काँग्रेसचे तिकीट मिळवण्यासाठी महिला नेत्याने स्वतःवरच गोळीबार करवला

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला आहे.  लड़की हूँ लढ सकती हूं …असं म्हणत प्रियंका गांधींनी त्यांच्या पक्षात महिलांना यंदा अग्रस्थान मिळवून देत तिकीट वाटप केले, पदभार दिले.  आता युपी काँग्रेसने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय… एकूण १२५ उमेदवार आहेत तर त्यात ३० महिलांची नावे आहेत. विशेष चर्चेत आलेला मुद्दा म्हणजे, प्रियांका गांधींनी उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या आईला देखील तिकीट देऊ केले आहे.

हा एक मुद्दा सोडला तर आणखी एक विषय चर्चेत आला आहे, तो म्हणजे प्रियांका गांधींनी त्यांच्याच पक्षातील एका महिला नेत्याला जेल मध्ये पाठवलं आहे. 

तर विषय असाय कि, मागे पूर्वांचल एक्स्प्रेस-वेच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या दरम्यान सुलतानपूरमध्ये पंतप्रधान मोदींचा ताफा जात असतांना एका महिला नेत्याने काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. या महिलेचं नाव आहे रिता यादव. त्यांच्या या कृती नंतर त्या चर्चेत झाल्या होत्या. त्यावेळी त्या समाजवादी पक्षात होत्या.. पण नंतर त्यांनी अमेठीत प्रियंका गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

या घटनेनंतर काही दिवसांनी त्यांच्यावर गोळीबार झाल्याची बातमी आली होती…यानंतर युपी काँग्रेसच्या ऑफिशियल ट्विटर हॅण्डल वरून एक ट्विट देखील आलेलं..

हे ट्विट करत काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला होता. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांना टॅग करत त्यांनी म्हणले की, तुमच्या पक्षाचे गुंड जंगलराजमध्ये मुलींना लढण्यापासून रोखत आहेत. मुलींच्या एकजुटीला घाबरून गोरक्षक आता मुलींवर गुंड सोडू लागले आहेत. अशा आशयाचं ते ट्विट होतं. 

नक्की काय प्रकरण आहे?

१६ डिसेंबर २०२१ रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्वांचल एक्सप्रेसवेचे उद्घाटन करण्यासाठी सुलतानपूर येथे पोहोचले होते.  मोदींच्या जाहीर सभेत रीता यादव यांनी काळे झेंडे दाखवले होते. योगी-मोदी मुर्दाबादच्या घोषणा दिल्या होत्या. यावर्षीच्या ३ जानेवारी २०२२ रोजी त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यात सांगितले होते कि, लखनऊ-वाराणसी बायपास ओव्हर ब्रिजवर अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचे सांगण्यात आले. यादरम्यान त्यांच्या पायालाही गोळी लागली, त्यानंतर त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. रिटा यांनी अज्ञात लोकांवर या हल्ल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.

पण नंतर एक वेगळंच सत्य बाहेर आलं.. 

या प्रकरणी पोलिसांनी असा दावा केला आहे की, रीता यादव यांनी स्वतःवरच हल्ला करवला होता, जेणेकरून त्यांना लक्षात घेतलं जाईल, त्यांच्या राजकीय करियर साठी काही फायदा होईल आणि त्यांचा दबदबा वाढू शकेल…तपासादरम्यान हे समोर आल्यानंतर पोलिसांनी रीटा यादवसह तिघांना अटक करून कट रचल्याप्रकरणी तुरुंगात पाठवले आहे….

आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून तिकीट मिळावे यासाठी रिता यादवने आपल्या ओळखीच्या माजी गावप्रमुख माधव यादव यांच्यासोबत हा कट रचल्याचा पोलिसांनी दावा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिता यादव आणि त्यांचा ड्रायव्हर मोहम्मद मुस्तकीम, सूरज यादव, माधव यादव आणि एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केला. पोलिसांनी असेही सांगितले की, हे लोक रीटा यादव यांना त्यांच्यासोबत कारमध्ये घेऊन आले होते आणि घटना पूर्ण करून ते पळून गेले होते.

या प्रकरणी पोलिसांनी रिटा यादवसह तिघांना अटक करून तुरुंगात पाठवले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून शस्त्रे जप्त केल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.