योगींचा मतदार संघ मिळवण्यासाठी अखिलेश यादव या ‘बाहुबलीच्या’ चमत्काराची वाट बघतायेत.
निवडणूक जवळ आल्या कि, पक्षांमधील नेत्यांची पक्षांतर सामान्य गोष्ट आहे. निवडणुकीच्या ऐन हंगामात आणखी एक अशीच बातमी आली ती म्हणजे थेट यूपीमधून….निवडणूक म्हणलं कि, युपीच्या निवडणूक खास चर्चेचा विषय असतो. असो बसपाचे ‘बाहुबली’ नेते म्हणून ओळख असणारे हरिशंकर तिवारी हे त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे..
बाहुबली नेते हरिशंकर तिवारी यांचा मुलगा आणि आमदार विनय शंकर तिवारी, दुसरा मुलगा आणि माजी खासदार कुशल तिवारी आणि त्यांचा पुतण्या गणेश शंकर पांडे यांनी मायावती यांच्या बसपाला सोडचिठ्ठी दिली आणि सपामध्ये प्रवेश केला. सपासाठी हा पक्षप्रवेश एखाद्या सणापेक्षा कमी नव्हता. पण या प्रवेशामुळे मात्र भाजपला चांगलाच मोठा धक्का बसणार आहे, कारण तिवारी यांच्यासह त्यांना असणारी ब्राम्हण मते देखील ते सपामध्ये घेऊन जातायेत हे नक्की !
आणखी एक म्हणजे या ‘बाहुबली’ चेहऱ्याच्या जोरावर अखिलेश लखनऊचे सिंहासन हे तितकेच खरे आहे. असो बघू या पक्ष-प्रवेशामुळे काय वेगळा चमत्कार घडू शकतो.
उत्तर प्रदेशातील गोरखपूर हे शहर आहे ज्याचे एक वैशिष्ट्य यूपीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी लक्षात घेतले जाते. ते म्हणजे हरिशंकर तिवारी ! हे शहर गेले ४५ वर्षे झाले, हे शहर या बाहुबली नेत्याच्या नावाने ओळखले जाते. ज्या लोकांना यूपीचे राजकारण आणि त्याचा इतिहास समजला माहितीये, त्यांना पूर्वांचलचे बाहुबली नेते हरिशंकर तिवारी यांचे नाव माहित नाही हे अशक्यच असते.
असं म्हणलं जातं कि, या बाहुबलीने दिलेला हुकूम नाकारण्याचे धाडस ना सावकारात होते ना सरकारी नोकरांमध्ये होते. पण २०१७ साल येताच यूपीच्या गादीवर योगीजीं बसले आणि तेंव्हापासून या बाहुबलीची वजन काहीसे प्रमाणात कमी झाले होते. एकेकाळी आपल्या एका फोनद्वारे प्रत्येक काळे कामं एका मिनिटांत करवून घेणाऱ्या बाहुबलीच्या तोंडून २०१७ पासून एक शब्दही बाहेर पडत नाही.
७० च्या दशकात गोरखपूर विद्यापीठातून विद्यार्थी नेता म्हणून पुढे आलेली या व्यक्तीने संपूर्ण पूर्वांचलमध्ये कधी दबदबा निर्माण केला, हे तिथल्या लोकांना कळलेही नाही. गेल्या काही वर्षांत अनेक नेत्यांनी तुरुंगात असतानाही निवडणुका जिंकल्या आहेत. पण सुमारे ३६ वर्षांपूर्वी म्हणजे १९८५ मध्ये तुरुंगाच्या आत राहून या नेत्याने एका अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक जिंकली होती, कदाचित यूपीच्या राजकारणात असं पहिल्यांदाच घडलं होतं.
त्यानंतर गोरखपूरची चिल्लुपार जागा अचानक चर्चेत आली, कारण पहिल्यांदाच एका अपक्ष उमेदवाराने तुरुंगात असताना निवडणूक जिंकली. हरिशंकर तिवारी यांचा हा पहिलाच विजय होता, त्यानंतर पूर्वांचलमध्ये तिवारी हे एक राजकीय ताकदीचे नेते बनत गेले.
