तेव्हा प्रशांत किशोर यांनी ठरवलेलं, पुन्हा राहुल गांधींच्या सोबत काम करायचे नाही..

पुढच्या वर्षी होणाऱ्या उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस, भाजप, समाजवादी, बीएसपीने जय्यत सुरु केली आहे. भाजपने तर उत्तरप्रदेश मध्ये लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करण्याबाबतच्या हालचाली सुरु केल्या आहेत.

याला अनुसरूनचं कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी राजकीय रणनीतीकर प्रशांत किशोर यांची मंगळवारी भेट घेतली. राहुल गांधी यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी प्रियांका गांधी, के.सी वेणुगोपाल राव आणि हरीश रावत अशी पक्षातील काही वरीष्ठ मंडळी देखील उपस्थित होती.

पाच राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर राजकीय रणनीतीकार म्हणून काम थांबवण्याचे संकेत देणारे प्रशांत किशोर अचानक पुन्हा राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.

पुढील वर्षी होणाऱ्या उत्तरप्रदेश मधील निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी तर ही भेट झाली नाही ना असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

राहुल गांधी आणि प्रशांत किशोर यांनी एकत्र येण्याची ही पहिली वेळ नाही. २०१४ मध्ये भाजपला लोकसभेत एकहाती मिळवून देणारे प्रशांत किशोर यांना २०१७ मध्ये झालेल्या उत्तरप्रदेशच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेसची रणनीती आखण्याचं काम देण्यात आलं होतं.  पण त्यावेळी दोघांचे मतभेद झाले.  प्रशांत किशोर यांनी काँग्रेसचं काम सोडलं, त्यांच्यावर टीका सुद्धा होऊ लागली होती.

नेमकी काय कारणे होती ज्या मुळे प्रशांत किशोर यांनी कॉंग्रेसची साथ सोडली ? इतकंच नाही तर पुन्हा त्यांच्या सोबत काम करणार नाही अशी शपथ देखील घेतली होती.

२०१७ उत्तरप्रदेश निवडणुकीची जबाबदारी

प्रशांत किशोर यांनी एका मुलाखतीत सांगितले की,

२०१४ ची लोकसभा निवडणुक जिंकल्यानंतर विश्वास वाढला होता. त्यानंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून २०१७ उत्तरप्रदेश निवडणूकीचे काम करणार का? अशी विचारणा करण्यात आली होती. या बाबत सहकाऱ्यांनाकडून सल्ला घेऊन तुम्हाला कळवतो असे सांगितले होते. यावेळी कार्यालयातील सहकाऱ्यांनी सांगितले की, जर कॉंग्रेसला उत्तरप्रदेश आपण जिंकून दिले तर तो आपला सर्वात मोठा विजय असेल.

त्यानंतर प्रशांत किशोर यांच्या आय-पॅककडून उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक रणनीती ठरविण्यास सुरुवात झाली. पहिले तीन महिने प्रशांत किशोर हे संपूर्ण उत्तरप्रदेश फिरले. मैदानावरची संपूर्ण माहिती गोळा केली. आणि एक प्लॅन तयार करून कॉंग्रेसला दिला.
त्यात त्यांनी १४ मोड्यूल तयार करून दिले होते.

प्लान मध्ये मुख्यमंत्री पदासाठी एक आकर्षक चेहरा असायला हवा अशी अट घातली होती. म्हणजेच प्रियंका गांधी यांना मुख्यमंत्री पदाचा कॉंग्रेसचां उमेदवार म्हणून घोषित करावे अशी मागणी त्यांनी केली होती.

मात्र काँग्रेसकडून याची अंमलबजावणी झाली नाही. शीला दीक्षित यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले. केडर नसल्याने आकर्षक चेहरा द्यावा अशी मागणी प्रशांत किशोर यांनी केली होती.

काँग्रेसने प्रशांत किशोर यांनी दिलेले १४ मोड्युल पूर्ण केले नाही.

उत्तरप्रदेश जिंकायचे असेल तर प्लॅन नुसार जावे लागेल असे प्रशांत किशोर यांनी सांगितले होते. त्यात त्यांनी १४ मोड्यूल ठरवून दिले होते. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी वाराणसी दोऱ्या पासून प्रचाराला सुरुवात करावी. हा दौरा सोनिया गांधी यांनी पूर्ण केला.

