नेताजींची ४० वर्षांपूर्वीची लव्ह स्टोरी जी आजही अखिलेशला खटकते

सध्या विधानसभेच्या निवडणुकांमुळे उत्तर प्रदेशातलं राजकारण चांगलंच तापलंय. प्रचार सभा, तिकीट वाटप, या दरम्यान वेगवेगळ्या उलाढाल्या पाहायला मिळतायेत. पण अश्यातच गेल्या दोन दिवसांपासून यूपीतल्या राजकारणात फेमस असलेल्या यादव घराण्यात वेगळाच मेलोड्रामा पाहायला मिळतोय.

म्हणजे झालं काय यूपीतल्या समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव यांच्या छोट्या बहू अपर्णा यादव यांनी पक्ष सोडून भाजपमध्ये एन्ट्री केली. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर  पक्षाला मोठा फटका बसलाय. आता अपर्णा बहूचा हा निर्णय घेण्यामागचा कारण म्हणजे त्यांना  लखनऊ कँटची जागा पाहिजे होती. पण सध्याच्या निवडणुकीची कमान सांभाळणाऱ्या अखिलेश यांनी आधीच अध्यादेश काढलाय कि, घरातल्या कुठल्याच माणसाला निवडणूक लढवता येणार नाही.

मग काय दिराचा हा निर्णय वाहिनीला काय पटला नाही आणि त्यांनी डायरेक्ट पक्षातून बाहेर पडत दुसऱ्याच पक्षात एन्ट्री मारली. आता घरातल्याच माणसानं घर फोडलंय म्हंटल्यावर बवाल तो मचेना ही है.. म्हणजे जेव्हा एका पत्रकार परिषदेत अखिलेश त्यांना अपर्णा यांच्या भाजप प्रवेशावर प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांनी काहीच न बोलता फक्त अभिनंदन केलं.

पण या घटनेमुळे पुन्हा एकदा अखिलेश यांच्या जखमेवरची खपली निघालीये. जखम कुठली तर मुलायम सिंह आणि साधना यांच्या लव्ह स्टोरीची.. जी आजही गाजलेली आहे.

पण भिडू त्यासाठी आपल्याला टाइमवॉच घेऊन ४० वर्ष मग जायला लागलं म्हणजे १९८२ मध्ये. जेव्हा काँग्रेस फुटलचं होत आणि यूपीत यादवांचा डंका वाजायला सुरुवात झालेली.ते नेता म्हणजे मुलायम सिंह यादव अर्थात जनतेचे लाडके नेताजी. पब्लिक म्हणू नका, पक्ष म्हणू नका पार तरुण पोरीसुद्धा नेताजींवर फिदा होत्या. त्यांच्या ४३ च्या वयातल्या त्या जाड्या मिश्या बघून भल्या भल्या पोरी पिघळायच्या.

तेव्हा समाजवादी पक्ष तर नव्हता. राष्ट्रीय लोकदलची हवा होती. याच काळात २३ वर्षाच्या साधना गुप्ताला राजकारणात यायची इच्छा होती. त्यामुळं बऱ्याच राजकीय कार्यक्रमांना ती हजर असायची. आणि तिच्यावर नजर पडली ती मुलायम सिंहांची.  सुरुवातीला तर त्यांच्या साध्याच हा गाठीभेटी व्हायच्या, पण जेव्हा मुलायम यांची आई मूर्तीदेवी आजारी होत्या. तेव्हा मात्र त्यांची जवळीक वाढली. 

म्हणजे झालं काय साधना लखनऊच्या नर्सिंग होममध्ये आणि नंतर सैफई मेडिकल कॉलेजमध्ये नर्स म्हणून काम करायच्या. आणि यावेळी मुलायम यांच्या आईची काळजी घेण्याची सगळी जबादारी आली साधना यांच्यावर. 

असं म्हणतात कि, मेडिकल कॉलेजमधली एक नर्स मूर्तीदेवींना चुकीचे इंजेक्शन देणार होती. त्यावेळी साधना तिथं आली आणि तिने नर्सला तसं करण्यापासून रोखलं. साधनेमुळेच मूर्ती देवींचा जीव वाचला, हे पाहून मुलायम मात्र इंप्रेस झाले आणि तिथूनच त्यांच्या लव्ह स्टोरीला सुरुवात झाली. 

त्यावेळी अखिलेश यादव शाळेत होते. मुलायम आणि साधना यांचं हे प्रकरण १९८२ ते १९८८ पर्यंत कोणालाच माहित नव्हतं. फक्त एक अमर सिंह सोडलं तर. कारण मुलायम सिंह यांचं आधीच मालती देवींशी लग्न झालेलं आणि अखिलेश चांगले  मोठे होते. 

पण १९८८ ला अश्या काही घटना घडल्या कि, मुलायम यांची लव्ह स्टोरी सगळ्यांसमोर आली. म्हणजे एकतर मुलायम मुख्यमंत्री बनायच्या पार जवळ होते, त्यात साधना गुप्ता आपल्या पतीला डिवोर्स देऊन वेगळ्या राहत होत्या आणि त्या गरोदर होत्या. 

याच दरम्यान मुलायम यांनी साधना आणि अखिलेश यांची भेट घालून दिली. त्यावेळी अखिलेश जेमतेम १५ वर्षांचे होते, पण अखिलेश यांना साधना आवडल्या नाहीत. त्यात या मर लेकराचं पुढे पटलं सुद्धा नाही. असं म्हणतात कि, एकदा  तर साधना यांनी अखिलेशला कानफाडीत मारली होती. त्यामुळे त्यांना शिक्षणासाठी बाहेर पाठवण्यात आलं. 

त्यांनतर मुलायम यांच्या संपत्तीवर चौकशी बसली आणि त्यांच्या दुसऱ्या लग्नाची गोष्ट जगजाहीर झाली. १९९४ मध्ये प्रतीक गुप्ता यांनी मुलायम सिंह यांचा त्यांच्या कायमस्वरूपी निवासस्थानाचा अधिकृत पत्ता शाळेत दिला होता. आईचे नाव साधना गुप्ता आणि वडिलांचे नाव एमएस यादव असं लिहिलेलं. त्यामुळे २००३  साली मुलायम यांनी साधना यांना आपल्या बायकोचा दर्जा दिला.

त्यानंतर सगळ्यांना वाटलं कि साधन यांचा मुलगा प्रतीक सुद्धा राजकारणात उतरेल आणि समाजवादी पक्षाच्या रेसमध्ये दोन उमेदवार पाहायला मिळतील. पण प्रतीक यांनी राजकारणात न येण्याचा निर्णय घेतला त्यामुळे पक्षाची गाडी अखिलेश यांच्याकडे गेली.

 पण प्रतीक जरी राजकारणापासून लांब राहिले तरी त्यांनी आपली बायको म्हणजे अपर्णा यांना परवानगी दिली. ज्यांनी नुकताच समाजवादी पक्षातून बाहेर पडत भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. पण आता इथून पुढे या स्टोरीत आणखी काय काय घडतंय हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार एवढं मात्र नक्की.. 

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.