इतिहास गवाह है. युपीची निवडणूक आली की मोहम्मद अली जिनाच नाव येतंच…!

मोहम्मद अली जिना – भारत कधी विसरणार नाही आणि भविष्यात आपल्या पुढच्या पिढीला विसरू ही देणार नाही असं फाळणी नामक तीव्र दुःख या व्यक्तीने दिलंय.

जिनांविषयीचं प्रेम म्हणाचं का आणखी काही पण खरं सांगायला गेलं ना तर जिनांना मध्ये घेतल्याशिवाय भारतीय राजकारण अपूर्ण वाटायला लागतं. म्हणजे मागच्या दहा एक वर्षात तर जेव्हा केव्हा इलेक्शन  लागतात तेव्हा तेव्हा भारताच्या कुठल्या तरी कोपऱ्यात जिनांविषयीचा वाद उफाळून आलेलाच असतो.

जिना हा शब्दच मुळी कथित मुस्लिम तुष्टीकरण आणि जातीय ध्रुवीकरणासाठी वापरला गेल्याचं दिसतं.

आताच बघा ना उत्तर प्रदेश निवडणुकीची चर्चा जशी का सुरू होते तसतसे पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना पुन्हा चर्चेत येतात. मागच्या आठवड्यात  आठवड्यात यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ट्विट करत म्हणतात, 

ते जीनांचे उपासक आहेत, तर आम्ही सरदार पटेलांचे उपासक आहोत. पाकिस्तान त्यांना प्रिय आहे मात्रआम्ही माँ भारतीसाठी आमच्या प्राणांची आहुती देऊ.

हे कधी घडलं ? तर भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी जेव्हा राज्याच्या राजकारणात जिनांच नाव येता कामा नये, असा इशारा दिला आणि योगीजींचं हे ट्विट आलं. 

राजनाथ सिंह म्हणतात पाकिस्तानचे संस्थापक जिना यांच नाव निवडणुकीदरम्यान का घेतले जाते हे मला माहीत नाही. ही राजकारण करण्यासारखी गोष्ट नाही. त्याऐवजी, आपण शेतकऱ्यांच्या उसाबद्दल बोलल पाहिजे.

राजनाथ सिंह म्हंटले ते बरोबर असलं तरी, मागच्या ७५ वर्षांचा इतिहास बघता, विशेषतः निवडणुकीच्या वेळी जिना भारतीय राजकीय वक्तव्यांमध्ये हमखास आले आहेत. या वक्तव्यांमध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलताना जातीय आधारावर देशाच्या फाळणीसाठी बहुतकरून जिनांन जबाबदार धरले आहे.

आता लांब कशाला मागच्याच वर्षी ३१ ऑक्टोबरला अखिलेश यादवांनी ट्विट केलं होतं की,

सरदार पटेल, राष्ट्रपिता महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू और (मुहम्मद अली) जिन्ना ने एक ही संस्थान में पढ़ाई की और बैरिस्टर बने. उन्होंने (भारत को) आजादी दिलाने में मदद की और कभी किसी संघर्ष से पीछे नहीं हटे.

यावर भाजपचे नॅशनल प्रेसिडेंट जे पी नड्डा यांनी अखिलेश यादवांवर टीका करत पण जिनांच नाव घेता म्हंटल की, यादवांना नेहमी देशाला फाळणीच्या जखमा देणाऱ्या व्यक्तींचीच आठवण  होते मात्र देशाला एकजूट ठेवणाऱ्या सरदार पटेलांना मात्र ते विसरतात. 

