पाच शहरांमध्ये मेट्रो आणणारा माणूस, आता उत्तर प्रदेशचा मुख्य सचिव झालाय

आगामी निवडणुकांमुळे उत्तर प्रदेशचं राजकारण आणि तिथलं वातावरण जोरदार चर्चेत आहे. नव्या योजनांचे नारळ तिथं फुटत आहेत, मोठमोठ्या कंपन्या आता गुजरातमध्ये येत आहेत. मध्यंतरी, ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर निवडणुका पुढे ढकलल्या जातील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र प्रचाराची रणधुमाळी थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीये.

विशेष म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये सध्या ओमिक्रॉनचा एकही पेशंट नाहीये. त्यामुळे या निवडणुका जोरदार होणार हे जवळपास नक्की मानलं जातंय. उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये पक्षांतर हा मुद्दा फारसा चर्चेत नसतो. पण देशातलं सगळ्यात मोठं राजकीय रण असल्यानं एकमेकांवर होणाऱ्या कुरघोड्या, सगळ्याच महत्त्वाच्या पक्षांची दावेदारी अशा गोष्टींमुळे इथली निवडणूक मोठ्या प्रमाणावर गाजते.

सध्या मात्र उत्तर प्रदेशमध्ये कुठल्याही नेत्याची नाही, तर एका प्रशासकीय अधिकाऱ्याची चर्चा आहे. अर्थात प्रशासकीय अधिकारीही काही साधा नाही, ते आहेत राज्याचे नवनिर्वाचित मुख्य सचिव दुर्गा शंकर मिश्र. निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या असतानाच मुख्य सचिवांची नियुक्ती झाल्यानं, राजकीय चर्चांनाही उधाण आलं आहे.

हे दुर्गा शंकर मिश्र आहेत तरी कोण?

मिश्र हे मूळचे उत्तर प्रदेशचे. ते १९८४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. देशातल्या नोकरशाहीमध्ये त्यांना मानाचं स्थान आहे. सध्या त्यांच्याकडे दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनचं अध्यक्षपदही आहे. निवृत्तीला फक्त दोनच दिवस बाकी असताना, त्यांची आपल्याच कॅडरमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. याआधीही त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये वेगवेगळ्या विभागांमध्ये भरपूर काम केलेलं आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रमुख सचिव म्हणूनही मिश्र यांनी कारभार पाहिला आहे. मिश्र यांनी सोनभद्र आणि आग्राचे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणूनही काम केलं आहे.

अधिकाऱ्यांचं कुटुंब

मिश्र हे आपल्या कुटुंबातले एकमेव अधिकारी नाहीत. त्यांचे लहान बंधू सत्यकाम हे आयआरएस ऑफिसर असून, सध्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये मुख्य कमिशनर म्हणून काम करतात. तर त्यांचे आणखी एक बंधू विनय कुमार मिश्रही सचिव आहेत. साहजिकच फक्त दुर्गा शंकर मिश्रच नाहीत, तर त्यांच्या कुटुंबाचंच नोकरशाहीत चांगलं वजन आहे.

मेट्रो मॅन मिश्र

गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव असताना मिश्र यांनी एक-दोन नाही, तर पाच ठिकाणी मेट्रोचे प्रोजेक्ट सुरू केले. त्यांनी २०१७ मध्ये लखनौ आणि हैदराबादमध्ये मेट्रो सुरू झाली.२०१९ मध्ये नोएडा, अहमदाबाद आणि नागपूरमध्ये मेट्रो धावू लागली, तर २०२१ पूर्ण होईपर्यंत कानपूर मेट्रोही धावताना दिसली. हे पाचही महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट सुरु होण्यात दुर्गा शंकर मिश्र यांचा मोठा वाटा आहे.

नियुक्तीवरुन राजकारण

याआधी दोनदा मिश्र यांचं नाव मुख्य सचिव पदाच्या शर्यतीत आलं होतं. फेब्रुवारी २०१९ मध्ये तर त्यांचं नाव अग्रक्रमानं घेतलं जात होतं, पण त्यांची निवड झाली नाही. सध्या निवडणुकांचं वारं जोरदार वाहतंय. त्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांच्या बैठकीनंतर हा बदल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दुर्गा शंकर मिश्र हे पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या खास विश्वासातले अधिकारी मानले जातात. त्यामुळे भाजपनं आपल्याला अनुकूल माणसाची नियुक्ती केल्याची टीका होत आहे.

दुसऱ्या बाजूला ए. के. शर्मा यांच्यानंतर दुर्गा शंकर मिश्र यांनाही उत्तरप्रदेशात आणत पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर कंट्रोल आणण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.