मोडयुल प्रमाणे राहुल गांधी यांना किसान यात्रा काढण्याची सूचना दिली होती. त्याच बरोबर खाट सभा घेण्यासाठी सांगितले होते.
१४ पैकी केवळ २ ते ३ मोड्यूल काँग्रेसने पूर्ण केले.

‘२७ साल युपी बेहाल’ या घोषवाक्याने उत्तरप्रदेश दणाणून सोडले होते. त्यामुळे पुढे मोड्यूल फॉलो करायची गरज नसल्याचे काँग्रेसला वाटले होते.

समाजवादी पक्षा सोबत गटबंधन करतांना प्रशांत किशोर यांना विचारात घेण्यात आले नाही

२०१७ उत्तरप्रदेश निवडणुकित काँग्रेसने समाजवादी पक्षा सोबत गटबंधन करू नये असे मत प्रशांत किशोर यांचे मत होते. मात्र त्यांना अंधारात ठेऊन काँगेसने हे गटबंधन केले. याचा फायदा होणार नाही असे अगोदरच प्रशांत किशोर यांनी सांगितले होते. काँग्रेसला १०५ जागा देण्यात आल्या. तसेच समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या केवळ ४ जाहीर सभा झाल्या. त्याचे मतदानात काही रूपांतर झाले नाही.

काँग्रेसला मतदारांचा पाठिंबा मिळत असताना असा प्रकारचे गटबंधन करायची गरज नव्हती असे त्यांनी बोलून दाखविले होते.

स्थानिक ज्येष्ठ नेत्यांचा विरोध

प्रशांत किशोर यांनी आपल्या कार्यपद्धती नुसार उत्तरप्रदेश जिंकण्यासाठी प्लॅन तयार केला होता. यात काँग्रेस मधील नेत्यानं लोकप्रियते नुसार तिकीट देण्यात येईल अशी घोषणा केली होती. मात्र याला काही नेत्यांनी विरोध केला होता.

तसेच प्रशांत किशोर यांच्या टीम ला उत्तरप्रदेशमधील स्थानिक काँग्रेस नेत्यांच समर्थन मिळाले नाही. प्रशांत किशोर यांनी दिलेल्या सूचना मान्य करण्यात येत नसल्याचे सुद्धा सांगण्यात येते.

काँग्रेस नेत्यांना प्लॅनिग मध्ये सामील करून घेण्यात आले होते मात्र त्यांना कुठलीही विचारणा करण्यात येत नसे. त्यानंतर यात युपीचे नेते सहभागी होणे बंद झाले होते.

निवडणुकी दरम्यान काँग्रेस कडून प्रशांत किशोर यांनी दिलेले मोड्युल पूर्ण झाले नाही. त्यांच्या मनाविरुद्ध जाऊन समाजवादी पक्षा सोबत गटबंधन केले त्यामुळे नाराज झालेल्या प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी यांनी सांगितले होते की,

यापुढे आपण सोबत काम करायला नको. मी जे सांगतोय ते होत नाही. त्यामुळे तुमचां फायदा होण्या ऐवजी नुकसान होईल. उत्तरप्रदेश मध्ये जर काँग्रेस पारंपरिक पद्धतीने लढली असती तर या पेक्षा चांगल्या पद्धतीने निवडून आली असती. तसेच मी सांगितलेल्या पर्यायाने लढली असती तरी चांगली कामगिरी केली असती.

दिल्ली, पश्चिम बंगाल मध्ये आपल्या रणनीतीने विजय मिळवून देणाऱ्या प्रशांत किशोर यांना मात्र उत्तरप्रदेश मध्ये मात्र निराशा हाती आली होती.

आता पुन्हा तोच उत्तरप्रदेश प्रशांत किशोर यांना खुणावू लागला आहे. ज्यांच्या बरोबर पुन्हा काम करायचं नाही असं ठरवलेलं अशा राहुल गांधींची ते पुन्हा भेट घेत आहेत. बघू यावेळी तरी काँग्रेस त्यांच्यासोबत काम करते का आणि यशस्वी होते का ते.

हे ही वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.