खरं तर हरिशंकर तिवारी हे विद्यार्थीदशेतच राजकारणात आले होते. त्यांचे एक मोठे राजकीय विरोधक म्हणजे वीरेंद्र प्रताप शाही हे देखील विद्यार्थीदशेतच राजकारणात सक्रिय होते, ते लक्ष्मीपूरमधून विधानसभेत पोहोचले होते. त्या वेळी राजकीय वर्तुळापासून नोकरशाहीपर्यंत या दोन्ही नेत्यांची ताकद पाहून त्यांना दबंग आमदाराचा दर्जा दिला गेला होता.
या दोन्ही नेत्यांची राजकारणातली वर्चस्वाची लढाई शेवटपर्यंत सुरूच राहिली. हरिशंकर तिवारी यांची पॉवर इतकी होती की ते केवळ सहा वेळा आमदार झाले नाहीत तर१९९७ ते २००७ या काळात ते उत्तर प्रदेश सरकारमध्ये सलग मंत्रीही राहिले आहेत. म्हणजे या दोन दशकात कोणत्याही पक्षाचे सरकार असो त्या सरकारमध्ये ते मंत्री असायचेच !
सत्ता कुणाचीही असो तिवारी याना मंत्री बनवणे ही जणू प्रत्येक पक्षांची मजबुरीच बनली होती. कदाचित सपा ला देखील सत्तेवर येण्यासाठी या नेत्याची मदत लागणार म्हणून हा सहकुटुंब प्रवेश घडवून आणला आहे.
तुम्ही एक गोष्ट विसरला नसाल तर, योगी आदित्यनाथ यांनी यूपीचे मुख्यमंत्री होताच पहिली घोषणा केली होती की ते या राज्यातून ‘माफिया राज’ पूर्णपणे नष्ट करणार. अर्थातच तिवारी यांच्यासारख्या नेत्यांना योगींच्या सत्तेत गप्प राहण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.
अर्थातच आता या नेत्यांना दुसरा पक्ष शोधणं आणि या नेत्यांच्या जोरावर आपली राजकीय सत्तेची भूक भागवणे असे दुतर्फी राजकारण या निमित्ताने पाहायला मिळतेय.
अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूपीच्या दौऱ्यावर असतांना समाजवादी पक्षाला एक जाहीर टोमणा मारला होता तो म्हणजे, हि रेड कॅप नसून रेड अलर्ट आहे. त्यांना निवडून आणणे म्हणजे, उत्तर प्रदेशातील जनतेचे भवितव्य माफिया नेत्यांच्या हातात देणे. यामागचं कारण म्हणजे, सपाचे नेते आणि कार्यकर्ते फक्त लाल टोप्या घालतात.
आता मोदींच्या जाहीर टोमण्याला योगायोग म्हणा किंव्हा मोदींची दूरदृष्टी म्हणा की ते जे बोलले ते खरे होताना दिसतेय…आता भाजपचं बोलायला गेलं तर त्यांच्याही पक्षात गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नेते आहेतच कि….पक्ष कोणताही असो, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही की निवडणुकीच्या वेळी प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या गरजेनुसार बाहुबली नेत्यांची एंट्री आपल्या पक्षात करवून घेत असतातच..हे आधीही घडत होतं आणि आत्ताही घडतंय.
हरिशंकर तिवारी आता म्हातारे झाले आहेत, पण ते एकेकाळी ते पूर्वांचलमध्ये ब्राह्मणांचा मोठा चेहरा होते आणि आताही असू शकतात. (म्हणजे ते येत्या निवडणुकीत दिसेलच). तिवारी याना घेऊन अखिलेश यादव यांनी पक्षात घेऊन ब्राह्मण मते वळवण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले आहे. पण, गेल्या साडेपाच वर्षांत माफिया राजवटीतून मुक्त झालेल्या उत्तर प्रदेशातील जनता पुन्हा बाहुबली चेहऱ्यांवर विश्वास ठेवणार का, हा मोठा प्रश्न आहे…आणि या प्रश्नाचं उत्तर येत्या निवडणुकीत कळलेच !