काका पुतण्या एकत्र येणार म्हणता म्हणता कहाणी में नवीन ट्विस्ट आलाय

महाराष्ट्राच्या राजकारणात अगदी इतिहासकाळापासून भाऊबंदकीचा वाद आहे. पेशवाईच्या काळात तर काका-पुतण्यातील राजकीय संघर्ष टोकाला गेला. ‘काका, मला वाचवा’ म्हणून पळत येणा-या नारायणराव पेशवाने राघोबादादाला घातलेली हाक आजही राजकारणात दिली जाते.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे-राज ठाकरे, भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे-धनंजय मुंडे, श्रीमंत अभयसिंहराजे भोसले-छ. उदयनराजे भोसले, अनिल देशमुख-आशीष देशमुख या काका-पुतण्यातील राजकीय संघर्ष महाराष्ट्रने पाहिला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील काही काका-पुतणे यांच्यात जसा संघर्ष आहे,

तशी काही जणांमध्ये अजुन तरी एकवाक्यता टिकून आहे. राज्याच्या आणि देशाच्या राजकारणावर आपली अमीट छाप पाडणारे शरद पवार यांनी पुतण्या अजित पवारांना राजकारणात आणले, पण आजवर कितीही कठीण प्रसंग आला तरी उभयतांनी नात्याची लक्ष्मणरेषा ओलांडली नाही.

नाशकात छगन भुजबळ आणि समीर भुजबळ या काका-पुतण्यांचे नातेही असेच घट्ट आहे. दोघांनाही तुरुंगवारी घडली तरी, त्या वेदनेतही आपल्या नात्याची वीण त्यांनी उसवू दिली नाही. लातूरमध्ये स्व.विलासराव देशमुख यांचे पुत्र आ. अमित देशमुख आणि त्यांचे काका दिलीपराव देशमुख यांचेही नाते राजकारण विरहित राहिले आहे. काका-पुतणे दोघेही राजकारणात असले तरी त्यांनी आपल्या नातेसंबंधात राजकारण आडवे येऊ दिलेले नाही.

काका पुतण्याचा वाद फक्त महाराष्ट्रातच आहे असं नाही. उत्तर प्रदेशातसुद्धा हा वाद मोठा आहे. समाजादी पक्षाचे अखिलेश यादव आणि त्यांचे काका शिवपाल यादव  यांच्यातही बऱ्याच दिवसांपासून वाद आहे. पुढच्या वर्षी येऊ घातलेल्या उत्तर प्रदेश निवडणूकांच्या तोंडावर समाजवादी पक्षाच्या दोन्ही गटांनी सुला करावी असं कार्यकर्त्यांच मत आहे. उत्तर प्रदेशातील पुढील वर्षीच्या यूपी विधानसभा निवडणुका २०२२ च्या पार्श्वभूमीवर, राजकीय पटलावर मोहरे ठेवले जाऊ लागले आहेत. सत्तेची मुख्य स्पर्धा योगी आदित्यनाथ आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यात आहे.

अखिलेश यादव व शिवपाल यादव यांच्यातील वादाची सुरुवात केव्हा आणि कोणत्या कारणासाठी  झाली हे आधी जाणून घेऊया…

उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि समाजवादी पक्षाचे बलाढ्य नेते मुलायमसिंग यादव यांचे समर्थन मिळालेले काका शिवपाल यादव यांच्या वादामुळे समाजवादी पक्षात २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

त्याचे कारण त्या निवडणुकीला लोकसभेच्या ८० जागांपैकी ७२ जागी मोदींच्या नेतृत्वातील भाजपला यश मिळाले होते. समाजवादी पक्षाच्या त्या अपयशाला कोण कारणीभूत होते? अत्यंत आत्मविश्वास बाळगणारे मुख्यमंत्री अखिलेश की ७८ वर्षांचे मुलायमसिंग यादव? या प्रश्नामुळेच पक्षातील संघर्ष वाढत गेला.

२०१२ च्या यूपी निवडणुकीत त्यांचा उदय हा एक चमत्कार मानला जात होता, परंतु त्यांचा कार्यकाळ संपल्यावर असे म्हटले गेले की सपा सरकारमध्ये साडेचार मुख्यमंत्री आहेत. मुलायमसिंह यादव, शिवपाल सिंह यादव, राम गोपाल यादव, आझम खान आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे अर्धे.

२०१७ च्या निवडणुकीपूर्वी हे चित्र आणखी स्पष्ट झालं. जेव्हा सपातील यादव घराण्याचा सत्ता संघर्ष चव्हाट्यावर आला. काका, पुतणे आपसात लढले. त्याचा परिणाम असा झाला की भाजपने तीन-चतुर्थांशपेक्षा जास्त जागा जिंकल्या. आणि योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

एवढा मोठा पराभव होऊन सुद्धा शिवपाल आणि अखिलेश यांचा वाद काही मिटला नाही. शिवपालसिंह यादव यांनी सपापासून फारकत घेतली आणि मुलायमसिंह यादव यांच्या आशीर्वादाने मोर्चेबांधणी केली, जे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पुरोगामी समाजवादी पक्षाच्या रुपाने समोर आले. लोकसभा निवडणुकीत पण काका पुतण्यांना दारुण पराभव स्वीकारावा लागला.

पण उत्तर प्रदेश मध्ये २०२२ मध्ये विधानसभा निवडणूक येऊ घातल्या आहेत. तिथल्या जनतेत  अखिलेश आणि शिवपाल यादव यांनी एकत्र आलं पाहिजे असाच सूर उमटत आहे. त्याला कारण सुद्धा असंच आहे.

अखिलेश यादव यूपी पंचायतच्या आज तक च्या कार्यक्रमात निश्चितपणे म्हणाले होते की जसवंतनगरची जागा त्यांच्यासाठी(शिवपाल यादव) सोडण्यात आली आहे.

हे नाकारता येणार नाही की अखिलेश यांना शिवपाल यांची गरज शिवपालांना असलेल्या अखिलेश यांच्या गरजेहून जास्त आहे. समाजवादी पक्षात फाळणी झाल्यानंतर शिवपाल सिंह यादव यांनी अनेक वेळा अखिलेश यादव यांच्यासोबत येण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, अखिलेश यादव यांनी त्याच्याकडे विशेष लक्ष दिले नाही.

अलीकडेच अखिलेश यांनी आम्ही एकत्र निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले होते. सगळ्यांना अपेक्षित होते कि अखिलेश यादव आणि शिवपाल यादव हे एकत्र रॅली काढतील.

परंतु झालं काही वेगळंच .. अखिलेश यांनी त्यांच्या समाजवादी पक्षाची आणि शिवपाल यांनी त्यांच्या पुरोगामी समाजवादी पक्षाच्या एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी पक्षाच्या स्वतंत्र अशा रॅली काढल्या. त्यामुळे अखिलेश यांनी आधी जरी सांगितलं असलं कि आम्ही एकत्र लढणार आहोत तरी सध्या चित्र मात्र वेगळं दिसतंय. निवडणुकांच्या प्रत्यक्ष रणधुमाळीला थोडासा अवकाश जरी असला तरी ह्या काका पुतण्यांचे राजकारण काय वळण घेते हे बघणं महत्वाचं असेल.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.