडोझरला विरोधकांनी भाजपच्या राजवटीच्या अपयशाचे प्रतीक म्हणून समोर केले होते, त्याच बुलडोझरने भाजपला जिंकून आणलं आणि म्हणूनच भाजपचे कार्यकर्ते आता विरोधकांच्या नाकावर टिच्चून बुलडोझरवर भगवे झेंडे लावून रॅली काढत आहेत….

सुरुवातीला जसं कि म्हणलं कि प्रत्येक निवडणूका काही ना काही इंटरेस्टिंग स्टोरी जन्माला घालतात, तशीच हि बुलडोझर बाबांची स्टोरी. 

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.