यावर २००५ ची घटना सांगता येईल की, जून २००५ मध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते लालकृष्ण आडवाणी हे कराची दौऱ्यावर गेले होते. कराची हे अखंड भारतातल आडवणींचं जन्मगाव. त्यावेळी त्यांनी जिनांच्या समाधीस्थळाला भेट दिली. त्या भेटीत आडवाणी म्हंटले होते की

“great man”

आजअखेर जिनांच्या समाधी स्थळाला भेट देणाऱ्या महत्वाच्या नेत्यांपैकी एक म्हणजे लालकृष्ण आडवाणी. भाजप आणि हिंदुत्वाच समीकरण घट्ट करण्यामध्ये आडवाणी मुख्य होते. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यांनी दिलेलं कॉन्ट्रीब्युशन हे त्या काळात भारतात गृहीत धरलं जात होत. किंबहुना आडवाणींची पॉलिटिकल आयडेंटिटी हिंदुत्ववादी होती. अशा हिंदुत्ववादी नेत्याने त्या समाधीस्थळाच्या रजिस्टरवर जिनांविषयी लिहिलं की, 

जगाच्या इतिहासात अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत, अशी खूप सारे लोक आहेत ज्यांची नावं मिटवता येत नाहीत. अशा काही लोकांमध्ये कायदेआझम मोहम्मद अली जिना होते. ज्यांनी इतिहासात घडवला. सरोजिनी नायडू यांनी जिनांना हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून गौरवलं होतं. ज्यावेळी भारताची फाळणी झाली आणि त्यातून पाकिस्तान हे राष्ट्र जन्माला आलं. त्यावेळी पाकिस्तानच्या पहिल्या संविधान सभेत म्हणजेच ११ ऑगस्ट १९४७ ला जिनांनी एक भाषण केलं. त्यात ते म्हणतात की पाकिस्तान हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र असून या राष्ट्रात प्रत्येक व्यक्तीला आपला धर्म पंथ यांचं पालन करता येईल.

या पाकिस्तानच्या भेटीत आडवणींना विचारण्यात आलं होतं की,

१९४७ ला जिनांविरुद्धच्या हत्येचा कट रचल्याच्या खटल्यात तुमचं आरोपी म्हणून नाव देण्यात आलं होतं, त्यावर तुमचं काय म्हणणं आहे ? त्यावर आडवाणी हसले.

आडवणींच्या भेटीआधी २००४ च्या लोकसभा इलेक्शन मध्ये भाजप पराभूत झालं होतं आणि नेमक्या याच परिस्थिती आडवणींच जिनांबद्दल असं वक्तव्य येणं संघासाठी अनपेक्षित होत. आडवणींच्या या वक्तव्यावर संघाने आपली नापसंती दर्शवली. 

आडवणींनीही आपलं वक्तव्य मागे घ्यायला नकार दिला. आणि थोड्याच दिवसात आडवणींनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांचे आणि संघाचे संबंध ताणलेलेच होते.  

२००९ ची कंट्रोवरसी सांगायची तर Jinnah: India, Partition, Independence’, या जसवंत सिंहांच्या पुस्तकावरून खळबळ माजली होती. जसवंत सिंह हे वायपेयींच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री, संरक्षण मंत्री अशा भूमिका निवावलेलं व्यक्तिमत्त्व.

त्यांच्या या पुस्तकात त्यांनी जिनांची स्तुती केली. ते म्हंटले की हिंदू मुस्लिम ऐक्याच प्रतीक म्हणजे कायदे आझम मोहंमद अली जिना. जिनांविषयी लिहिताना जसवंत सिंह यांनी धर्माच्या परिप्रेक्ष्यात न बघता राजकीय भूमिकेतून त्यांची मांडणी केली. 

जेव्हा हे पुस्तक पब्लिश झालं तेव्हा राजनाथ सिंह यांनी प्रतिक्रिया देताना म्हंटल की, या पुस्तकाचा आणि पक्षाचा काही संबंध नाही. काही ठिकाणी या पुस्तकाच्या प्रति जाळण्यात आल्या तर नरेन्द्र मोदींच्या गुजरात मध्ये या पुस्तकावर बंदी घालण्यात आली.

पण याच घटना नाहीत तर अशा बऱ्याच घटना आहेत, ज्यात काही हिंदुत्ववादी नेत्यांनी जिनांविषयी गौरवोउद्गार काढलेत तर काहींनी त्यांना व्हिलन ठरवलंय.

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.